नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री तसेच मैतेई आणि कुकी समुदायाचे प्रतिनिधी आणि इतर संबंधितांसोबत राज्यात शांतता पुनर्स्थापित करण्यासंदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विविध बैठका घेतल्या. अमित शहा यांनी नुकतीच नवी दिल्लीत मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग, त्यांच्या मंत्रिमंडळातील चार सहकारी आणि राज्यसभा खासदार यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी मैतेई समुदायाच्या प्रतिनिधींचीही भेट घेतली. शहा यांनी मणिपूरमधील कुकी समुदायाच्या प्रतिनिधींसोबत आणि मिझोराममधील नागरी समाज संस्थांच्या गटाबरोबर देखील बैठक घेतली.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी या बैठकीदरम्यान मणिपूरमध्ये शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. मणिपूरला दोन जातीय समुदायांमधील हिंसक संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले तसेच चिरस्थायी शांतता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण सहकार्य आणि मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्यातील विविध समुदायांच्या संरक्षणासाठी सरकार सर्व उपाययोजना करेल, असे आश्वासनही अमित शहा यांनी दिले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व घटकांशी चर्चा करून शांततेचा संदेश पसरवण्याचे आवाहन केले आणि सर्वांना योग्य न्याय मिळेल असे आश्वासन दिले. लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी मदत आणि पुनर्वसन कार्याला गती देण्यावरही अमित शहा यांनी भर दिला.