तो काळच असा होता, जेव्हा प्रत्येक क्रांतिकरकाला असे वाटे की, या जन्मीचे कार्य पूर्ण करून मरण आले तरी बेहत्तर, परत जन्म याच जन्मभूमीत घेऊया आणि आपला स्वातंत्र्य लढा असाच पुढे चालवूया जन्मभूमी पारतंत्र्यातून मुक्त होईस्तोवर. अशा सर्वोच्च बलिदानाचे मूर्तिमंत रूप हुतात्मा विनायक नारायण देशपांडे.
एकबार बिदाई देई माँ
घुरे आशी
हाशी हाशी पोडबो फाशी
पितांबर दास हे बंगाली गीताचे गीतकार। आहेत, जे सांगते, की एक क्रांतिकारी आपल्या आईला म्हणतोय की, ए आई, एकदा मला जाऊ दे, मी परत येईल, मला हसत हसत फासावर चढू दे, सगळ्या भारतवासीयांना हे बघू दे. हुतात्मा खुदिराम बोस यांच्या हृदयातील विचार जणू या गीतातून गीतकार मांडू इच्छितात. सगळा देश आता ब्रिटिशांविरूद्ध पेट घेत होता. खुदिराम बोस यांच्या हौतात्म्यातून अण्णा कर्वेनी प्रेरणा घेतली, तर मदनलाल धिंग्रांकडून अनंत कान्हेरेंनी. नाशिक कट रचला गेला. या क्रांतीपर्वात अनेक तरुणांनी बलिदान दिले त्यापैकी एक विनायक देशपांडे.
विनायक देशपांडे मूळ सिन्नरचे आणि श्री अण्णा कर्वे यांचे मावसभाऊ. दोघे जवळपास एकाच वयाचे, त्यामुळे दोघांचे चांगलेच गुळपीठ चालायचे. कर्वेनी ‘अभिनव भारता’सारखी एक गुप्त संघटना स्थापन केली. आपल्या कोलकत्त्याच्या प्रवासात त्यांनी गुप्त संघटना कशी चालवावी, त्याचे नियम काय असावे याचा अभ्यास केला आणि तीच नियमावली, नाशिक, मुंबई पुणेच्या सगळ्या शाखांना लागू केल्या. महाराष्ट्रात आता क्रांतीची मशालचांगलीच पेटली होती. उदाहरणार्थ सांगायचे तर देशप्रेमाने भारलेल्या कार्यकर्त्याला लक्षात आलं की, बॉम्ब बनविण्यासाठी लागणारे साहित्य महाग आहे आणि त्यासाठी संघटनेकडे पैसे कमी पडताहेत तर क्षणाचाही विचार न करता त्यांनी आपल्या बायकोच्या सोन्याच्या बांगड्या विकून पैसा उभा केला, तो स्वतःच्या जीवाचा विचार करणे शक्यच नाही.
असो, मूळ सिन्नरकर विनायक तसे फार मृदू स्वभावाचे होते, पण शिस्तीला अतिशय कडक. हसतमुख व्यक्तिमत्व आणि तालमीत तयार झालेले शरीर ही त्याची व्यक्ती वैशिष्ट्य. आपलं सातवीपर्यंतच शिक्षण पूर्ण करून ते शाळा मास्तर म्हणून पंचवटीतील इंग्रजी शाळेत रूजू झाले. इंग्रजी सत्तेविषयी राग त्यांच्या मानात ठसठसत होताच, पण आपण एकटे काय करू शकणार याविषयी थोडी शंका होतीच. तश्यात त्यांचा संपर्क अण्णा कर्वेशी झाला आणि त्यांनी गुप्त संघटनेची शपथ घेतली. एक तलवार मांडीवर ठेवून, दासबोध व गीता हातात घेऊन ही शपथ घेतली जायची, ज्याचा अर्थ थोडक्यात असा होता की, मी सशस्त्र क्रांतीचा भाग आहे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाटेल ते करायची माझी तयारी आहे.
मी आपल्या साथीदारांची नावे कधीही सांगणार नाही. शस्त्रातांची जमवाजमव करणे, बॉम्बची सिद्धता करणे आणि याउपर अण्णा कर्वे सांगतील ती कामं, त्याच पद्धतीने करणे, अशी सगळी क्रांतीची जय्यत तयारी नाशिकमध्ये करण्यास सुरू झाली. विनायक रावांवर एक जबाबदारी अजून होती, त्यांचे लग्न झाले होते. तरीही या गुप्त संघटनेअंतर्गत होणार्या प्रत्येक कामाला त्यांचा होकार असे, वेळ आली तर देशासाठी सर्वोच्च बलिदान करण्याची त्यांची तयारी होती, कारण ही सगळी मंडळी घडलीच वेगळ्या मातीची होते. ‘देश प्रथम मग आपला संसार’ हा विचार त्यांच्यात उपजतच होता असे म्हंटले, तर ते वावगे ठरणार नाही, कारण ते लादलेलं आंदोलन नव्हतं ती स्वयंस्फुर्त क्रांती होती.
मला साथीदार नकोत, मी एकटाच हे काम करायला तयार आहे, असे अनंत कान्हेरेंचे पत्र कर्वेना मिळाले आणि त्यांनी आनंतशी बोलणी करायला आपल्या सगळ्यात विश्वस्त माणसाला पाठवले. विनायक नारायण देशपांडे ते औरंगाबदला गेले, कान्हेरेंशी बोलले आणि लागलीच पुढची तयारी करायला नाशिकमध्ये परत आले. दुसर्या दिवशी कान्हेरे नाशिकमध्ये दाखल झाले. कट रचला गेला. प्रथम कान्हेरे वार करतील, त्याच्याकडून जॅक्सन सुटला तर अण्णा कर्वे स्वतः आणि विजयानंद थेटराच्या बाहेर देशपांडे सज्ज राहतील. पण ती वेळ आलीच नाही, कान्हेरेंनी वेळ साधली आणि सगळ्यांच्या देखत दुष्ट जॅक्सनला यम सदनी पाठवले, मातृभूमीचे पांग फेडले. कान्हेरे पकडले गेले, त्यांनी थेटरात कर्वे आणि देशपांडेंना ओळख दाखवली नाही, की त्याच्या जबानीत त्यांचा उल्लेखपण केला नाही.
देशपांडे वेगळ्या मार्गाने आणि कर्वे वेगळ्या मार्गाने आपापल्या घरी गेले. शंकेला खरंतर वाव नव्हता. तरीपण नशिबात काहीतरी वेगळंच गोंदलं होतं. दुसर्या दिवशी रेल्वे फलाटावर अंकुशकर आणि जोशी पकडले गेले, त्याच्यामार्फत गणू वैद्यपर्यंत इंग्रज पोहोचले. गणू वैद्य कधीही क्रांतिकारकांसारखी मनाची कणखरता/तयारी नव्हती. त्यांनी सगळ्यांची नावे आणि माहिती दिली. देशपांडे आणि कर्वे त्यादिवशी थेटरात होते आणि ते कान्हेरेंचे साथीदार होते हे इंग्रजांनी हेरलं. देशपांडेंनासुद्धा कान्हेरे आणि कर्वेनबरोबर देहांतची शिक्षा सुनावण्यात आली. देशासाठी सर्वोच्च बलिदान करणार्या या देशप्रेमी तरुणांच्या त्यागाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. ‘तुजसाठी मरण ते जनन’ या न्यायाने ते जगत होते आणि मृत्यूलाही कवटाळत होते. भारतमातेसाठी वयाच्या २१ व्या वर्षी सर्वोच्च बलिदान देणार्या या विरपुत्राला आम्ही नमन करतो.
सोनाली तेलंग
९८८११३२3९3