मूर्तीकलेचा ध्यासमय वसंत

    02-May-2023   
Total Views |
manasa

कला ही कलाकाराच्या रक्तातच असते आतंरिक शक्तीच्या स्वरूपात ती त्या कलाकाराला सदैव प्रेरित करते याचे जीवंत उदाहरण म्हणजे वसंत राजे ..त्यांचा कलाजीवनपट इथे उलगडला आहे.

वसंत राजे हे ‘श्री गणेश मूर्तीकला समिती’चे अध्यक्ष आहेत. आजपर्यंत त्यांच्या हाताखालून ५०० पेक्षा जास्त कलाकारांनी मूर्तीकलेचे शिक्षण घेतले आणि मूर्तीकला क्षेत्रात रोजगार आणि स्थान मिळवले. २०२२ साली गणेश मूर्तिकार आणि गणेश मंडळ यांची बैठक महाराष्ट्र शासनाने आयोजित केली होती. त्यामध्ये गणेश मूर्तिकारांचे प्रश्न मांडत वंसत यांनी सहविचारी संघटनांच्या सहकार्याने मागणी केली होती की, गणेश मूर्तिकारांना अल्प भाडे तत्वावर गणेशमूर्ती कारखान्यासाठी मुंबईत जागा उपलब्ध व्हावी.

त्यावेळी राज्य सरकारने या मागणीला हिरवा कंदील दाखवला होता. या मागणीची पुर्तता व्हावी यासाठी वसंत पाठपुरावा करत आहेत. तसेच, २०२०च्या दरम्यान पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून बंदी आणण्यात आली होती. याबद्दलही राज्य सरकारने तत्काळ कारवाई करावी यासाठी वसंत सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या ‘श्री गणेश मूर्तीकला समिती’मध्ये मुंबईतील ३५०च्या वर मूर्तिकार सदस्य आहेत. मुंबईच्या गणेश मूर्ती कलाकारांमध्ये वसंत यांचे स्थान महत्त्वाचे आहे. कोण आहेत वसंत राजे? गणेश मूर्तिकार म्हणून कीर्तिमान असलेल्या वसंत यांनी शिल्पकलेचे शिक्षण कुठून घेतले? त्यांना तो वारसा कुठून मिळाला?

राजे कुटुंब मूळचे नाशिकच्या संसरी गावचे. कामानिमित्त राजे कुटुंबीय मुंबईत आले. बाळकृष्ण राजे आणि तुळसाबाई या दाम्पत्याला तीन मुले त्यापैकी एक वसंत. बाळकृष्ण मुबंईत पारंपरिक व्यवसाय करू लागले. दिवसभर चपल शिवत आणि रात्री एका चप्पल बूट बनवण्याच्या कारखान्यात कामाला जात. बाळकृष्ण यांना एक छंद होता तो म्हणजे ते बूट आणि चप्पलांचे उत्कृष्ट डिझाईन तयार करत असत. असो, अहोरात्र कष्ट करत पण तरीही आर्थिक स्थिती बदलत नव्हती. दोन दोन दिवस उपाशी राहायची वेळही राजे कुटुंबीयांवर यायची. सुकी भाकरी किंवा चहा भात हे अन्न मिळाले तरी दिवस साजरा झाला असे ते दिवस.

याचे कारण बाळकृष्ण यांना दुर्दैवानेदारूचे व्यसन लागले होते. वसंत इयत्ता दुसरीत असतानाच बाळकृष्ण यांचे निधन झाले. घरचा खांब कोसळला पदरी तीन मुल. त्यांना जगावण्यासाठी तुळसाबाई दुःख विसरून नशिबाला भिडल्या. ती माऊली सकाळ संध्याकाळ लोकांच्या घरची धुणीभांडी करू लागली. दुपारच्या वेळेस मालाड रेल्वे स्टेशनवर खेळण्यातला भोवरा आणि प्लास्टिकची खेळणी विकू लागली. वसंत यांचा मोठा भाऊ दत्तात्रय यांनी नववीतले शिक्षण सोडले आणि तो रेल्वेत चिकू आणि इतर फळ विकू लागला. दोनवेळचे अन्न मिळणे आणि प्राथमिक गरजा भागणे हे एकच ध्येय.

वसंत ही चौथीपासून पेपर टाकायचे काम करू लागले. कष्ट केल्याशिवाय जगणे अशक्यच असते हेच आई सातत्याने मुलांना सांगे. पुढे शाळेतून येता जाता वसंत आजूबाजूच्या साईनबोर्ड पेंटरच्या दुकानात रेंगाळत असत. त्या पेंटरच्या हाताखाली ब्रश धुवून दे, त्याला रंगकामात मदत करून दे असे शिकत राहिले. इयत्ता पाचवीला असतानाच ते साईन बोर्ड पेटिंगच्या कामाचे बारकावे शिकले. त्यावेळी वर्गमित्राच्या भावाच्या लग्नात बॅकड्रॉप रंगकाम डिझाईन करायचे होते. कलाकार ऐनवेळी आला नाही. मात्र, पाचवीत शिकणार्‍या वसंत यांनी आत्मविश्वासाने सांगितले मी करतो हे काम आणि खरच त्यांनी ते काम पूर्ण केले. त्या कामाचे त्यांना ५०० रुपये मिळाले. आज मूर्ती कलेतून लाखो रुपयांची उलाढाल करणार्‍या वसंत यांना विचारले की, आयुष्याचा आनंदाचा क्षण कोणता तर ते आजही सांगतात की, ५०० रुपये मिळाले तो दिवस आनंदाचा होता. इयत्ता नववीपर्यंत ते परिसरात उत्कृष्ठ साईन बोर्ड पेंटर आणि रंगकाम करणारे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यावेळी ‘जितू आर्टस वर्क’ असा त्यांचा व्यवसायही होता.

या सगळ्या काळात वसंत यांना कळून चुकले होते की, त्यांचा जीव कलाशिल्पात रंगकामातच आहे. ते विविध मूर्ती कारखान्यात बसून मूर्तिकार मूर्ती कसा घडवतो, त्यावर रंगकाम कसा करतो, गणपतीच्या बाप्पाच्या मूर्तीत डोळे रंगवताना भाव कसे जीवंत करतो हे शिकत होते. हे शिकणे त्यांचा ध्यासच होता. शिकता शिकता मूर्तीकलेशी त्यांचे नाते जडले. त्यांची पत्नी अवनीसुद्धा मूर्तीकलेत प्रवीण. त्यामुळे या दोघांनी मिळून श्री शिल्पकार श्री वसंत राजे कलादालन सुरू केले. शिल्पकलेची आवड असणार्‍या गुणी युवक युवतींना ते मूर्तीकला शिकवतात आणि शिकले की त्यांच्याकडूनच पर्यावरणपुरक शिल्प तयार करून घेतात.

तरुणाईतला कलाकार घडतो त्याला रोजगारही मिळतो. हा सगळा काळ वसंत यांच्यासाठी संघर्षाचाच होता. प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांच्या मार्गदर्शन सहकार्याने वसंत हे खूप काही शिकले. गणेश मूर्ती बनवण्यासाठी हंगामी स्वरूपाची जागा मिळवावी यासाठी वसंत यांनी प्रदीर्घ लढा दिला. विजय खातू यांच्या मार्गदर्शनाने तो वैयक्तिक लढा ते जिंकलेही. मात्र, गणेशमूर्ती कलाकारांना किती अडचणी येतात याचे अनुभव वसंत यांना आले. त्यातूनच त्यांनी ‘श्री गणेश मूर्तीकला समिती’ स्थापन केली. यापुढे ही मूर्तीकामगारांच्या हक्कासाठी समन्वय आणि यशस्वी प्रयत्न करू असा वसंत यांचा निर्धार आहे. जातीनिष्ठ व्यवसाय असू दे की, आंतरिक कलानिष्ठ व्यवसाय याच्याशी एकनिष्ठ राहून कलेचा वारसा चालवणाारे वसंत हे तरुणाई पुढील मार्गदर्शकच आहेत हे नक्की.

९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.