मणिपूरचा मैतेई समाज आणि धार्मिक संघर्ष

    13-May-2023
Total Views |
maitei

मणिपूरमध्ये गेल्या १५ दिवसांत घडलेल्या वेगवान घटना, माजलेले अराजक, गृहयुद्धजनक परिस्थिती यामुळे मैतेई समाज हा भारतभरात चर्चेचा विषय झाला आहे. हे लोक नेमके कोण आहेत? त्यांच्या मागण्या काय? त्यांच्यावर कशी परिस्थिती का उद्भवली? यावर यानिमित्ताने बरीच चर्चा घडते आहे. पण, मैतेई समाज, त्यांचा इतिहास, त्यांच्या धारणा, धार्मिक आस्था, सामाजिक व्यवस्था, व्यवसाय, कला याविषयी जाणून घेणेही खूप महत्वाचे आणि मनोरंजकही आहे.

सर्वप्रथम आपण मणिपूरची भौगोलिक परिस्थिती समजून घेऊ. मणिपूरच्या उत्तरेला नागालॅण्ड आणि आसाम, दक्षिण आणि पश्चिमेला मिझोराम आणि सगळी पूर्व व अर्धी दक्षिण सीमा म्यानमारने वेढलेली आहे. चारही बाजूने वेढलेल्या डोंगररांगा आणि मध्ये सपाट मैदानी प्रदेश अशी एकंदर भौगोलिक रचना असणार्‍या या मणिपूर प्रदेशाला पंडित नेहरू ‘ज्वेल ऑफ इंडिया’ असे संबोधत असत. ‘ईशान्य भारताचे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळख मिळालेला हा अद्भुत सुंदर, निसर्गरम्य प्रदेश आज धार्मिक हिंसेच्या आगीत अक्षरशः होरपळून निघाला आहे.

दि. ३ एप्रिल रोजी ‘ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर’ (एटीएसयूएम)ने पुकारलेल्या ‘जनजातीय एकता मोर्चा’ (सॉलिडॅरिटी मार्च)दरम्यान मणिपूरमध्ये विविध ठिकाणी आंदोलक हिंसक झाले आणि इथेच दहशतीला सुरुवात झाली. मणिपूरच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये मैतेई हिंदू अल्पसंख्याक आहेत. चिन-कुकी जनजातीय चुराचंदपूर, तेंगनौपाल आणि कांगपोकपी जिल्ह्यांमध्ये प्रबळ आहेत. याचा फायदा उठवून हिंदू समाजाला लक्ष्य करून हल्ले करण्यात आले, ज्यात ७० लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. साहजिकच हे लोण इंफाळ व मैतेईबहुल भागांतही पसरले आणि त्यांनी या अत्याचारांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली.

चुराचंदपूर, सेनापती, चंदेल, कांगपोकपी आणि टेंगनौपाल जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या दहा दिवसांत या दंगली घडल्या आहेत. अनेक घरे जळून खाक झाल्याचे, फुटीरतावादी गट, आंदोलक बंदुका, आणि घातक हत्यारे, क्रूड बॉम्ब्स इत्यादी वस्तू वापरून सामान्य नागरिकांवर अत्याचार आणि प्रचंड नासधूस करत असल्याचे अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. बंदुकीचे एक अख्खे दुकानाच चुराचांदपूरमध्ये लुटले गेले. अशा भीषण परिस्थितीमुळे स्वाभाविकपणे सरकारने ‘कर्फ्यू’ जाहीर केला. विविध राज्यांतून सैनिकी व अर्धसैनिकीबलांच्या १२० तुकड्या तसेच वायुसेनेच्या तुकड्या आजघडीला मणिपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. यात अजूनही वाढ होत आहे. बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक ठप्प केली गेलेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नाईलाजास्तव इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. आठ हजारांहून अधिक लोकांची सुरक्षित स्थळी व्यवस्था लावण्यात यंत्रणांना यश आले आहे. ४० हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. इतकी प्रचंड दक्षता घेऊनही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या अराजकसदृश परिस्थिती संदर्भात विविध प्रकारची खोटी, चुकीची, उलटसुलट माहिती नेहमीप्रमाणेच डाव्या मुखपत्र, समाजमाध्यमांतून प्रसारित केली जात आहे. ते लोक या घटना म्हणजे उच्चवर्णीय हिंदूंचा गरीब, जनजातीय समाजावर अन्याय अशा प्रकारे रंगवतात. परंतु, हा सगळा प्रकार अनेक गुंतागुंतीच्या घटनांचा, परिस्थितींचा परिपाक आहे. इंफाळ उच्च न्यायालयात २०१२ पासून मैतेई हिंदूंना जनजातीय दर्जा व अधिकार द्यावेत, याकरिता चालू असणार्‍या केसला वेग आला आहे. हे कारण पुढे करून तिथे अराजकाची सुरुवात झाली. केंद्र व राज्य सरकारने या प्रकरणात अतिशय सुबक, सुनियोजित हालचाली करून सामान्य नागरिकांचे शिरकाण होण्यापासून मोठ्या प्रमाणात त्यांना वाचवले आहे. पण, सर्वसामान्य भारतीय समाजानेही देशविघातक शक्ती, चर्चचे षड्यंत्र ओळखून नेहमीसारखा सर्वधर्मसमभाववादी दृष्टिकोन जरा बाजूला ठेवून उघड्या डोळ्यांनी सभ्यतांच्या दीर्घ युद्धातली एक लढत म्हणून, या अराजकाकडे पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी बाकीच्या अनेक उजेडात न आलेल्या पैलूंचा विचार करणे गरजेचे आहे. यानिमित्ताने मैतेई समाजाचीही ओळख या लेखात करून घेऊ.

मैतेई समाज हा अतिशय शूर, शक्तिशाली, स्वाभिमानी, कट्टर धार्मिक, सामाजिक, अध्यात्मिक, बौद्धिकदृष्ट्या अतिशय प्रगल्भ, प्रगत समाज म्हणून ओळखला जातो. मातृसत्ताक राज्य म्हणून या राज्याची ओळख आहे, तीही या मैतेई समाजाच्या स्त्रियांकडे पाहण्याच्या विशाल, प्रगल्भ दृष्टिकोनामुळेच. या राज्याची आणि पर्यायाने समाजाची स्वतःची अशी पाच हजार वर्षे जुनी परंपरा आहे. विविध खेळ, युद्धकला, विणकाम, पाककला, नृत्य, गायन, विज्ञान, व्यापार अशा कितीतरी गोष्टींत हा समाज शेकडो, हजारो वर्षे पारंगत आहे. महाभारतकाळात श्रीकृष्णाने या राज्याचा शोध लावला असे म्हणतात. अर्जुनाची पत्नी चित्रांगदा आणि पुत्र अतिशय पराक्रमी बब्रूवाहन हे मणिपुरीच होते. सौंदर्याचे नैसर्गिक वरदान लाभलेल्या मणिपुरी स्त्रिया अत्यंत कर्तबगार आणि जबाबदार असतात. बहुतांश घरांत आर्थिक, व्यावसायिक जबाबदारी स्त्रियाच घेताना दिसतात. मैतेई समाजाचे अतिशय प्रसिद्ध असे शास्त्रीय नृत्य म्हणजे ‘रासलीला’ येथे नर्तिका सादर करतात. पोटलुई नावाचा सुंदर वेष परिधान केलेल्या मणिपुरी नर्तिका नजर हलणार नाही, इतक्या सुरेख दिसतात. रसिकांना सात्विक, अध्यात्मिक आनंद देणारे हे नृत्य अनुभवायलाच हवे असे. पुरुष मणिपुरी नृत्यकार, वादक, गायक, मृदंग, मंजिर्‍या एकतालात वाजवत जेव्हा विष्णूस्तुतीची कवने गात, अतिशय सुरेख नृत्य सादर करतात, तेव्हा कृष्णरुपाशी सारा परिसर, प्रेक्षक, कलाकार एकरूप होऊन गेले आहेत की काय, असा भास होतो. या प्रकारच्या मणिपुरी नृत्याला ‘नट संकीर्तन’ किंवा ‘मैतेई संकीर्तन’ असे म्हणतात. ‘युनेस्को’च्या ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा’ या यादीमध्ये समाविष्ट करून या लोकनृत्याला जागतिक दर्जा देऊन गौरवण्यात आले आहे.

अभिमान वाटावा असा मणिपूरच्या इतिहासातला दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे, इथल्या विविध खेळांच्या हजारो वर्षांपूर्वीपासूनच्या परंपरा. आज ज्या खेळांना आपण ‘पोलो’, ‘रग्बी’ म्हणून ओळखतो, ते मैदानी खेळ मणिपूरमध्ये गेली शेकडो वर्षे खेळले जात आहेत. अजून एक पुराणकाळापासून चालत आलेले हत्यार म्हणजे ‘आरामबाई.’ भाला आणि बाणाच्या प्रकारचे हे हत्यार विषारी असत असे. आजही हे हत्यार वापरायची कला मणिपुरी समाजात जीवंत आहे. जी गोष्ट नृत्य, गायन, खेळांची तीच युद्धकलेची. मणिपूरचा स्वतःचा असा एक (मार्शल आर्ट फॉर्म) स्वसंरक्षण कला प्रकार आहे, ज्याला ‘थांग टा’ असे म्हटले जाते. तलवार, भाला घेऊन हा युद्धप्रकार खेळला जातो. अनेक मणिपुरी तरुणतरुणी हा युद्धप्रकार आजही आवडीने शिकून घेतात. अशी ओजस्वी परंपरा असल्यावर, मणिपुरी खेळाडूंनी भारताला कित्येक जागतिक दर्जाची पदके मिळवून दिली आहेत, यात आश्चर्य ते काय?

विणकामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर ‘साफीलाँपी’ ही एक पारंपरिक वस्त्रकला आहे. युद्धातील विजयाची अनेक प्रतीके जसे की हत्ती, मोर, मासे, भाले यावर विणलेले असतात. या वस्त्रांना विशेष असा ‘जीआय’ दर्जा प्राप्त आहे. सुंदर रंगीत हातमागावरील कापडांवर हे सुबक विणकाम केलेले असते. असेच अजून एक सुंदर नाजूक वस्त्र म्हणजे ‘वांखाई फी.’ सणासुदीला, प्रामुख्याने लग्नकार्यांत या ओढणीला विशेष महत्त्व असते. आपण हल्ली ‘ऑरगेंझा’ प्रकारच्या नाजूक साड्या वापरतो. त्याची मूळ कल्पना या नाजूक, तलम मणिपुरी वस्त्रात आहे. कमळाच्या तंतूंपासूनही येथे वस्त्रे विणली जातात. हे रेश्मी कापड अत्यंत महाग असते.

असे विविध प्रकारच्या कारागिरीचे अनेक सुंदर नमुने मणिपुरी समाजाने विकसित केलेले आहेत. त्यातीलच एक प्रकार म्हणजे अन्नाची चव आणि पोषकता वाढवणारी काळ्या मातीची भांडी. ही विशेष मातीही मणिपूरमध्येच आढळते. इथल्या विविध परंपरा, पाककला, धार्मिक अध्यात्मिक संकल्पनाही अतिशय उन्नत व शुद्ध भारतीय, हिंदू स्वरूपाच्या असल्याचे पदोपदी लक्षात येते. असे असूनही सतराव्या शतकात एका मणिपुरी जनजातीय राजाने हिंदू धर्म स्वीकारला आणि सगळ्या समाजावर तो लादला, असे सांगितले जाते. ऐतिहासिक चुका कोणत्या समाजात घडल्या नाहीत? मणिपूरमध्येही काही अघटित घडलेले असू शकते. पण, याचा गैरवापर करून गेली हजारो वर्षे सर्वच हिंदू राजांनी क्रौर्याने, बलाचा वापर करून जगभरात हिंदू धर्माचा प्रसार केला असा अपप्रचार केला जातोय. मणिपूरच्या कथित इतिहासाचे खापर संपूर्ण जगभरातील हिंदू या धार्मिक संप्रदायावर फोडणे हे हिंदूंच्या विरोधातील षड्यंत्र आणि अन्याय नव्हे काय? असो.

तर हे मैतेई लोक प्रामुख्याने मणिपूरच्या खोर्‍यात म्हणजे मैदानी प्रदेशात राहतात. त्यांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ५३ टक्के आहे, तर येथील पहाडी भागांत जे वेगवेगळे नागा, मिझो/कुकी ‘नामधारी जनजातीय लोक’ राहतात, ते मात्र जवळपास १०० टक्के ख्रिश्चन धर्मांतरित आहेत. हे लोक प्रामुख्याने बांगलादेशातील चितगाँग पहाडी इलाका, भारतातील मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅण्ड या राज्यांतील डोंगररांगा व म्यानमारमध्ये पसरलेले आहेत. हे लोक १८ व १९व्या शतकात आत्ताच्या भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात राहायला यायला लागले, असे म्हटले जाते. अर्थात, कुकी लोक ही आमची पूर्वापार वडिलोपार्जित जमीन आहे, असेच मानतात. परंतु, या विषयावरून त्यांचे नागा आणि पैतें जनजातींबरोबर या आधीही असेच हिंसक संघर्ष झालेले आहेत. त्यामुळे त्यांना जमिनींच्या वादावरून युद्धप्रसंग नवा नाही. ही लोकसंख्या जवळपास ४२ टक्के आहे. तसेच काही मैतेई महिला व मुस्लीम सैनिकांचे वंशजही आहेत. हा पांगल म्हणजेच मुस्लीम समाज आठ ते नऊ टक्के आहे. आसामच्या दक्षिणेकडील मुस्लीमबहुल जिल्ह्यांतील मुस्लीम समाज, बांगलादेशातील घुसखोर हे नेहमी एकमेकांच्या पाठीशी असतात. मणिपूरच्या लोकसंख्येची टक्केवारी खूपच अस्थिर आहे. दर दशकात हिंदूंची टक्केवारी कमी होत जाताना पाहायला मिळते आहे. १९०१ साली ९६ टक्के असणारा हिंदू समाज, आज केवळ ५३ टक्के आहे, यातच काय ते समजून जावे.

मणिपूरातील एकूण जमिनीच्या सुमारे १५ टक्के भूभागावर समतल प्रदेश आहे, जेथे ५३ टक्के हिंदू आणि नऊ टक्के मुस्लीम राहतात आणि सुमारे ८०-८५ टक्के जमिनींवर टेकड्या आहेत, जेथे ४२ टक्के नामधारी नागा-कुकी जनजातीय म्हणजेच धर्मांतरित ख्रिश्चन राहतात. त्यामुळे आधीच उपलब्ध जमिनीची असमान वाटणी झालेली आहे. त्यात अजून एक मोठी अडचण अशी आहे की डोंगरी जमातींच्या जमिनी कायद्यानुसार आदिवासी जमिनी म्हणून पहाडी भूभाग नागा, कुकी, मिझो जनजातींसाठी संरक्षित आहेत. इतर जातीच्या लोकांना तेथे स्थायिक होण्यास, जमिनींचे व्यवहार करण्यास मनाई आहे. या टेकड्यांवरील बहुतेक रहिवासी ख्रिश्चन असल्यामुळे या भूमी अक्षरशः ख्रिश्चन संरक्षित प्रदेशच झाले आहेत. हिंदूबहुल खोर्‍यातील भागात मात्र वेगळे कायदे आहेत. कारण, मैतेई हिंदूंना ‘एसटी’ अंतर्गत वर्गीकृत केले जात नाही. त्यामुळे त्यांच्या भूमीवर कोणीही येऊन स्थायिक होऊ शकतात. याच विचित्र कायद्यांचा फायदा घेऊन टेकड्यांवरील नामधारी जनजातीय ख्रिश्चन आणि पांगल मुस्लीम, मैतेई हिंदूंना त्यांच्या घरातून आणि जमिनीवरून विविध प्रकारे हुसकून लावीत आहेत. ‘लँड जिहाद’ची अनेक उदाहरणे आपल्याला माहित असतीलच. इथेही असेच प्रकार घडताना दिसत आहेत. यामुळे अर्थातच मैतेई समाजावर असमान व अत्यंत अन्यायकारक परिस्थिती ओढवलेली आहे.

जेव्हा मणिपूर संस्थान भारतात विलीन झाले, तेव्हा मैतेई जनजातींत गणले जात होते. पण, चर्चच्या कारस्थानांना शरण जात तेव्हाच्या केंद्र सरकारने मैतेई समाजाचा जनजातीय दर्जा काढून घेतला. जर आता मैतेई समाजाला जनजातीय दर्जा प्राप्त झाला, तर चर्चचे मोठे नुकसान होईल. मैतेईंचे धर्मांतरण करणे अतिशय जिकिरीचे होऊन जाईल. तसेच मैतेईंच्या जमिनी बळकावणे बंद होऊन जाईल. आरक्षणात वाटेकरी निर्माण होणे कुकींना कदापि आवडणारे नाही. ते सध्या ख्रिश्चन अल्पसंख्याक व जनजातीय असे दुहेरी आरक्षण मिळवत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘जनजातीय लोक हिंदू नसतात’ या चर्चच्या अपप्रचाराला मोठा धक्का पोहोचेल. त्यामुळे यावर प्रचंड गोंधळ माजवला जात आहे.

आता या डोंगरी जमिनीविषयक कायद्यांचे अन्य दुष्परिणाम पाहू. मणिपूरमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्याला आता वर्ष होईल. गेल्या काही महिन्यांत सरकारने चुराचांदपूर जिल्ह्यात सॅटेलाईट मॅपिंग करून घेतले. या पाहणीमुळे अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या. वर म्हटल्याप्रमाणे सगळे पहाडी जिल्हे ख्रिश्चन समुदायांसाठी अतिशय सुरक्षित असे अड्डे बनले आहेत. त्याचा वापर करून इथे प्रचंड प्रमाणात अफूची लागवड केली जात आहे. अनेक ठिकाणी फुटीरतावादी गटांचे अड्डे, छावण्या राजरोसपणे वसू लागल्या आहेत. घुसखोरांनी अनेक नवीन गावे मोठ्या प्रमाणावर निर्माण केलेली दिसत आहेत. इथल्या लोकसंख्येत अनैसर्गिकपणे वाढ झालेली आहे. म्यानमारमधे कोम्बिंग ऑपरेशन करून म्यानमारचे सैन्य जेव्हा त्यांना सळो की पळो करून सोडते तेव्हा हे अशांतीचे पाईक मणिपूरच्या दिशेने धाव घेतात. घुसखोरी केलेल्या या चीनवंशीयांना त्यांचे इथले जातबंधू अवैधरित्या आधारकार्ड, रेशनकार्ड मिळवून देतात. त्यांना गावे वसवण्यासाठी सर्वतोपरी मदत करतात.

पाक-चिनी संस्था त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षणही देत असतात. भारतात अशांती निर्माण करण्यासाठी, विविध प्रकारच्या तस्करी करण्यासाठी, अफूच्या उत्पादनासाठी, दहशतवादी, फुटीरतावादी गट तयार करण्यासाठी यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असतो. जंगल भागात त्यांना संरक्षित करून भारतभर अमली पदार्थांची तस्करी हे अतिरेकी गट करतात. या सगळ्या कारवाया विनासायास करता याव्यात, यासाठी चर्च त्यांना सर्व प्रकारे संरक्षण उपलब्ध करून देत असते. उपलब्ध आकडेवारीनुसार, मणिपूरमध्ये १९७० साली १९५७ गावे होती. आज या गावांची संख्या २,७८८ आहे. यात पहाडी जिल्ह्यांत प्रचंड वेगाने नव्याने झालेली वस्ती सॅटेलाईटद्वारे सहज लक्षात येते. ‘पॉपी’ म्हणजेच अफूच्या लागवडीखालील क्षेत्रातही गेल्या काही वर्षांत जवळपास दुपटीने वाढ झालेली दिसत आहे.

ही आकडेवारी आणि त्यामागची सत्यता लक्षात घेऊन मणिपूर सरकारने मार्च महिन्यात एक महत्त्वाचे पाऊल उचलले. ते म्हणजे कुकी व ‘झोमी नॅशनल आर्मी’ सोबत झालेल्या युद्धबंदीच्या करारातून राज्य सरकारने आपले अंग काढून घेतले. गेले काही महिने जागोजागी झालेली अवैध बांधकामे जमीनदोस्त करावयास सुरुवात केली. अफूची शेती नष्ट करण्यास सुरुवात झाली. म्यानमार सरकारविरोधात सशस्त्र संघर्ष करणारे ख्रिश्चन अतिरेकी गट मणिपुरी-कुकी भागात घुसू नयेत, यासाठीही सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हेही या सगळ्या विषयात बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या मणिपूर भेटीने तर अतिरेकी गटांमधली अस्वस्थता अधिकच वाढली.

खरी गोम आहे ती ही!! या स्वच्छता कार्यक्रमामुळे अस्वस्थ झालेले दहशतवादी गट सक्रिय झाले व त्यांनी योजनापूर्वकरित्या आपापल्या भागातील मैतेई समाजावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. आता तर दि. १२ मे रोजी कुकी आमदारांनी कुकी-मिझो-चीन-झोमी जनजातींसाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली आहे. रोज काही ना काही भांडण काढून, मागण्या, आंदोलने करून असंतोष उकळत ठेवायचा डाव यामागे आहे. अशाप्रकारे वेगळे प्रशासकीय अधिकार देणे म्हणजे ख्रिश्चन आणि दहशती गटांना अंदाधुंदी माजवायला भारतीय संघराज्याच्या कसलाही अंकुश नसणारा भूभाग तोडून देण्यासारखे आहे. तेच तर त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘कुकी नेशन’ची मागणीही दहशतवादी गट करतच असतात. त्यासाठी त्यांच्या कारवायाही चालत असतात. हेही विसरून चालणार नाही.

अमिता आपटे
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.