ठाणे : १९८९ साली कारसेवक म्हणून अयोध्येला जाण्याची संधी मिळाली होती. धरपकडीचे सत्र सुरू होते. झांशीमधील एका मराठी कुटुंबाने आम्हाला राहण्यासाठी आसरा दिला, अशी आठवण आ. संजय केळकर यांनी सांगितली. अयोध्येला ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक रवाना झाल्यानंतर त्यांना आ. संजय केळकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी ३४ वर्षांपूर्वीच्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. १९८९ साली कारसेवक म्हणून अयोध्येला जाण्याची संधी मिळाली.
रामजन्मभूमीचे आंदोलन त्यावेळी देशामध्ये पेटले होते. मुलायम सिंग सरकारने आम्हाला झाशीमध्येच अडवून ताब्यात घेतले होते. रामजन्मभूमीत एक मुंगीही जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत हजारो रामभक्तांना तुरुंगात टाकले होते. विश्व हिंदू परिषदेच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणाहून बाहेर पडलो आणि आंदोलन सुरूच ठेवले, अशी आठवण आ. केळकर यांनी सांगितली.
झाशीमध्ये एका मराठी कुटुंबाने राहण्यासाठी आसरा दिला होता. त्या ठिकाणाहून आमचे राम जन्मभूमी आंदोलन सुरू होते.
१९९२ सालीदेखील पुन्हा कारसेवा झाली. लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा त्यावेळी खूप गाजली होती. १९९२ साली आम्ही प्रत्यक्ष अयोध्येत रामजन्मभूमीवर कारसेवेच्या निमित्ताने पोहोचलो. त्यावेळी लाखो कारसेवकांनी अस्मितेचे दर्शन घडवले. त्यातूनच भव्य राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. या आंदोलनानिमित्त रामजन्मभूमीच्या शेकडो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले याचा मला अभिमान वाटतो, अशी भावनाही आ. केळकर यांनी व्यक्त केली.