चोराच्या उलट्या बोंबा! पण, साव कोण आहे?

12 May 2023 21:51:19
putin

पुतीन यांनी काढलेले उद्गार म्हणजे कांगावा आहे, चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असं पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे म्हणत असली, तरी ते पूर्ण सत्य नाही. ब्रिटन, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश हे स्वतःच्या देशांत मोठे लोकशाहीचे समर्थक वगैरे असले तरी इतरांशी वागताना त्यांची मनोभूमिका बदलते.

आज मानवी सभ्यता पुन्हा एकदा एका निर्णासक वळणावर येऊन उभी आहे.” रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन बोलत होते. “एक युद्ध आमच्यावर लादण्यात आलं आहे. आमच्या मातृभूमीविरूद्ध एका युद्धाला मोकाट सोडून देण्यात आलं आहे.” ते पुढे म्हणाले, “याला जबाबदार आहे पाश्चिमात्य राष्ट्रांची अनिर्बंध महत्त्वाकांक्षा, उद्धटपणा आणि अमर्याद हाव.” पुतीन म्हणाले, “खरं म्हणजे आम्ही पाश्चिमात्य राष्ट्र वा पौर्वात्य राष्ट्र कुणाबद्दलच मनात वैरभाव बाळगत नाही. पण, काही पाश्चिमात्य उच्चभू्र जागतिकीकरणवाल्या काळ्या शक्ती समाजांमध्ये भांडणं लावत आहेत. माणसांना माणसांविरूद्ध चिथावत आहेत. रक्तमय संघर्ष, बंडखोरी, आक्रमक राष्ट्रवाद आणि रुसोफोबिया यांना उत्तेजन देत आहेत.” नंतर युक्रेनचा स्पष्टच उल्लेख करीत ते म्हणाले, “आता युक्रेनचंच पाहा, तिथली गुन्हेगारी राजवट तिच्या पाश्चिमात्य धन्यांच्या हातातलं प्यादं बनून त्यांच्या स्वार्थी आणि क्रूर हेतूंसाठी ओलिस धरली गेली आहे.” आणि मग आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी उद्गार काढले की, “अभिवादन रशियाला! अभिवादन आपल्या शूर सैनिकांना! अभिवादन विजय दिनाला!”

दरवर्षी ९ मे या दिवशी रशियन राजधानी शहर मॉस्कोमधल्या प्रसिद्ध लाल चौकात विजय दिन साजरा केला जातो. रशियन सैन्याच्या विविध तुकड्या जोरदार पथसंचलन करतात. महत्त्वाचं म्हणजे, रशियन सैन्यात नव्याने दाखल झालेल्या किंवा होऊ घातलेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रं यंत्र, याचं प्रदर्शन केलं जात.रशियन सैन्याच्या आघात क्षमतेच्या या प्रदर्शनाची रशियाचे शत्रू आणि मित्र दोघेही नोंद घेतात. राष्ट्राध्यक्ष आपल्या भाषणात प्रचालित राजकीय स्थितीबद्दल भाष्य करतात. रशियन सरकारच्या वर्तमान राजकीय धोरणावर या भाषणातून प्रकाश टाकला जातो. हे फक्त रशियाच करतो असे नव्हे. सगळेच देश काही ना काही निमित्ताने असे कार्यक्रम घडवून आणतच असतात.

खरं म्हणजे हिटलरच्या जर्मन सैन्याने दोस्त सेनापतींसमोर शरणागती पत्करली ती दि. ७ मे, १९४५ रोजी. दोस्त राष्ट्रांचा सर्वोच्च सेनापती जनरल आयसेनहॉवर याचा चीफ ऑफ स्टाफ जनरल वॉल्टर बेडेलस्मिथ याला नाझी सेनापती जनरल आल्फे्रड जोडल याने फ्रान्समधल्या रीमझ् या शहरात लेखी शरणचिठ्ठी दिली. त्याप्रसंगी दोस्त सैन्यातील सोव्हिएत रशियाचा प्रतिनिधी म्हणून जनरल इव्हान सुस्लोपारोव्ह हादेखील हजर होता. पण, ही खबर मॉस्कोत राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टालीनला कळल्यावर त्याचं डोकं नेहमीप्रमाणे तिरकं चाललं. त्याने ती शरणागती नामंजूर करत अशी मागणी केली की, “जर्मनीच्या सर्वोच्च सेनापतीने सोव्हिएत रशियाच्या सर्वोच्च सेनापतीसमोर आणि ती देखील जर्मन राजधानी बर्लिनमध्येच तहनाम्यावर सही केली पाहिजे. हा आता रीमझ् शहरात केलाच आहे तुम्ही शांतता करार, तर तो आपण प्राथमिक पातळीचा समजू.”

थोडक्यात, स्टालिनने जनरल आयसेनहॉवरसह अमेरिका-ब्रिटन-फ्रान्स यांना धुडकावून लावीत स्वत:चं घोडं पुढे दामटलं आणि पुढची गंमत म्हणजे, जनरल आयसेनहॉवरने ही अपमानकारक मागणी चक्क मान्य केली. मग दि. ९ मे, १९४५ या दिवशी; (किंवा खरं म्हणजे ८ मे रोजी, पण मॉस्को वेळेनुसार तो दिवस ९ मे होता) बर्लिन शहरात सर्वोच्च सोव्हिएत सेनानी मार्शल जॉर्जी झुकॉव्ह याच्यासमोर, त्यावेळी उपलब्ध असलेला सर्वोच्च जर्मन सेनापती फिल्डमार्शल विल्हेल्म कायटेल याने शरणागतीच्या कागदावर सही केली. म्हणजे, ‘मी तुम्हाला आणि तुमच्या सेनापतींना कवडीची किंमत देत नाही,’ हे स्टालिनने ब्रिटन-अमेरिकेच्या राजकीय नेतृत्वाला ठोकून-ठाकून सांगितलं. जीनांनी अत्यंत उद्धटपणे आणि शिरजोरपणे मागण्या कराव्यात आणि काँग्रेस नेत्यांनी बावळटपणे त्या मान्य कराव्यात, यात नवल नव्हतं. जसा समाज, तसे त्याचे नेतेे! पण, ब्रिटन-अमेरिकेने स्टालिनची ही मुजारी का मान्य केली? उत्तर नाही.

असो. तर या प्रसंगानंतर काही काळाने सोव्हिएत रशियाने दरवर्षी ९ मे हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करायला सुरुवात केली. सर्व प्रांतांचे म्हणजेच सोव्हिएत सोशलिस्ट प्रजासत्ताकांचे प्रमुख त्या सोहळ्याला हजेरी लावत. शिवाय, एखादा वजनदार परदेशी पाहुणा बोलावला जाई. भरपूर डामडौल आणि इतमामासह दिवस साजरा केला जाई.

तसाच तो परवा दि. ९ मे रोजी साजरा करण्यात आला. मात्र, यंदा नव्या शस्त्रास्त्रांची अनुपस्थिती उल्लेखनीय होती. रशियन रणगाडा दल हे या दिवसाचं फार मोठं आकर्षण असतं. दुसर्‍या महायुद्धात रणगाडा दलाने मोठाच पराक्रम गाजवला होता. पण, महायुद्धानंतर हंगेरी, झेकोस्लोव्हाकिया वगैरे देशांमधली साम्यवादी राजवटींविरुद्धची बंडं याच सोव्हिएत रणगाड्यांनी अक्षरश: चिरडून संपवली होती. यंदाच्या संचलनात ‘टी-३४’ जातीचा फक्त एक रणगाडा होता. याचा अर्थ अगदीच काही नव्हतं असा नव्हे. ‘एस-४००’ या नावाने ओळखली जाणारी सुमारे ३८० ते ४०० किमी पल्ल्यापर्यंत मारा करू शकणारी क्षेपणास्त्र प्रणाली होतीच. ती तशी माहितीतलीच आहे. एकदम नवी होती ती ‘आर एस-२४ यार्स’ नावाची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली. तिचा पल्ला आहे ११ हजार ते १२ हजार किमी.

यंदाच्या विजय दिनाला किर्गिजस्तान, कझाकस्तान, ताजिकीस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान; तसंच बेलारूस आणि आर्मेनिया एवढ्या देशांचे प्रमुख उपस्थित होते. हे सगळेच देश १९९१च्या आधी सोव्हिएत रशियाचे मांडलिक देश, चुकलो, सोव्हिएत सोशलिस्ट प्रजासत्ताक प्रांत होते. हे आपल्याला माहीतच आहे. एक बारीकसा पण ध्यानात ठेवण्याचा मुद्दा म्हणजे, शेवटी ‘स्तान’ उपपद असणारे पाच देश हे आशियाई, तुर्कवंशीय, मुसलमानी देश आहेत. आर्मेनिया हा देखील आशियाई, पण ख्रिश्चन देश आहे. बेलारूस हा युरोपीय ख्रिश्चन देश आहे. हे सगळे आज स्वतंत्र असले तरी रशियाचे मित्र आहेत किंवा त्यांना स्वत:बरोबर ठेवण्यात पुतीन यांनी यश मिळवलं आहे, असं म्हणूया.

आता सुरुवातीच्या पुतीन यांच्या उद्गारांकडे वळूया. साधारणपणे जर्मनीपासून पुढचे पूर्वेकडचे सगळे देश आपल्या भूमीला ’मातृभूमी-मदरलँड’ न म्हणता ’पितृभूमी-फादरलँड’ असे म्हणतात. रशियातही परंपरेने ‘पितृभूमी’ म्हटलं जातं. याऐवजी पुतीन यांनी यंदा ‘मातृभूमी’ का म्हटलं असावं? दुसरा मुद्दा, आमच्याविरूद्ध युद्ध सोडण्यात आलं आहे? म्हणजे कुत्र्याला सशाच्या नाहीतर डुकराच्या अंगावर शिकारीसाठी छूः करून सोडतात तसं? मग २०१४ साली तुम्ही क्रीमिया हा युक्रेनचा व्यापारीदृष्ट्या अतिशय मोक्याचा प्रांत बळकावला, त्याचं काय? आणि आमच्या मनान पूर्व किंवा पश्चिम कुणाबद्दलच वैरभाव नाही? मग पूर्वीच्या सोव्हिएत हस्तकांवर विषप्रयोग का हो केले जातात? आणि युक्रेन हे महत्त्वाकांक्षी, दुष्ट पाश्चिमात्य सत्तांच्या हातातलं प्यादं बनलं आहे?मग हे सगळे आर्मेनिया, बेलारूस आणि शेवटी ’स्तान’ लावणारे ‘तुर्की’ देश तुमच्या हातातली प्यादी नाहीत वाटतं?

आणि हे सगळं बोलण्याच्या आधी काही तास तुमच्या काळ्या समुद्रातल्या लष्करी-नाविक तळांवरून युक्रेनमधल्या विविध महत्त्वाच्या ठिकाणांवर तब्बल २५ क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा झाला होता, त्याचं काय ? युक्रेनी लष्करी उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितलं की, या २५ पैकी २३ क्षेपणास्त्रं आमच्या प्रतिक्षेपणास्त्रांनी लक्ष्यावर पोहोचण्याआधीच काटली. रशियन सैन्याला ९ मे पूर्वी युक्रेनच्या पूर्वेकडचं बाखमुत हे शहर पूर्णपणे आणायचं होतं. पण, ते साध्य झालेले नाही. युक्रेनियन सेना प्राणपणाने प्रतिकार करीत आहेत. यात बाखमुत शहर जवळपास संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. पण, प्रतिकार थांबलेला नाही.

आता प्रश्न असा आहे की, पुतीन यांनी काढलेले उद्गार म्हणजे कांगावा आहे, चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असं पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे म्हणत असली, तरी ते पूर्ण सत्य नाही. ब्रिटन, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश हे स्वतःच्या देशांत मोठे लोकशाहीचे समर्थक वगैरे असले तरी इतरांशी वागताना त्यांची मनोभूमिका बदलते. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि पोर्तुगाल हे प्रमुख युरोपीय देश आजही हे विसरलेले नाहीत की, एकेकाळी आम्ही जगावर राज्य गाजवलं होतं आणि त्यात आमचा प्रमुख प्रतिस्पर्धी होता झार लोकांचा अवाढव्य रशिया. आम्ही गोरे आहोत, पुढारलेले, प्रगत आहोत, विज्ञान-तंत्रज्ञानात श्रेष्ठ आहोत. तेव्हा, पूर्वीसारखं मुलुखगिरीने नव्हे, पण व्यापारीदृष्ट्या आम्ही जगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. अमेरिकेत शस्त्रास्त्र उत्पादन आणि औषध उत्पादन असे दोन गट (लॉबीज्) अत्यंत-श्रीमंत आणि त्यामुळे अतिप्रभावी आहेत.

आपली उत्पादनं खपावीत म्हणून देशादेशांमध्ये, टोळ्याटोळ्यांमध्ये भांडणं लावणं, बंड, क्रांत्या, सशस्त्र घातपात घडवणं, असे सगळे उद्योगहे गट बिनबोभाट दरोबस्त करीत असतात. एक जुनं उदाहरण पाहू - पाकिस्तानच्या जन्मापासूनच अमेरिका त्याला सर्वप्रकारची भरपूर मदत देत होती, १९६२ साली चीनने भारतावर अचानक आक्रमण केलं. भारताचा मित्र म्हणवणार्‍या सोव्हिएत रशियाने सरळ हात वर केले. आता यांना कोण? तर भारतातले सगळे डावे विचारवंत रोज सकाळी उठल्याबरोबर ज्या अमेरिकेला लाखोली वाहायचे, तीच अमेरिका धावली. अमेरिकेने भारताला शस्त्रास्त्रं, वाहनं, अन्नधान्य सगळं पुरवलं. म्हणजे भारत आणि चीन यांच्या संघर्षात भारत दुर्बल आणि चीन सबल होऊन सत्तासमतोल बिघडता कामा नये.

पण, पुढच्याच वर्षी अमेरिकेने पाकिस्तानला भरपूर अत्याधुनिक पॅटन रणगाडे, सेबर जेट विमान आणि ‘मॅप’ नामक तोफा पुरवल्या. म्हणजे भारत आणि पाक यांच्या संघर्षात पाक दुर्बल ठरून सत्तासमतोल बिघडता कामा नये. सत्तासमतोल वगैरे सभ्य शब्दांचा रस्त्यावरच्या भाषेतला अर्थ असा की, कोंबडी झुंजत राहिली पाहिजे. मरता कामा नये. म्हणून दाणे टाका. ते दाणे खाऊन कोंबडी मस्तीत आली की, द्या सोडून त्यांना झुंजायला, भरपूर करमणूक. पेपरवाल्यांना काम. अन्नधान्य, औषध, शस्त्रास्त्रं, अन्य साहित्य अशा सर्वच क्षेत्रांना भरपूर काम. भरपूर धंदा. पुन्हा मदतीसाठी धावल्याबद्दल आणि लोकशाहीचं रक्षण केल्याबद्दल स्वतःचाच डंका पिटवून घ्यायचा, तर युक्रेनला मदत करण्यामागे हीच सगळी कारणं आहेत. युक्रेन देश हा संपूर्ण युरोप खंडाचं गव्हाचं कोठार आहे. तेव्हा तो पुरवठा धोक्यात येेता कामा नये. तात्पर्य, पुतीन काय नि पाश्चिमात्य देश काय, कुणीच सरळ नाही.
झांजिबार, झांजिबार, झांजिबार...जग हा चोरांचा बाजार!

Powered By Sangraha 9.0