मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला ‘लव्ह जिहाद’विरोधात जागृत करणार्या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादक योगिता साळवी यांना स्वा. सावरकर वीरता पुरस्कार जाहीर झाला आहे. साळवी यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात जनजागृती केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ हे अभियान हाती घेतले असून या अभियानांतर्गत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह नाशिक, जळगाव, धुळे आणि रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येत असून, त्यास युवा वर्गाकडून विशेषत: महिला आणि मुलींकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राज्य शासनाचा महिला व बाल कल्याण विभाग आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीचे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि २१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप असून, विलेपार्ले येथे होणार्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते येत्या २५ मे रोजी हा पुरस्कार साळवी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
स्वा. सावरकर वीरता पुरस्कारासाठी व्यक्ती अथवा संस्थेची निवड करण्यात येते. यासाठी सहा सदस्यीय पुरस्कार निवड समिती आहे. त्यात ज्येष्ठ सावरकर विचार अभ्यासक आणि माजी खासदार प्रदीपदादा सावंत, ज्येष्ठ वक्ते आणि लेखक आशुतोष अडाणी, युवा सावरकर अभ्यासक पार्थ बावस्कर, जवानांसाठी कार्यरत असलेल्या सिर्फ संस्थेच्या संस्थापिका सुमेधा चिथडे, प्राध्यापक सचिन कानिटकर, आणि साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांचा समावेश आहे. योगिता साळवी यांना स्वा. सावरकर वीरता पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.