मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पहिल्यांदाच वाघांचे स्थानांतरण (ट्रान्सलोकेशन) केले गेले आहे. शनिवार दि. २० मे रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्राचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत २ मादी वाघिणींचे नागझिरा क्षेत्रात स्थानांतर केले गेले. महाराष्ट्रातील हे पहिलेच स्थांनातर असुन चंद्रपुरातील ब्रह्मपुरी येथून हे वाघ आणले गेले आहेत.
नवेगाव नागझिरा हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात असलेला देशातील ४६वा व राज्यातील ५ वा व्याघ्र प्रकल्प आहे. ६५६.३६ चौ. किमी गाभा क्षेत्र आणि १२४१.२४ चौ. किमी बफर क्षेत्र असलेल्या या व्याघ्र प्रकल्पात २० प्रौढ वाघ वास्तव्य करण्याची क्षमता आहे. ऑल इंडिया टायगर एस्टीमेशनच्या २०२२ च्या अहवालानुसार नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात ११ वाघांचे वास्तव्य आहे. नागझिरा व्याघ्र क्षेत्र हा कमी घनतेचा व्याघ्र भूभाग असल्याने चंद्रपूरमधील ब्रम्हपुरी भूभागातून ‘कॉन्सरवेशन ट्रान्सलोकेशन ऑफ टायगर्स’ या प्रकल्पांतर्गत ४-५ मादी वाघिणींचे स्थानांतर केले जाणार आहे. या ४-५ वाघीणींपैकी २ वाघिणींचे पहिल्या टप्प्यात स्थानांतर केले गेले आहे. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे हे यश असुन त्यांच्या उपस्थितीत दि. २० मे सकाळी या व्याघ्र जोडीला वन क्षेत्रात सोडले गेले. या प्रकल्पांतर्गत ४-५ वाघिनींना आणणे प्रस्तावित असून इतर वाघ टप्प्या टप्प्याने नागझिरामध्ये आणले जाणार आहेत.
नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या गाभ्यामध्ये या दोन वाघिनींना सॅटेलाईट जीपीएस कॉलर लावून सोडण्यात येणार आहे. सॅटेलाईट जीपीएस कॉलर आणि व्हीएचएफच्या साहाय्याने या वाघांवर सक्रिय नियंत्रण ठेऊन नजर ठेवण्यात येणार आहे. ब्रम्हपुरी भूभागातील वाघ आणल्यामुळे चंद्रपूरमध्ये होत असलेल्या मानव-व्याघ्र संघर्षावर ही आळा बसण्यास मदत होईल. तसेच या उपक्रमामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील वाघांची संख्या वाढून पर्यटनाला ही चालना मिळू शकते, व स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
“पर्यटन आणि रोजगार वाढीच्या दृष्टीने हा प्रकल्प केला आहे. ताडोबातील माया वाघिणीच्या अनुभवावरुन असे लक्षात आले की जे काम एखादा औद्योगिक प्रकल्प करु शकत नाही ते एक वाघीण करु शकते. माया वाघिणीमुळे १० करोडचे उत्पन्न वाढले. जास्त व्याघ्र घनता असलेल्या क्षेत्रातुन स्थानांतर केल्यामुळे मानव-व्याघ्र संघर्षाच्या घटनांचे प्रमाण निश्चितच कमी होईल. असे स्थानांतर केल्यामुळे वाघांच्या संख्येचा समतोल राखता येईल.”
- सुधीर मुनगंटीवार
वनमंत्री, महाराष्ट्र वन विभाग