समर्थ रामदासस्वामी शिष्यांना, महंतांना किंवा सामान्यजनांना उपदेश करीत. तेव्हा त्या विचारातील मर्म त्यांनी अनुभवलेले असे, त्याची प्रचिती घेतलेली असे. प्रचिती आल्यावर स्वामींच्या मुखातून तो उपदेश बाहेर पडे. थोडक्यात सांगायचे, तर स्वामींची वागण्याची पद्धत अशी होती की, ’आधी केले, मग सांगितले. यावरून विचारांच्या बाबतीत समर्थ आत्मप्रचितीला महत्त्वाचे स्थान देत असत, हे लक्षात येते. या संदर्भात दासबोधातील समर्थवाणी स्पष्टपणे सांगते की,
हे प्रचितीचे बोलिलें। आधी केले मग सांगितलें।
मानेल तरी पाहिजे घेतलें। कोणी येके। (११.१०.२४)
या ओवीत दासबोधातील विचारांबाबत समर्थ आपला अनुभव सांगत आहेत. स्वामी म्हणतात, ’मी स्वतः अनुभव घेऊन त्यानंतर तुमच्या समोर बोलत आहे. माझ्या तत्त्वविवेचनात कल्पनाविलास नाही. मी आधी त्यातील आशय अनुभवून पाहिला, त्याची प्रचिती घेतली आणि मगच ते तत्त्व जगाला सांगितले. माझा विचार तुम्हाला पटला, तर त्याप्रमाणे वागून बघा आणि त्यातून जे प्रत्ययास येईल ते घ्या.’ अर्थात या ठिकाणी स्वामी प्रचितीचे महत्त्व सांगतात.
तसं पाहिलं तर प्रपंचातही प्रचितीला मोल आहे. प्रचिती आल्याशिवाय केवळ विश्वासावर आपण प्रत्येक गोष्ट स्वीकारत राहिलो, तर व्यवहारात केव्हा फसगत होईल ते कळणार आही. अध्यात्म हा सूक्ष्म चिंतनाचा विषय असल्याने त्याचा अनुभव अथवा त्याची प्रचिती ही ज्याची त्याला घ्यायची असते, असे स्वामीचे सांगणे असावे. यावरून हे सिद्ध होते की, स्वामींनी स्वतः प्रचिती घेऊन मगच रामनामाचे महत्त्व विशद केले आहे. स्वामी अनुभवावरून सांगतात की, भगवंताचे नाम गोड आहे, अतिशय चांगले आहे. तसेच, नाम साजिरे आहे, स्वल्प आहे, फुकट मिळणारे आहे, हितकारक आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाम मोक्षफलदायी आहे. आतापर्यंतच्या विविध श्लोकांतून समर्थांनी याचे सुरेख स्पष्टीकरण केले आहे. समर्थविचारांना भर प्रचितीवर असल्याने असा प्रश्न उपस्थित होतो की, समर्थांनी सांगितलेल्या रामनामाच्या वैशिष्ट्यांपैकी काही आपल्या प्रचितीस येते का? यावर विचार केला असता, असे लक्षात येते की, अनंत प्रापंचिक विचारांच्या गोंधळातून मनाला बाहेर काढून त्याला भगवंताच्या नामाला प्रवृत्त करणे, हे फार कठीण आहे, असे वाटल्याने आपल्यासारखी सामान्य माणसे नाम घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. असे असले तरी काही माणसे भगवंताच्या नामस्मरणाचा अभ्यास करायला सुरुवात करतात.
पण, सुरुवातीला नाम हे खूप वरवरचे घेत राहिल्याने ते अंत:करणापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे नाम घेण्याची क्रिया यांत्रिक पद्धतीने होऊ लागतेतिचा मनाशी संबंध पोहोचत नाही. या स्थितीत मनाचे इतस्ततः भटकणे चालूच असते. त्याचा कृतीवर परिणाम होऊन नाम घेणे चालू असतानाही ही माणसे इतरांना काहीतरी प्रापंचिक सूचना देत असतात, अशा स्वैर मनाला नामाची प्रचिती कशी येणार? हाही एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. बरं काही साधक गुरूंनी सांगितले म्हणून किंवा कोठेेतरी वाचले म्हणून नामाच्या संख्येला महत्त्व देतात, अमूक अमूक संख्येचा संकल्प करतात. त्याने मनाला वळण लावण्याचा प्रयत्न झाला तरी जपसंख्येचा गर्व निर्माण होऊन देहाभिमान वाढू लागतो. साधक श्रेष्ठकनिष्ठतेच्या अहंकारात गुरफटून त्यांची देहबुद्घी वाढू लागते आणि नाम बाजूला राहाते. गर्व, ताठा, देहबुद्धी वाढल्याने साधकाचे नुकसान होते.
आता हे सर्व अडथळे पार करून नुसत्या नामाचा विचार करायचा, तर नामाला स्वतःचा असा नाद किंवा रुची नसल्याने नामाचा कंटाळा येऊ लागतो. मनाचा मूळ धर्म हा चंचलता असल्याने कुठल्याही बाबतीत तोचतोचपणाला मन कंटाळते. एकाच गोष्टीवर ते फारकाळ स्थिर राहू शकत नाही. मनाची आणखी एक विशेषता पाहा.नादमधूर गाण्याचे शब्द सूर संगीत कानावर पडले की, वेगळा आनंद वाढून कामाकार त्या गीताचे शब्द, नाद मनात घोळत राहतात, असा आपला अनुभव आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, गीतसंगीतात निरनिराळ्या शब्दांचा, नादांचा, सुरांचा, वाद्यांचा वापर होत असल्याने मनाच्या चांचल्याला ते भावते व गीत कर्णमधूर होऊन मन सुखावते.
त्यातील वैविध्य मनाच्या स्वभावगुणाला अनुकूल असते. परंतु, असा अनुभव नामाच्याबाबतीत येत नाही. असे का होते याची चर्चा पुढे येईल. नाम घेणे ही क्रिया वरवरची असेल किंवा यांत्रिक पद्धतीने होत असेल, तर ते सारे कंटाळवाणे वाटू लागते. तरी काही माणसे प्रापंचिक, भौतिक लाभावर लक्ष ठेवून नाम घेतच राहतात. पण, त्याची प्रचिती येत नसल्याने मनाला त्याचा वीट येतो, ते नकोसे वाटू लागते. आता समर्थांसारख्या अधिकारी व्यक्तीने नामाचे, रामनामाचे महत्त्व सांगितलेले असल्याने आपले काहीतरी चुकते आहे, ते न समजल्याने रामनामाचा आणि रामाचा कंटाळा येतो. नाम नकोसे वाटते. ही सामान्य माणसाची सुरुवातीची अवस्था समर्थ जाणतात. तेव्हा, रघुनायकाचा वीट मानणे हे योग्य नव्हे, असा कळकळीचा उपदेश, स्वामी पुढील श्लोेकातून करीत आहेत-
नको वीट मानूं रघुनायेकाचा।
अती आदरें बोलिजे राम वाचा।
न वेचे मुखीं सापडे रे फुकाचा।
करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१॥
मनाचा स्वभावच मुळात असा आहे की, ते दृश्य जगाकडे धावत असते. त्याला भौतिक गोष्टींचे आकर्षण असते. त्यातील आनंद शोधण्याचा मन प्रयत्न करीत असते. अर्थातच दृश्य जगाकडून अथवा भौतिकतेतून मिळणारा आनंद हा इंद्रियजन्य असतो, तो अल्पकालीन असतो आणि त्याच्या पातळीत चढउतार होत असतात. रामनाम हे इंद्रियनिर्मित आनंदासाठी नाही. रामनामापासून मिळणारे सुख व त्याचा अनुभव हा अतीन्द्रीय असतो, पारमार्थिक सत्याचा शोध अतीन्द्रीय असल्याने त्याची अनुभूती इंद्रियांद्वारा मिळणारी नाही, यावरून हे लक्षात येईल की, गीत-संगीतातून मिळणारा आनंद हा इंद्रियांना तृप्त करणारा असतो. नामस्मरणातून अतीन्द्रीय अनुभूतीची अपेक्षा असल्याने सुश्राव्य गीत संगीताशी त्याची तुलना करता येत नाही. यासाठी वाचेने रामनाम बोलायचे झाल्यास ते अत्यंत आदरपूर्वक बोलले पाहिजे. रामनामाविषयी अत्यंत आदर दाखवायला काही कष्ट पडत नाही किंवा द्रव्य खर्च करावे लागत नाही.
रामाच्या आदराने आणि रामनामाच्या उच्चाराने तो सहजरित्या प्राप्त होणारा आहे. मग वेळ कशाला, मोठ्या आदरपूर्वक त्या जानवीवल्लभाचा जयघोष करा. परमार्थसाधनेमध्ये आपल्या ध्येयाची सतत जाणीव ठेवावी लागते. भगवंताची प्राप्ती हे मानवी जीवनातील परमोच्च ध्येय मानले गेले आहे. साधकाला त्यासाठी आपल्या वृत्तींशी झगडून आपले ध्येय ताजेतवाने ठेवावे लागते. साधना करीत असताना भौतिक आकर्षणे, सिद्धी हे संभ्रम निर्माण होतात. या सर्व मोहांना, भ्रमांना टाळून जो रामनामाने सतत ध्येयाची आठवण ठेवतो, तो आज ना उद्या आपल्या पारमार्थिक ध्येयापर्यंत पोहोचतो. त्यासाठी वीट, कंटाळा न करता आदरपूर्वक रामनाम घेत राहावे, जमेल तसा रामनामाचा घोष करावा, त्याने तो राम सहजगत्या आपल्या हाताशी येतो आणि आपला उद्धार होतो, असे रामदासांचे मोठ्या कळकळीचे सांगणे आहे.
७७३८७७८३२२