देशात ३१६७ वाघ

09 Apr 2023 20:20:25
Project Tiger

नवी दिल्ली
: जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात असून सन २०२२च्या अखेरपर्यंत देशामध्ये ३ हजार १६७ वाघ असल्याची नवीन आकडेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केली.प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल म्हैसूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशातील वाघांची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे. १ एप्रिल १९७३ रोजी भारताने वाघ वाचवण्यासाठी मोहीम सुरु केली होती. त्यालाच प्रोजेक्ट टायगर असं नाव देण्यात आले आहे.

दरम्यान, ’प्रोजेक्ट टायगर’च्या यशामुळेच आजघडीला जगातील सर्वाधिक ७० टक्के वाघ एकट्या भारतामध्ये आहेत. दरवर्षी ही संख्या ६ टक्क्यांनी वाढत आहे. माणसांप्रमाणेच प्रत्येक वाघांचे स्वतःची वेगळी ओळख असते. त्यांचे ठसे वेगवेगळे असतात.पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. या भेटीचा त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात ते काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी-शर्ट आणि काळे शूज, एका हातात जॅकेट घेतलेलं दिसत आहे. या शैलीत पंतप्रधानांनी जंगल सफरीचा आनंद घेतला.
 
म्हैसूरमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी वाघांशी संबंधित नवीनतम आकडेवारी जाहीर केली आणि एका मेगा इव्हेंटमध्ये एक नाणे देखील जारी केले. २०२२ पर्यंत देशातील वाघांची संख्या २,९६७ वरून ३,१३७ पर्यंत वाढली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमृत काल दरम्यान वाघांना वाचवण्यासाठी सरकार आणि इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स चे व्हिजन लाँच केले.
 
कर्नाटक दौर्‍यात मोदींना ऑस्कर विजेत्या ’द इलिफंट व्हिस्पर्स’ची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक दौर्‍यात प्रसिद्ध बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांना एका गोष्टीची आवर्जून आठवण झाली ते म्हणजे ऑस्कर विजेत्या ’द एलिफंट विस्फरर्स’ या डॉक्युमेंटरी फिल्मची.व्याघ्न प्रकल्पाला भेट देण्यासह नरेंद्र मोदी यांनी तिथल्या हत्तींच्या प्रकल्पालाही भेट दिली. ’द एलिफंट विस्फरर्स’ या माहितीपटातून आपल्याला हत्तींची देखभाल करणार्‍या बोमन आणि बेलीची भेट झाली. म्हणून नरेंद्र मोदींनी या जोडप्याची आवर्जून भेट घेतली. त्यांच्यासह हत्तींबाबत अनेक गप्पाही केल्या. हा अनुभव आणि त्याचे काही फोटो नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेयर केले आहेत.




Powered By Sangraha 9.0