पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेनंतर अख्ख्या देशात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. इमरान खान यांच्या समर्थकांनी सार्वजनिक, खासगी मालमत्तांना तर लक्ष्य केलेच, शिवाय पाकिस्तानी लष्करावरही हे आंदोलक तुटून पडले. एका मेजरचे घरही पेटवण्यात आले. आतापर्यंत या दंगलींमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून, ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
अजूनही पाकिस्तानमधील परिस्थिती निवळलेली नसून देशातील बर्याचशा भागांत मोबाईल आणि इंटरनेटवरही बंदी कायम आहे. खरंतर पाकिस्तानच्या इतिहासात एखाद्या बड्या नेत्याला अटक होण्याची तशी ही काही पहिलीच वेळ नाही. परंतु, यंदा नेत्याच्या अटकेविरोधात उफाळून आलेल्या प्रचंड जनआक्रोशाने प्रक्षोभक रुप धारण केले. तसेच, यापूर्वीही अटक झालेल्या नेत्याच्या पक्षातील कार्यकर्त्यांनीही अशीच पेटवापेटवी केली होती. परंतु, इमरान खान समर्थकांनी थेट लष्करालाच लक्ष्य केले. त्यामुळे पाकिस्तानच्या इतिहासात कधी नव्हे ते पाकिस्तानी नागरिक विरुद्ध पाकिस्तानी लष्कर असा अभूतपूर्व संघर्ष उफाळून आलेला दिसतो.
१९४७ पासून ते आजवर पाकिस्तानच्या राजकीय स्थितीवर नजर टाकली असता, हे लक्षात येते की, एकाही पंतप्रधानाला आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. लियाकत अली खान, युसूफ रझा गिलानी आणि नवाझ शरीफ यांनीच कशीबशी आपली चार वर्षे पूर्ण केल्याचे दिसते. अशा या सर्वार्थाने अस्थिर देशाने १९४७ पासून तब्बल ३० पंतप्रधान पाहिले, तर त्याच वर्षी स्वतंत्र झालेल्या भारतात मात्र आजवर १८ पंतप्रधान झाले. तसेच, अगदी प्रारंभीपासूनच पाकिस्तानवर लष्कराचा वरचश्मा राहिला. परिणामी, गेल्या ७५ वर्षांत तीनवेळा लष्करी बंड आणि चारवेळा सैन्यप्रमुखांनीच पाकिस्तानातील लोकशाही सरकार उलथवून लावले. पाकिस्तानचे प्रथम पंतप्रधान लियाकत अली खान आणि प्रथम महिला पंतप्रधान बेनझिर भुट्टो यांचीही हत्या करण्यात आली. त्यामुळे वेळोवेळी पाकिस्तानातील तोंडदेखल्या लोकशाहीचे लष्करानेच धिंडवडे काढले. यावरून पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरतेचे विदारक चित्र अधोरेखित व्हावे.
त्यामुळे पाकिस्तानात प्रारंभीपासून लोकशाही रुजली नाही आणि ती तेथील स्वार्थी, खिसेभरू लष्कराने म्हणा कधी रूजूही दिली नाही. परिणामी, लोकनियुक्त पंतप्रधानाकडे सत्तेची सूत्र असली तरी पाकिस्तानी लष्कर हे संलग्न सरकार स्वरुप कार्यरत राहिले. लष्कराचे बडे अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणा असलेल्या ‘आयएसआय’ने कायमच लोकनियुक्त सरकारवर अंकुश ठेवण्याचेच उद्योग केले. एवढेच नाही, तर लष्करी कारवाया, परराष्ट्र व्यवहार यामध्येही सैन्याची ढवळाढवळ राहिली. त्याअंतर्गतच ‘काश्मीर बनेगा पाकिस्तान’ची नारेबाजी करणार्या राजकीय पक्षांच्या कळत-नकळत पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांची पिल्लावळ पैदा केली आणि आज तेच मुजाहिद्दीन पाकिस्तानच्या मुळावर उठले आहेत.
इस्लामिक राष्ट्र म्हणूनही पाकिस्तानची वाटचाल पुरती फसली. धड ना सौदीचे, ना तुर्कीचे असे कुठलेही इस्लामिक मॉडेल पाकिस्तानला पुरेपूर अवलंबता आलेच नाही. परिणामी, इस्लामच्या मुद्द्यावरून स्वतंत्र झालेल्या या देशाला कथित इस्लामिक आदर्श राज्याची मुळी स्थापना करताच आली नाही. लष्कर, लोकनियुक्त सरकार यांच्यातील चढाओढीमुळे आर्थिकदृष्ट्याही पाकिस्तानची प्रगती खुंटली. त्यातच अल्पसंख्याक, महिला यांच्यावरील अन्याय-अत्याचार, बोकाळलेला प्रांतवाद, उर्दूची मक्तेदारी, इस्लामिक शिक्षणाचा हट्ट आणि अमेरिका-चीनवरील एकूणच परावलंबित्वामुळे पाकिस्तानी समाज हा जागतिक शर्यतीत मागे पडला. परिणामी, पाकिस्तानमधील प्रत्येक प्रांतात आज फुटीरतावादी चळवळी बोकाळलेल्या दिसतात.
पाकिस्तानची मुहूर्तमेढ ज्या आदर्श इस्लामिक तत्त्वांवर झाली होती, त्याची पूर्तता या देशाला कधी जमलीच नाही. परिणामी, गरिबी, बेरोजगारी, गुन्हेगारीच्या विळख्यातच हा देश गुरफटून गेला. त्यातच देश बदलण्याची महत्त्वाकांक्षा असलेले नेते पाकिस्तानही झाले, नाही असे नाही; पण शेवटी लष्करी ताकदीपुढे त्यांनाही गुडघे तरी टेकावे लागले किंवा जीव गमवावा लागला. आता शाहबाज शरीफ यांच्या हाती किती दिवस ही नामधारी सत्ता राहते की पाकिस्तान परंपरेनुसार लष्करी राजवटीखाली जातो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच!