रामनामाचा छंद

17 May 2023 20:34:37
ram

एखादे ध्येय साध्य करायचे तर प्रपंचातही त्याचा ध्यास लागतो. त्या ध्येयाकरिता वेडे व्हावे लागते. त्याचा छंद लागतो, असे झाले तर ते साध्य करता येते. रामनामाच्या बाबतीत आपण भगवान शंकरांचा आदर्श समोर ठेवावा, असे समर्थांना वाटते. कारण, ‘विशेषे हरा मानसी रामपीसे.’ रामनामाचं असं वेड लागल्यावर ध्येयवस्तूशी तादात्म्य व्हायला वेळ लागत नाही. त्यानंतर भक्तीचा खरा अर्थ समजतो.

नाचे चांचल्य सर्वपरिचित असल्याने पुन्हा नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. प्रपंचात सर्वसाधारणपणे प्रत्येकाचा अनुभव आहे की, मन तोचतोचपणाला कंटाळते. तरीही पुन्हा त्याच गोष्टीचा आग्रह धरला, तर मनाला त्या गोष्टीचा कंटाळा येतो, वीट येतो. हा मनाचा स्वभावधर्म आहे. रामनामाने आपल्याला आपले अंतिम हित साधता येणार आहे. तेव्हा, रघुनायकाचा कंटाळा किंवा वीट करून कसे चालेल? म्हणून स्वामींनी मागील श्लोक क्र. ९१ मध्ये ‘नको वीट मानू रघुनायकाचा’ असे चंचल मनाला समजावले आहे. मोठ्या आदरपूर्वक रामनामाचा घोष करावा, असे स्वामींनी त्या श्लोकात म्हटले आहे, अशा आदराने केलेल्या रघुनायकाच्या घोषामुळे आपले दोष दूर पळून जातील, असे स्वामी म्हणतात-

अती आदरें सर्व ही नामघोषें।
गिरीकंदरे जाइजे दूरि दोेषें।
हरी तिण्टतु तोषला नामतोषें।
विशेषें हरा मानसी रामपीसें॥९२॥

रामनामाने सर्व दोष दूर होतात, असे स्वामी म्हणतात. मागेही श्लोक क्र. ७० मध्ये स्वामींनी ‘कदा बाधिजेना आपदा’ असे म्हटले आहे. संकंटाची बाधा दूर करणारे, तसेच सर्व दोष नाहीसे करणारे असे हे रामनाम आहे. येथे समर्थांचा भर अतिशय मोठ्याने उच्चारलेल्या रामनामघोषावर आहे. रघुनायकाचा जयघोष केल्याने समविचारी लोकांचे ऐक्य, बल व आध्यात्मिक उन्नती एकसमयावच्छेदेकरुन साधावी, असा स्वामींच्या मनातील भाव असावा.रामनाम, नामस्मरण मनात घेता येते, एकान्तात घेता येते, तरीही स्वामी रघुनायकाचा जयघोष करायला सांगतात. तेव्हा त्यात त्यांचा वेगळा उद्देश असावा. तो समजण्यासाठी समर्थकालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक स्थिती पाहावी लागले. समर्थकालीन एकंदर स्थिती गंभीर होती. राज्य म्लेंच्छांचे आणि कशाचीही चाड नसलेले त्यांचे अधिकारी लोकांचा छळ करीत, म्लेंच्छं राज्यात मूर्तिपूजा करणे, मंदिरांचा जीर्णोद्धारकरणे, नवीन मंदिरे बांधणे यांना बंदी होती. देवळे पाडणे, देवांच्या मूर्ती भ्रष्ट करणे, मूर्तिभंजन,तरुण स्त्रियांना पळवणे हे अत्याचार नित्याचे झाले होते.

परधर्मीय सत्ताधीशांचे अत्याचार सहन करीत लोक कसेतरी जगत होते. लोक आपले धर्माचरण सोडून मुसलमानांचे रीतिरिवाज पाळू लागले होते. अशा हतबल निद्रिस्त समाजाला जागे करून आपला धर्म व संस्कृतीरक्षण करणे, हे ध्येय निश्चित करून समर्थ कामाला लागले. अशा वेळी आदरपूर्वक केलेला रामनामाचा जयघोष अत्यंत उपयोगी होता. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर ही सामाजिक अवकळा शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेपूर्वी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची घोषणा करून परिस्थिती सावरली. लोकांमध्ये धर्मनिष्ठा, स्वाभिमान, लढाऊवृत्ती निर्माण करून चारित्र्यसंपन्न देश घडवण्याचे महान कार्य शिवाजी महाराज करत होते. इकडे समर्थ रामदासस्वामींनी राम व हनुमानाची उपासना सांगून लोकांना बल, धैर्य व स्वामिनिष्ठा यांचे धडे द्यायला सुरुवात केली. समर्थांनी सर्वत्र रघुवीराचा जयघोष करून एक प्रकारे मुसलमानांचे धार्मिक व सांस्कृतिक आक्रमण थोपवण्याचा प्रयत्न केला. समाजाला रामराज्यासाठी तयार केले. समाजाला धैर्य दिले. आदरपूर्वक केलेल्या रामनामाच्या घोषाने सर्व दोष निघून जातील, असे स्वामी सांगत आहेत.

आत्मोन्नतीसाठी आंतरिक दोष शोधून त्यांना दूर करणे हे सांगण्यापूर्वी स्वामींचे लक्ष प्रथम बाह्य दोषांकडे गेले. आपला विखुरलेला समाज, एकराष्ट्र विचाराचा अभाव, धर्म, संस्कृतीयाविषयी अनास्था, भीती, भ्रष्ट आचार, चारित्र्यहीनता इ. बाहेरून दिसणारे दोष स्वामींच्या नजरेसमोर होते. कोदंडधारी रामाचा आदर्श समाजासमोर ठेवून लोकांना त्या दोषांची जाणीव करून द्यावी आणि आदर्श रामाचा सर्वत्र जयघोष करून लोकांत उत्साह निर्माण करावा, असे स्वामींना वाटत होते. दोषांची जाणीव झाली आणि जीवनादर्श सापडला, तर हे दोष ‘गिरीकंदरे जाईजे दूरी’ असे स्वामी म्हणतात. हे दोष इतकेदूर जातील की, त्यांची आठवणही राहणार नाही. सूर्य उगवल्यावर अंध:कार जसा राहत नाही, तो दूरवर डोंगरदर्‍यांत निघून जातो. तसे आदरपूर्वक केलेल्या नामघोषाने सर्व दोष दूर जातील. यापैकी बाहेरून स्पष्टपणे दिसणार्‍या दोषांचा विचार वर केला आहे. पण, सर्व दोष जातील या शब्दात आंतरिक दोषांचाही समावेश आहे.

थोडक्यात, आदरपूर्वक केलेल्या रामाच्या, रामनामाच्या घोषाने माणसात अंतर्बाह्य सुधारणा झाली पाहिजे, असे समर्थ सांगतात. या आंतरिक दोषांचा विचार करता अहंकार आणि देहबुद्धी हे सर्वांत मोठे दोष सर्वत्र पसरलेले आहेत. देहबुद्धी म्हणजे ‘मी देह’ अशी ठाम समजूत असणे अशा माणसांची सुखदुःखेआनंदखेद सर्व देहाशीच निगडित असतात. त्या पलीकडे काही आहे, ही जाणीव मावळलेली असते. त्यातून अंहभाव, आत्मप्रौढी, बढाया मारणे, स्वार्थ हे दुर्गुण दिसू लागतात. दुसर्‍यांचा विचार नसल्याने नीती, चारित्र्य हे गुण आठवत नाहीत. वृत्ती स्वैरपणे वागू लागते. श्रेष्ठ-कनिष्ठता वाढीस लागून ‘मीच श्रेष्ठ’ असे वाटू लागते. श्रेष्ठतेचा हा भ्रम विस्तार पावून ‘मी श्रेष्ठ, माझे घराणे श्रेष्ठ, माझी जात श्रेष्ठ, माझी उपासना श्रेष्ठ,’ अशा भ्रमांनी अहंकार निर्मिती होत राहते. माणूस गर्विष्ठ बनतो. त्याला वाटू लागते की, मीच ज्ञानी, मीच पंडित, मीच शूरवीर मग तो बढाया मारू लागतो. त्याच्याठिकाणी वाचाळता येते. देहबुद्धी अहंभाव उराशी बाळगूण वावरणार्‍याला धक्के-चपेटे सोसावे लागतात. मग त्यातून द्वेष, मत्सर, सूडबुद्धी या भावना उफाळून वर येतात. रामाच्या चरित्राचा विचार करताना, रघुवीराचा आदर्श समोर ठेवताना आपण किती दोषांनी भरलेले आहोत, याची जाणीव होऊ लागते. हा रघुवीरच माझे सर्वस्व असून त्याचा आदरपूर्वक जयघोष केल्यावर हे सर्व दोष दूरवर गिरीकंदरात जातील. तेथून ते सहजपणे परत येणार नाहीत, असे स्वामी म्हणतात.

रामनाम उच्चाराचा आणखी एक फायदा म्हणजे भगवंत तेथे थांबून प्रसन्नमुद्रेने आनंदित होतो. ’मद्भक्ता यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारद‘ असे भगवंतांनीच नारदाला सांगितले आहे. यात विशेष म्हणजे, भगवान शंकरांना तर या रामनामाने वेडे केले आहे. या वैराग्यशाली शंकराला अष्टसिद्धी प्राप्त असूनही रामनामात गर्क आहेत. समर्थ वारंवार भगवान शंकरांचा उल्लेख मनाच्या श्लोकांतून करतात. कारण, या महादेवास रामनामाचे जणू ध्यास वेड लागले आहे. एखादे ध्येय साध्य करायचे तर प्रपंचातही त्याचा ध्यास लागतो. त्या ध्येयाकरिता वेडे व्हावे लागते. त्याचा छंद लागतो, असे झाले तर ते साध्य करता येते. रामनामाच्या बाबतीत आपण भगवान शंकरांचा आदर्श समोर ठेवावा, असे समर्थांना वाटते. कारण, ‘विशेषे हरा मानसी रामपीसे.’ रामनामाचं असं वेड लागल्यावर ध्येयवस्तूशी तादात्म्य व्हायला वेळ लागत नाही. त्यानंतर भक्तीचा खरा अर्थ समजतो. ‘विभक्त तो भक्त नव्हे’ असे समर्थांनी म्हटले आहे. आपल्या ध्येयवस्तूशी एकरूप होण्यात जो आनंद असतो, तो भक्तिमार्ग होय. तो साध्य करण्यासाठी रामनामासारखे सोपे साधन नाही. जेव्हा सर्वत्र रघुवीराचा आदरयुक्त जयघोष ऐकायला मिळेल, त्या दिवशी समाजातील सर्व दोष नाहीसे होतील, वातावरण भक्तिमय, प्रेममय होईल. ‘जय जय रघुवीर समर्थ’ ही समर्थवाणी सर्वत्र ऐकू येऊ दे, त्याने आत्मोन्नती साधता येणार आहे, सर्व दोष नाहीसे होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0