मुंबई : अनेक राज्यांतून केरला स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्यात येत आहे तर काही राज्यात चित्रपटाचे मोफत प्रयोग राजकीय नेते आणि सामाजिक संस्थांच्या मार्फत आयोजित केले जात आहेत. विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मत यानिमित्ताने जाणून घेतले जाते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील यानिमित्ताने आपले मत मांडले आहे.
प्रमोद सावंत यांनी पालकांना आणि तरुणाईला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. जगभरात दहशतवादाची सुरुवात कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय. सावंत पुढे म्हणतात, “या चित्रपटात दहशतवादाची खरी कथा दाखवण्यात आली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, सीरिया आणि जगातील इतर भाग, त्याचसोबत भारतातील काही भागात आयसीस (ISIS) ही संघटना धर्मांतर आणि दहशतवादात कशा पद्धतीने सहभागी आहे हे यातून कळतं. ही खरी कथा आहे. त्यामुळे पालकांनी आणि तरुणांनी हा चित्रपट पहायलाच हवा”
ते पुढे म्हणाले, “आपल्याला खरी परिस्थिती कळायला हवी आणि दहशतवाद पसरण्याबाबत आपण जागरूक असायला हवं. अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि हळूहळू पसरणारं हे विष थांबवावं याची काळजी आपण घ्यायला हवी. दहशतवादाचं नेटवर्क दिवसेंदिवस वाढतंय आणि ते कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हायला पाहिजेत. ब्रेन वॉश आणि हिप्नोटिस्म यांमुळे लोक त्याला कसे बळी पडत आहेत, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. लोकांना जाळ्यात अडकवून फसवलं जातंय.”