एकविसाव्या शतकाच्या धोरणांनुसार नव्या शिक्षण धोरणाची निर्मिती – पंतप्रधान नरेंद्र मोदी

12 May 2023 18:48:55
narendra modi

नवी दिल्ली
: भारतात आज एकविसाव्या शतकाच्या गरजा लक्षात घेऊन नव्या व्यवस्थांची निर्मिती होत आहे. त्यानुसारच नव्या शिक्षण धोरणाची निर्मिती करण्यात आली असून ते अधिक व्यावहारिक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले आहे. गुजरात येथे आयोजित अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात ते बोलत होते.

भारतात एकविसाव्या शतकातील गरजांनुसार नवीन व्यवस्था तयार करत आहे आणि हे लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित ठेवणाऱ्या जुन्या अप्रासंगिक शिक्षण पद्धतीची जागा राष्ट्रीय शिक्षण धोरण घेत आहे, असे ते म्हणाले. हे नवीन धोरण व्यावहारिक आकलनावर आधारित आहे असे सांगत पंतप्रधानांनी त्यांच्या बालपणापासूनच्या शिकण्याच्या वैयक्तिक अनुभवांची आठवण करून दिली आणि शिकण्याच्या प्रक्रियेत शिक्षकांच्या वैयक्तिक सहभागाच्या सकारात्मक फायद्यांवर भर दिला.

राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेतून शिक्षणाच्या तरतुदीवर प्रकाश टाकत भारतावर ब्रिटिशांनी २०० वर्षांहून अधिक काळ राज्य केले तरी इंग्रजी भाषा काही मोजक्या लोकांपर्यंतच मर्यादित असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. मात्र त्यांनतर निर्माण झालेल्या व्यवस्थेने इंग्रजीतून शिकण्याला प्राधान्य दिल्याने प्रादेशिक भाषांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम शिकलेल्या प्राथमिक शिक्षकांना याचा फटका बसला .मात्र विद्यमान सरकारने प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण सुरू करून त्यात परिवर्तन केले, यामुळे प्रादेशिक भाषांना प्राधान्य देणाऱ्या शिक्षकांच्या नोकऱ्या वाचल्या, याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. सरकार प्रादेशिक भाषांमधील शिक्षणावर भर देत आहे ज्यामुळे शिक्षकांचे जीवनमान देखील सुधारेल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

गुजरातमध्ये ४४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी - राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुमारे ४४०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये शहर विकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, रस्ते आणि परिवहन विभाग आणि खाणकाम आणि खनिज विभाग यांच्याशी संबंधित २४५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनाचा समावेश होता. पंतप्रधानांनी पंतप्रधान आवास योजनेच्या(ग्रामीण आणि शहरी) सुमारे १९५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली आणि या योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सुमारे १९,००० घरांच्या गृहप्रवेश कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि त्यांनी या घरांच्या चाव्या लाभांर्थ्यांकडे सुपूर्द केल्या. या लाभार्थ्यांसोबत त्यांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून संवाद देखील साधला.

Powered By Sangraha 9.0