हजारोंचे प्राण वाचविणारा ‘देवदूत’

12 May 2023 20:02:35
sanjay

धनसंपन्न असूनही दिवस असो वा रात्र, फोन आला की रूग्णवाहिका घेऊन निघायचं. आतापर्यंत त्यांनी हजारो लोकांचे जीव वाचवले आहेत. जाणून घेऊया संजय मनसुखलाल कोठारी यांच्याविषयी...

संजय मनसुखलाल कोठारी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडचा. त्यांचे वडील शेतीविषयक यंत्रांचे दुकान सांभाळत. हलाखीची परिस्थिती असल्याने आईदेखील धान्यविक्रीचा व्यवसाय करत असे, तर शनिवारी बाजारात संजय आणि त्यांचे भाऊ गूळ आणि मीठ विक्री करत असत. जि. प. मराठी शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे ल. ना. होशिंग विद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत खोडकर स्वभावाचे असलेल्या संजय यांना खेळाची विशेष आवड होती. रात्री कपडे धुवून तेच घालावे लागत, मामाच्या मुलांचे कपडे घालूनही काही दिवस काढावे लागले.

घरी कोणीही येवो, त्याला चहा-पाणी, जेवण दिल्याशिवाय आई घरातून बाहेर जाऊ देत नसे. इयत्ता दहावीत संजय नापास झाले. पुढे अनेक छोटे-मोठे व्यवसाय त्यांनी केले. वडिलांकडून व्यवसायाचे धडेही घेतले. एके दिवशी पारधी लोकांमध्ये वाद झाला, यात एकावर खूनी हल्ला झाला. त्यावेळी त्याला संजय यांचे आजोबा सुवालाल कोठारी यांनी स्वतः ५०० रूपये खर्चून दवाखान्यात नेले आणि त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. यानंतर त्याचे कुटुंबीय आणि २०-२५ लोकं सुवालाल यांच्याकडे आभार मानण्यासाठी आले. अपघातातून जीव वाचवल्यावर लोकांचे किती प्रेम मिळते, हे सगळे संजय यांनी पाहिले आणि त्यांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली. जामखेड बस स्थानक परिसरात संजय यांनी १९८४ साली वाहनांचे स्पेअर पार्ट्सचे दुकान टाकले. त्याकाळी पेट्रोल विक्रीही केली. हळूहळू व्यवसाय वाढीस लागला. दुकानासमोर संजय यांनी गाढवांसाठी पाण्याचा हौद बांधला. वाटसरूंची तहान भागविण्यासाठी त्यांनी दोन पाणपोई सुरू केल्या. पुढे पाहता पाहता पाणपोईंची संख्या १५ वर गेली.

पहिली ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, तसेच शाळांमधील गरीब व होतकरू मुलांना मोफत गणवेश वाटप सुरू केले. शाळेत एक सायकल पडली की सर्व सायकल पडत असे. तेव्हा संजय यांनी १२ हून अधिक शाळांना ‘सायकल स्टॅण्ड’ दिले. पुढे वृक्षारोपण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. सामाजिक कार्याने जनसंपर्क वाढला आणि त्याचा थेट परिणाम व्यवसायावर झाला. व्यवसाय यशोशिखरावर पोहोचला. जामखेडला एकमेव सरकारी दवाखाना होता. तेव्हा जामखेडवरून अहमदनगरला अपघातग्रस्तांना पाठवल्यानंतर तिथे संजय यांचे चुलते मदत करत असत. यावेळी संजय यांनाही मदतीसाठी अपघातग्रस्तांचे फोन वाढू लागले. तेव्हा त्यांनी चारचाकी वाहन घेतले आणि त्यातून अपघातग्रस्तांना दवाखान्यात पोहोचवू लागले. व्यवसाय मुलांकडे सोपवून संजय यांनी स्वतःला संपूर्णतः सामाजिक कार्यात झोकून दिले. घरगुती वाहनाचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी २०१३ साली स्वतःसाठीस्वतंत्र नवे वाहन घेऊन त्याचे रूपांतर रुग्णवाहिकेत केले. यासाठी त्यांना डॉ. संदीप सुराणा यांनी सहकार्य केले. पुढे संजय यांनी ‘सुवालाल प्रतिष्ठान’ सुरू करून त्याअंतर्गत काम सुरू केले.

रात्र असो, दिवस असो, डोके फुटलेले असो वा हात-पाय तुटलेले. फोन आल्यानंतर संजय स्वतः रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचून व्यक्तीला दवाखान्यात दाखल करतात. आतापर्यंत त्यांनी तीन हजार, २०० हून अधिक लोकांना आपल्या रुग्णवाहिकेतून दवाखान्यात वेळेवर पोहोचवले आहे. अपघात, आत्महत्या, हत्या, हाणामारी अशा अनेक घटनांमधील जखमी व्यक्तींचा यात समावेश आहे. १०० हून अधिक विषप्राशन केलेल्या व्यक्तींचा जीवही संजय यांनी वाचवला आहे. हरीण, मोर, कासव अशा विविध पशु-पक्ष्यांचाही जीव त्यांनी वाचवला आहे. २०-२५ लोकांचे अंत्यसंस्कार त्यांनी स्वतः केले आहेत. हे सर्व काम संजय विनामूल्य करतात.

कोरोना काळातही त्यांनी एक हजार, ४०० कुटुंबांना मोफत किराणा कीट वाटप केले. वर्षाकाठी संजय ५०० हून अधिक झाडे लावतात. दिडींला जेवण देणे, देहदान, अवयवदान, नेत्रदान चळवळ, रक्तदान शिबीर आदी उपक्रमही ते राबवितात. संजय यांची पोलिसांनाही फार मोठी मदत होते. त्यामुळे त्यांना ‘पोलीसमित्र’ असेही म्हटले जाते. आई शांताबाई, पत्नी सरला, तेजस, हर्षल, रोहन ही मुलं यांसह प्रफुल्ल सोळंकी, रोहिदास केकाण यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभते. संजय यांचे नातेवाईक राजकारणात असूनही संजय मात्र त्यापासून अलिप्त आहेत.

“आईकडून मला मोठी प्रेरणा मिळते. या कार्यातून प्रचंड मानसिक समाधान मिळते. अगदी जेवताना फोन आला तरी जेवण अर्ध्यावर सोडावे लागते. कारण, या कार्यात वेळ खूप महत्त्वाची आहे. जामखेडमध्ये अपघातानंतर ९० टक्के लोकं मला फोन करतात. ज्या दिवशी फोन येत नाही, तेव्हा रूखरूख वाटते. अपघातग्रस्ताचा प्रथम रक्तस्राव थांबविणे आवश्यक असते. रुग्णाला झोपून मग रुग्णालयात नेले पाहिजे, जास्त शिकलो नाही, म्हणून हे कार्य करता आले, अन्यथा कुठेतरी छोटीमोठी नोकरी करत बसलो असतो,” असे संजय सांगतात.

मध्यरात्री फोन आल्यास कोणताही विचार न करता केवळ व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे, या उद्देशाने कार्य करणार्‍या संजय कोठारी यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.

Powered By Sangraha 9.0