थायलंडची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीतील विरोधी पक्ष ’मूव्ह फॉरवर्ड पार्टी’ आणि ’लोकलुभावन फीयू थाई पार्टी’ यांचा दणदणीत विजय झाल्याने येथील सरकारला सत्तापालटास सामोरे जावे लागले आहे. थायलंडमधील या विरोधी पक्षांनी तब्बल एक दशक सत्तेवर असलेल्या सैन्य समर्थित राजवटीचा निवडणुकीत पराभव केला.
गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताबदलाची मागणी करत असणार्या जनतेच्या दृष्टीने ही निवडणूक म्हणूनच खूप महत्त्वाची ठरली. थायलंडच्या जनतेला राज्यकारभारात बदल हवा होता, असे जनतेचे मत असल्याचे विरोधकांचे म्हणणे. त्यामुळे आता थायलंडचा नवे पंतप्रधान कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण, पेटोंगटार्न शिनावात्रा यांच्या नेतृत्वाखालील ‘फीयू थाई’ पक्षाला ५०० सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात सर्वाधिक जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, झालेल्या मतदानाच्या आधारे निर्णय होऊ न शकल्याने पुढील सरकारच्या नेतृत्वाबाबत संभ्रम कायम आहे.
खरं तर देशाचे नवे पंतप्रधान कोण असतील, याची निवड जुलैमध्ये कनिष्ठ सभागृह आणि २५० सदस्यीय सिनेटच्या संयुक्त अधिवेशनात होईल. त्यासाठी विजयी उमेदवाराकडे किमान ३७६ मते असणे आवश्यक आहे. पण, आजघडीला तरी कोणत्याही पक्षाला स्वबळावर या आकड्याला स्पर्श करणे, हे सर्वात मोठे आव्हानच. यंदा झालेले मतदान हे २०२० मध्ये तरुणांच्या नेतृत्वाखालील लोकशाही समर्थक निदर्शनांनंतरचे पहिले आणि २०१४ मध्ये लष्करी बंडानंतरचे दुसरे मतदान. येथील लष्कराने २०१४ मध्ये निवडून आलेल्या सरकारची हकालपट्टी केली आणि प्रयुथ चान-ओचा यांच्या नेतृत्वाखालील एक पुराणमतवादी गट पुनर्संचयित करण्यात आला. ’मूव्ह फॉरवर्ड’ आणि ’फीयू थाई’हे दोन विरोधी पक्ष प्रयुथ चान विरोधी आहेत. ९७ टक्के मतांची मोजणी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ‘मूव्ह फॉरवर्ड पार्टी’ने सर्वाधिक जागा जिंकल्या असून ‘फीयू थाई पार्टी’ दुसर्या स्थानावर आहे. थायलंडमधील जनता पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांच्यावर नाराज होती, असे सांगण्यात येते. २०१९ दरम्यान झालेल्या निवडणुकीत ’फीयू थाई’ पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या.
दरम्यान,त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या सैन्य-समर्थित पक्षाने प्रयुथसोबत युती करून पुन्हा निवडणूक लढवली. इथली जनता पंतप्रधान प्रयुथ चान यांच्याबाबतीत नाखूश होती. कारण, थायलंडमधील ढासळणारी अर्थव्यवस्था, महामारी आणि लोकशाही सुधारणांच्या अपयशाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, तरीही २०१४ मध्ये सत्तापालट झाल्यानंतर त्यांना सर्वाधिक काळ काम करणार्या पंतप्रधानांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. ‘मूव्ह फॉरवर्ड पार्टी’ आणि ‘फियू थाई पार्टी’यांनी पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांच्या पक्षाविरोधात निवडणूक लढवली असून, दोन्ही विरोधी पक्षांची युती होऊ शकते, असे येथील स्थानिक माध्यमांतून सांगितले जात आहे. ’मूव्ह फॉरवर्ड पार्टी’चे नेते पिटा लिमजारोएनराट यांच्या म्हणण्यानुसार, ते ’फियू थाई पार्टी’सह आणखी सहा पक्षांची युती बनवण्याचा प्रयत्न करू शकतात. ‘मूव्ह फॉरवर्ड पार्टी’ आणि ‘फियू थाई पार्टी’ यांना खालच्या सभागृहातील ५०० जागांपैकी २९२ जागा मिळतील, अशी अपेक्षा होती.
निवडणूक आयोगाच्या आलेल्या आकडेवारीनुसार, ‘मूव्ह फॉरवर्ड पार्टी’ला १४.१ दशलक्ष आणि ‘फियू थाई पार्टी’ला १०.८ दशलक्ष मते मिळाली आहेत. यावरून नक्कीच असे दिसते की, थायलंडमधील ही निवडणूक देशाच्या राजकारणासाठी सर्वात महत्त्वाची ठरली. सध्याचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा २०१४ मध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर सत्तेत आले होते. त्यावेळी ते थायलंडच्या लष्कराचे कमांडर-इन-चीफ म्हणून काम करत होते. झालेल्या सत्तापालटानंतर ते थायलंडचे पंतप्रधान झाले. यावेळी झालेल्या निवडणुकीत मात्र प्रयुथ चान-ओचा यांना ‘मूव्ह फॉरवर्ड’ आणि ‘फियू थाई’ पक्षांनी आव्हान दिले. एकीकडे ‘मूव्ह फॉरवर्डपार्टी‘चे नेतृत्व पिटा लिम्जारोएनरत करत असून दुसरीकडे फिउ थाई पक्षाचे नेतृत्व माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांच्या कन्या पेटोंगटार्न शिनावात्रा या करत आहेत. त्यामुळे थायलंडचे नवे पंतप्रधान कोण होणार? याकडे आता जनतेचे लक्ष लागून आहे.