जागतिक स्तरावर आपल्या देशाचा प्रभाव आणि ताकद वाढविण्यास कोणताही देश प्रथम प्राधान्य देतो. शहरासोबतच दुर्गम भागातही बलाढ्य देश आपली छाप पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात. आजच्या घडीलाही अनेक बलाढ्य देश जगाच्या कानाकोपर्यात आपली राजकीय मुस्सद्देगिरी वाढवत आहेत. जो भाग जेवढा कमजोर, संवेदनशील आणि गरीब असतो, तिथे ही मुसद्देगिरी यशस्वी होते.आफ्रिका अशाच काही भागांपैकी एक आहे. अमेरिका, रशिया, चीनसारखे देशही आता आफ्रिकन देशांशी जवळीक साधतात. मागील आठवड्यात अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आफ्रिकेच्या नऊ दिवसीय दौर्यावर होत्या. या दौर्यात त्यांनी घाना, टांझानिया, झांबिया या देशांचा दौरा केला. तत्पूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही आफ्रिकेचा दौरा केला होता.वर्षअखेरीस राष्ट्रपती जो बायडनदेखील आफ्रिकन देशांचा दौरा करण्याची शक्यता आहे. अशात अमेरिकेच्या तीन शक्तिशाली नेत्यांच्या आफ्रिकन दौर्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. आफ्रिकन देशांमध्ये अमेरिकेचा प्रभाव, ताकद यांसह अमेरिकेविषयी विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये त्रिदिवसीय युएस-आफ्रिका शिखर संमेलन पार पडले. यात ३९ आफ्रिकन सरकार, युनियन कमिशन, युवा नेता, युएसचे आफ्रिकन प्रवासी नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आफ्रिकेविषयी अमेरिकीची भूमिका आणि सहकार्य वाढविण्याविषयी चर्चा करण्यात आली. आफ्रिकेमध्ये अमेरिका आपले संबंध पुनर्जीवित करून त्याला प्राथमिकता देण्याचा प्रयत्न करीत आहे. परदेशी मदत, गरिबी निर्मूलन, लोकशाहीला बळकटी देणे, संघर्ष आणि सुरक्षा या मुद्द्यांवर अमेरिका याआधीही आफ्रिकेला मदत करत आला आहे. परंतु, पूर्ण आफ्रिका खंडातील परिवर्तनावर लक्ष केंद्रित करण्यात अमेरिका विफल ठरला आहे.वृत्तसंस्थांच्या मते, जगातील सर्वाधिक प्राधान्यक्रम क्षेत्रांमध्ये आफ्रिकेला पहिली पसंती आहे. जनसांख्यिकीय बदल, व्यापार आणि गुंतवणुकीत नुकसान यामुळे गेल्या दशकभरात अमेरिकेचे आफ्रिकेतील स्थान धोक्यात आले आहे. त्यामुळे अमेरिकेने युएस-आफ्रिका शिखर संमेलनात आफ्रिकेच्या भविष्याला मजबूत करण्यासाठी सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आफ्रिका युवा, वाढत्या लोकसंख्येचा खंड आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपत्ती आणि खनिजांचा साठा आहे.
जगभरातील एकूण खनिजसंपत्तीपैकी जवळपास ३० टक्के खनिजसंपत्ती आफ्रिकेत आहे. एकूण नैसर्गिक वायूपैकी आठ टक्के आणि जवळपास १२ टक्के तेलभांडार आफ्रिकेत आहे. जगातील ४० टक्के सोने आणि नऊ टक्क्यांपर्यंत क्रोमियम आणि प्लॅटिनमही आफ्रिकेत आहे. कोबाल्ट, हिरे, प्लॅटिनम आणि युरेनियमचे सर्वाधिक साठे आफ्रिकेतच आहे. या कारणामुळे बलाढ्य देशही आफ्रिकेत अनेक संधी शोधत असतात. आफ्रिका खंडातील बहुतांश देश गरीब असल्याने याठिकाणी चीन, रशिया आणि अमेरिका गुंतवणुकीला प्राधान्य देतात. विशेषतः कर्ज घेण्याची वेळ आली, तर आफ्रिकन देश मात्र चीनला पहिली पसंती देतात. याचमुळे अमेरिका चिंतेत आहे.आफ्रिकेतील चीनचे वाढते प्रस्थ पाहता अमेरिकेनेही आता आफ्रिकेत लक्ष केंद्रित केले आहे. इकडे रशिया आफ्रिकेला सर्वाधिक शस्त्रपुरवठा करण्याबरोबरच खाणक्षेत्रात रूची दाखवत असल्याने अमेरिकीची डोकेदुखी आणखी वाढली आहे. रशियाच्या एका नामांकित कंपनीला अनेक प्रकल्पांचे काम मिळाले असून जे अर्धसैनिक संघटनदेखील आहे. याद्वारे रशियाचे हितसंबंध आफ्रिकेत वाढविले जात आहे.
रशिया-युक्रेन युद्धावर संयुक्त राष्ट्रसंघात मतदान झाले तेव्हा टांझानियासोबत निम्मे आफ्रिकन देश अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे अमेरिकेसाठी ही चिंताजनक बाब होती. अमेरिका केवळ गुंतवणुकीच्या आधारे आफ्रिकेशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत नसून मानवी नीतीचाही आधार घेतला जात आहे. परंतु, हे तितके सोपे नाही. आफ्रिकन देश सहसा दबाव सहन करत नाही, त्यामुळे हा अमेरिकेसाठी अडथळा नक्कीच आहे.खनिजसंपन्न असलेल्या आफ्रिकेची खरी ओळख ‘गरिबी’ ही आहे. त्यामुळे गुंतवणुकीला आफ्रिकन देश कधी नकार देत नाही, मग समोर कोणताही देश असो. रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रस्थामुळे भले अमेरिका आफ्रिकन देशांशी जवळीक वाढवत असला, तरीही आफ्रिकन देशांसाठी मात्र जो गुंतवणूक, सहकार्य करेल, तोच मित्र असतो हेदेखील अमेरिकेने ध्यानात घेणे गरजेचे आहे.