एफटीआयआयमध्ये 'द केरला स्टोरी'च्या स्क्रिनिंगला विरोध

20 May 2023 16:16:11
the-kerala-story-controversy-protest-against-the-kerala-story-at-pune-fti

पुणे
: नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये बहुचर्चित 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे स्क्रीनिंग आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन तसेच निर्माते विपुल शहा यांच्यासोबत वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी एफटीआयआयमधील डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत गोंधळ घातला. सिनेमा विरोधात तसेच निर्मात्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत स्क्रीनिंग करण्याला मज्जाव केला. हे स्क्रीनिंग थांबवण्यासाठी ढोल वाजवून घोषणाबाजी केली. परंतु, या सिनेमाच्या स्क्रीनिंगला आलेल्या राष्ट्रीय विचारांच्या कार्यकर्त्यांनी देखील भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, वंदे मातरम अशा जोरदार घोषणा देत त्यांचा विरोध हाणून पाडला. दरम्यान, पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दोन्ही गटांना एकमेकांसमोर येण्यापासून पोलिसांनी अडवले.

मिती फिल्म सोयायटीच्यावतीने 'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमासाठी दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्याबरोबर गप्पांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता. या गप्पांसाठी अभिनेत्री अदा शर्मा आणि निर्माते विपुल शहा उपस्थित राहणार होते. पुण्यातील राष्ट्रीय विचारांच्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी निमंत्रण देण्यात आलेले होते. त्याकरिता प्रवेशिका देखील देण्यात आलेला होता. सर्वांची नाव नोंदणी करून आतमध्ये सोडण्यात येत होते. दरम्यान, एफटीआयआय मधील २५ ते ३० विद्यार्थ्यांच्या गटाने या सिनेमा विरोधात ऑडिटोरियमच्या बाहेर उभे राहून घोषणाबाजी सुरू केली. तसेच एफटीआयआयमध्ये ठिकठिकाणी सिनेमा विरोधातील स्टिकर्स चिकटवण्यात आलेले होते.
 
परंतु, या विरोधाला न जुमानता राष्ट्रीय विचारांचे कार्यकर्ते आणि नागरिक या सिनेमाच्या स्क्रीनिंगमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणावर देशभक्तीपर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि निर्माते विपुल शहा हे एफटीआयमध्ये आल्यानंतर त्यांनी विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुमच्यासाठी स्वतंत्रपणाने स्क्रिनिंगचे पुन्हा आयोजन करून असे आश्वासन दिले. या कार्यक्रमादरम्यान दोन्ही गटांमध्ये कोणतीही शाब्दिक वादावादी झाली नाही. परंतु, घोषणाबाजीला घोषणाबाजीने रोखठोक उत्तर दिले.

Powered By Sangraha 9.0