निसर्ग संवर्धनासाठी झटणारी ‘सृष्टीभान’

16 May 2023 21:36:52
nature

‘राखूया सृष्टीचे भान, करूया निसर्गाचा सन्मान’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘सृष्टीभान’ संस्था कार्यरत आहे. ही नोंदणीकृत संस्था असून, शहराच्या आसपास नष्ट होत चाललेली जैवविविधता व उपलब्ध असलेला निसर्ग व जैवविविधता याचा अभ्यास व नोंदणी करून त्याची जनजागृती करण्याचे काम करते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ म्हणत निसर्गसृष्टीशी तादात्म्य पावत संस्था अंखड कार्यरत आहे. अशा या पर्यावरण रक्षणासाठी झटणार्‍या संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...

अर्णव पटवर्धन आणि त्यांचे वडील अमरेंद्रपटवर्धन हे दोघेही निसर्ग भ्रमंती करीत असतात. निसर्ग अभ्यास आणि संवर्धन करीत असताना निसर्गासाठी काहीतरी करावे, असा विचार त्यांच्या मनात आला व त्यातूनच त्यांनी ‘सृष्टीभान’ सामाजिक संस्थेची स्थापना केली. अर्णवने वयाच्या आठव्या वर्षापासून पक्षी व निसर्ग अभ्यास सुरू केला. निसर्ग अभ्यास करतानाच एक संस्था असावी, अशी त्यांना जाणीव झाली आणि २०२० साली ‘सृष्टीभान‘ सामाजिक संस्थेची स्थापना त्यांनी केली. संस्था नोंदणी व निसर्गविषयक अभ्यास याकरिता कडोंमपाचे तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन ही ‘सृष्टीभान’ संस्थेला लाभले. ‘सृष्टीभान’ संस्थेच्या माध्यमातून ‘डोंबिवली नेचर रेस’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये शहरातील अनेक जण सामील झाले. उपलब्ध जैवविविधता यांची नोंद घेतली. डोंबिवलीत होत असलेली वृक्षतोड थांबविणे, तसेच वृक्षारोपण करणे हेदेखील चालू केले. व्हॉट्सअ‍ॅपचा एक ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपद्वारेदेखील जनजागृती केली जाते.

डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात जवळजवळ २०० पेक्षा अधिक स्थायिक स्थलांतरित पक्षी आढळून येतात, हेदेखील त्यांनी प्रत्यक्षरित्या अनुभवले आहे. डोंबिवलीतील भोपर, सातपूल, कोपर, उंबार्ली, गांधारी, मलंग, खोणी इत्यादी परिसरात जाऊन पक्षीअभ्यास केला आहे. अर्णवने यावर २०० पेक्षा अधिक पक्षी यांचे एक प्रेझेन्टेशन तयार केले आहे. ‘बर्ड्स इन डोंबिवली’ हा माहितीपूर्ण अभ्यासक्रम तयार केला व संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम शाळा, संस्था तसेच ऑनलाईन सादर करून निसर्ग व पक्षी जैवविविधता कशी वाचविता येईल, प्रदूषण कसे थांबविता येईल याची माहिती दिली जाते. तसेच, फुलपाखरे त्यांच्याकरिता आवश्यक झाडे तसेच पक्षी आकर्षित करणारी झाडे यांचीदेखील माहिती दिली. आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून शाळांमधून माहितीपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्यांना निसर्ग माहिती व ओळख करून देऊन असलेले वृक्ष वाचवून नवीन वृक्षारोपण करणे, निसर्ग अभ्यास, सहली व प्रदर्शन यांच्या माध्यमातून जनजागृती करणे असे अनेक उपक्रम राबवित आहेत. शासन व शाळा तसेच संस्था यांच्या माध्यमातून फुलपाखरू,उद्याने, तसेच पक्षी राखीव क्षेत्र तयार करणे, निसर्ग उद्याने तयार करणे यावर काम करण्याची तयारी सुरू आहे.

शहराला लागून असलेला खाडी परिसर याठिकाणी अनेक स्थानिक स्थालांतरित पक्षी व बदके येत असतात. परंतु, ते पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत चाललेले आहे. लोक निर्माल्य व कचरा प्लास्टिकच्या पिशवीत आणून पिशवीसह त्या पाण्यात टाकून देतात. यावरदेखील शासनाने व येथील ग्रामस्थ यांच्यामार्फत जनजागृती करून हे प्रदूषण थांबविण्याकरिता प्रयत्न करीत आहेत. त्याकरिता एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून लवकरच स्थानिक प्रशासनाला देणार असून, त्यांच्या मदतीने तेथे फलक लावणे व इतर मार्गाने जलप्रदूषण थांबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शाळांमधून शिक्षकांना हे उपक्रम दाखवून त्यांच्यामार्फत विद्यार्थी यांना निसर्ग संवर्धनाचे धडे दिले, तर येणार्‍या पिढीला निसर्गाचे महत्त्व कळेल, याकरिता शासनामार्फत काही उपक्रम व अभ्यासक्रम दिला जावा, याकरिता संस्था प्रयत्न करीत आहे.

पतंग उडविताना मांजामध्ये अनेक पक्षी अडकतात याविषयी देखील जनजागृती करण्यात येत आहे आणि असे पक्षी आढळल्यास त्यांना वाचविले जाते. जखमी असल्यास त्यांना वनखाते किंवा संबंधित ठिकाणी देऊन त्यांचा प्राण वाचविण्याचा व निसर्ग टिकविण्याचा प्रयत्न संस्था करीत असते. गणेशोत्सवात थर्माकोलचा वापर करू नये व मूर्ती ही शाडूची असावी, याकरितादेखील संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. त्यासाठी जनजागृती केली जाते. पक्ष्यांना उन्हात पाणी जरूर ठेवावे. परंतु, त्यांना अन्न शक्यतो देऊ नये, नाहीतर त्यांच्या अन्न शोधण्याची सवय जाते व चुकीचे अन्न दिल्याने त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, याकरितासुद्धा जनजागृती संस्था करीत असते. निसर्गाचे चक्र असते आणि ते विस्कटले, तर अनेक आपत्ती येऊ शकतात. महाडचा महापूर किंवा सध्या वाढत असलेले तापमान हा त्याचाच एक भाग आहे.

निसर्ग नष्ट झाला की, काहीच टिकणार नाही आणि निसर्गचक्रामधील एक जरी गोष्ट कमी अधिक होऊन संतुलन ढासळले, तर संपूर्ण शहर जलमय होणे, उष्माघात तसेच त्यामुळे येणारे अनेक प्रकारचे रोग याचा भविष्यात सामना करावा लागेल आणि आपण ही जीवसृष्टीचाच एक भाग आहोत त्यामुळे निसर्ग संपला, तर मानवी जीवनदेखील धोक्यात येईल. हातरूमालाऐवजी टीश्यू पेपरचा अवास्तव वापरदेखील टाळला पाहिजे. कारण सर्वच कागद हा पुननिर्मिती प्रक्रियेत जात नाही. त्यामुळे वृक्ष नष्ट होतात आणि नवीन झाडे वाढण्यास १५ ते २० वर्षे लागतात. त्यामुळे कागदाचा वापर करणेदेखील वाचविले पाहिजे. अनेकदा घरामध्ये विविध भारतीय पक्षी पाळले जातात. उदा. पोपट. पण असे करणे बेकायदेशीर आहे. त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहून देणे योग्य आहे. या सर्व विषयावर जनजागृती करणे सध्या चालू आहे. तसेच, याकरिता जनता प्रशासन, प्रसिद्धी माध्यमे आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येणे गरजेचे आहे व त्याकरिता संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

नवी मुंबईला बेलापूर येथे एक निसर्ग उद्यान आहे. जे शासनाच्या एका विभागाने विकसित करून त्याची देखभाल केली जाते. तिथे अनेक प्रकारचे जैवविविधता व पक्षी आहेत. आंबिवली येथे देखील महापालिकेने एक उद्यान केले आहे. तेदेखील सुंदर असून पक्षी निरीक्षक अभ्यासासाठी त्याठिकाणी येत आहे, अशा प्रकारचे निसर्गाशी संबंधित सर्व प्रकारचे उपक्रम राबविण्याचा आणि जनजागृती करण्याचा संस्थेचा मानस आहे. अर्णवसारख्या शालेय विद्यार्थ्यांनी यासारख्या उपक्रमामध्ये सामावून घेऊन त्यांच्याद्वारे जनजागृती करणे व पुढच्या पिढीत त्यांची गोडी निर्माण करणे यासाठीदेखील प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच ‘राखूया सृष्टीचे भान, करूया निसर्गाचा सन्मान’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.
Powered By Sangraha 9.0