दक्षिण चीन समुद्रात चीनचे ‘ग्रे झोन वॉरफेर’

08 Apr 2023 20:28:57
China's 'Grey Zone Warfare' in South China Sea

दक्षिण चीन समुद्र, तैवान सामुद्रधुनी, पिवळा समुद्र सागरी क्षेत्रात, चीन आपल्या ऐतिहासिक अधिकारांचा हवाला देत ‘युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द सी’च्या विरोधात त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील खडक, समुद्राखालील खडक, वाळू आणि बेटांवर आपले नियंत्रण मजबूत करण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करत आहे. चीन दक्षिण चीन समुद्रातील आपले दावे बळकट करण्यासाठी विविध ‘ग्रे झोन’ डावपेच वापरत आहे. त्याविषयी सविस्तर...
 
'युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन’प्रमाणे किनारपट्टीपासून १२ नॉटिकल मैलपर्यंत असलेला समुद्र हा त्या देशाचा असतो आणि देशाचे कायदे तिथे लागू असतात. किनारपट्टीपासून २०० नॉटिकल मैलचा समुद्र हा त्या देशाचा ‘एक्सक्लुझिव्ह इकॉनोमिक झोन’ असतो. परंतु, इतर देशांच्या जहाजांना व्यापार करण्याकरिता ये-जा करण्याची परवानगी असते. मात्र, चीन हे आंतरराष्ट्रीय कायदे पाळताना दिसत नाही. संपूर्ण दक्षिण चीन समुद्र हा फक्त आमचाच आहे, अशी चीनची आडमुठी भूमिका. हा सगळा समुद्र बळकवण्यासाठी चीन ‘ग्रे झोन’ युद्धाचा वापर करून तिथे राष्ट्रांना घाबरतो आणि त्या समुद्रात असलेले सगळे बळकवण्याचा प्रयत्न करत आहे.इतर देशांची विमाने ज्यावेळी दक्षिण चिनी समुद्रातून जातात, त्यावेळी त्यांचे रडार जॅम करणे, त्यांचे ‘जीपीएस’ जॅम करणे अशा प्रकारच्या घटनादेखील घडल्या आहेत. काही अमेरिकन राजनयिक अधिकारी गेल्या एक-दोन वर्षांपासून तक्रार करत आहेत की, काही ठरावीक भागात राहिले की त्यांचे डोके दुखायला लागते. त्यांच्या मनावर परिणाम केला जातो. असे म्हटले जाते की, चीन त्यांच्या मनावर परिणाम करण्याकरिता न्युरो शस्त्राचा वापर करत असावा.
 
चीन वेगवेगळ्या प्रकारची दादागिरी करून दक्षिण चीन समुद्रातील देशांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा उद्देश आहे की, आम्ही म्हणेल ते तुम्ही ऐका. या युद्ध पद्धतीला ‘ग्रे झोन वॉरफेर’ असे म्हटले जाते. ‘ग्रे झोन वॉरफेर’ म्हणजे चीन लढाई पण लढत नाही किंवा शांतता पण ठेवत नाही. म्हणजे लढाई आणि शांतता या मधल्या काळातल्या ज्या आक्रमक कारवाया चीन या देशांच्या विरुद्ध करतो. त्यालाच ‘ग्रे झोन वॉरफेर’ची लढाई म्हटले जाते. चीनचा हे सगळे करण्याचामागचा मुख्य उद्देश आहे की, संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर त्याला कब्जा करायचा आणि तिथली नैसर्गिक संपत्ती लुटायची आहे.

संदिग्ध डावपेचांचा वापर

चीनकडून संदिग्ध डावपेचांचा वापर केला जातो. अलीकडे चीनने दक्षिण चीन समुद्र आणि पश्चिम पॅसिफिकच्या इतर भागात ‘ग्रे झोन वॉरफेर’चा वापर वाढवला आहे. ‘ग्रे झोन वॉरफेर’ची वारंवारता आणि भौगोलिक व्याप्ती वाढवली आहे. यांमध्ये चीन, पीपल्स लिबरेशन आर्मीचे नेव्ही (प्लॅन), चायनीज कोस्ट गार्ड (सीसीजी) आणि चायनीज मेरीटाईम मिलिशिया (सीएमएम) यांचा वापर करतो. चायनीज कोस्ट गार्ड- आग्नेय आशियाई किनारी देशांतील मच्छीमारांवर कारवाई करत आहे, तर चायनीज मेरीटाईम मिलिशिया- या देशांच्या नौदलांना आणि तटरक्षक दलांना सर्व बाजूंनी प्रहार करून घाबरवते.चीन त्यांच्याकडे असलेल्या मासेमारी बोटींचा वापर हा दक्षिण चीन समुद्रामध्ये इतर देशांना घाबरवण्याकरिता करतो. कारण, या बोटीमध्ये असलेले अर्ध्याहून जास्त मच्छिमार हे चिनी सैन्यातून निवृत्त झालेले असतात. अनेक वेळा ते इतर बोटींना टक्कर देऊन इतरांच्या बोटी अडवण्याचा प्रयत्न करतात. या कारवाया या नेहमीच युद्धापेक्षा कमी असतात. त्यामुळे येथील देश प्रभावीपणे प्रतिसाद देत नाही, द्यायला घाबरतात.

दक्षिण चीन समुद्र - एक महत्त्वपूर्ण क्षेत्र


दक्षिण चीन समुद्र हे चीनच्या आर्थिक आणि सामरिक हितसंबंधांसाठी एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. येथे असलेले तेल आणि नैसर्गिक वायूचे विपुल साठे, मत्स्यपालन आणि सागरी व्यापारासाठीचे चीनकरिता महत्त्व आहे. चीनने २०२० मध्ये हिंद महासागरातील समुद्रशास्त्रीय माहिती संकलित करण्यासाठी पाण्याखाली काम करणार्‍या ड्रोन्सचा ताफा तैनात केला. चीनने आग्नेय आशियाई सागरी जागेत पाण्याखालील ‘ड्रोन ग्लायडर’ वापरली आहेत. यामुळे ही चीनकरिता ‘ग्रे झोन वॉरफेर’ करिता सुयोग्य जागा आहे.

तैवान सामुद्रधुनी, पिवळा समुद्र एक महत्त्वपूर्ण क्षेत्र

तैवान सामुद्रधुनीत, चीनच्या सार्वभौम हक्कांचा दावा करणार्‍या डावपेचांसंदर्भातील कारवायांमागचा उद्देश हा- मुख्य भूमी चीनशी तैवानचे पुनर्मिलन करणे आहे. सेन्काकू/ दियाओयु बेटांवरील जपानचे सार्वभौमत्व कमी करणे आहे. पूर्व चीन समुद्रात चीन सागरी क्षेत्रात गस्त घालण्यासाठी, जपानी मासेमारी जहाजांना त्रास देण्यासाठी आणि चीनच्या दाव्यांचा पाठपुरावा करण्यासाठी, चीन नौदल जहाजांचा वापर करतो.पिवळा समुद्र हा एक महत्त्वाचा सागरी व्यापार मार्ग आहे आणि त्यामुळे शेजारील देश-विशेषतः दक्षिण कोरिया आणि जपान यांच्याशी तणाव निर्माण झाला आहे. पिवळ्या समुद्रातील चीनच्या डावपेचांमध्ये, चीन आणि दक्षिण कोरिया यांच्यातील ‘अनन्य आर्थिक क्षेत्रा’च्या मर्यादा अस्पष्ट असलेल्या विवादित क्षेत्रांवर सार्वभौमत्व आणि नियंत्रण सांगतो. विवादित भागात परदेशी जहाजांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी, चीनने त्या भागात गस्त घालण्याकरिता निमलष्करी दल, मासेमारी ताफा आणि नागरी जहाजांचा वापर केला आहे. चीन इथे तेल विहिरी आणि इतर संरचना उभारत आहे.

चीनचे ‘ग्रे झोन’ डावपेच

राजनैतिक दबाव, आर्थिक बळजबरी, लष्करी बळाच्या जोरावर इतर देशांना धमकावणे, निमलष्करी कारवाया, माहिती युद्ध आणि सागरी सीमेचा फेरफार करणे, असे अनेक डावपेच यात सामील आहेत. तैवानला मुत्सद्दीपणे एकटे पाडणे, दावे मान्य न करणार्‍या देशांचा चीनच्या बाजारपेठेतील प्रवेश प्रतिबंधित करणे, आपल्या आर्थिक बळाचा वापर यात सामील आहे. चीनतर्फे दिल्या जाणार्‍या लष्करी धमक्यांमध्ये, चीनच्या तटरक्षक दल आणि नौदलासह लष्करी ताकदीचा वापर करतो. चीनने दक्षिण चीन समुद्रामध्ये कृत्रिम बेटे बांधली आहेत. त्यांचे लष्करीकरण केले आहे, ज्याचा वापर तो या प्रदेशात आपली लष्करी शक्ती दाखवण्याकरिता ‘फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस’ म्हणून करतो. चीनच्या तटरक्षक नौकांचा वापर इतर देशांच्या मासेमारी जहाजांना आणि या प्रदेशातील तेल विहिरांना त्रास देण्यासाठी आणि धमकावण्यासाठीही केला जातो.
 
नवीन कायद्याचे हत्यार

चीनने स्वत:चे नवीन कायदे तयार करून हे दाखवतो की, ज्या भागाविषयी वाद आहे तो भाग चीनचा आहे. चीन त्यांना सोयीस्कर असेल. तेव्हा, दुसर्‍या राष्ट्रांच्या विरुद्ध तक्रार करतो. परंतु, ज्यावेळी ‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस’मधून मिळालेले निर्णय हे चीनच्या विरोधात असतात, जसे चीन आणि फिलिपाईन्सच्याबाबतीत घडले, ते निर्णय ऐकायला चीन तयार नसतो. म्हणजे चीन साम, दंड आणि भेद वापरून वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून इतर देशांविरूद्ध कारवाई करतो.
 
चिनी डावपेचांना प्रतिसाद

सैन्याचा, शस्त्राचा, गोळीचा वापर न करता आपल्याला जे हवे ते मिळवण्याचा प्रयत्न चीन करतो. अशा प्रकारची लढाई अनेक वर्षं लढण्याकरिता चीन तयार आहे. हे देश चीनकडून होणारी आयात कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, त्यामध्ये त्यांना पुरेसे यश आलेले नाही. उलट चीनशी असलेली व्यापारी तूट अजून वाढलेली आहे.पलवानच्या पश्चिमेकडील बेटापासून १७० नॉटिकल मैल अंतरावरील चिनी सागरी सेनेच्या २२० चिनी मासेमारी नौकांना प्रतिसाद म्हणून २०२१ साली फिलीपाईन्सच्या तटरक्षक दलाने ‘व्हिट्सन रीफ’मध्ये असे कृती दल प्रशिक्षण सुरू केले होते. व्हिएतनामनेही, २०१९ मध्ये चीनच्या संशोधन जहाज- वॅन्गार्ड बँकेच्या मोहिमेत व्यत्यय आणण्यासाठी तटरक्षक दल वापरून चीनच्या डावपेचाला उत्तर दिले आहे.एकत्रित गुप्तचर यंत्रणा, पाळत ठेवणे आणि टेहळणीसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधांचा विस्तार असे काही केले जात आहे. चीनने कितीही वेळा अशा कारवाया करण्याचा घाट घातला, तरी प्रथम माघार घेणार नाही, असा स्पष्ट संदेश या प्रदेशातील देशांनी चीनला धाडला आहे.भारताने चीन वापरत असलेल्या, ‘ग्रे झोन वॉरफेर’चा पूर्ण अभ्यास करायला पाहिजे आणि असे डावपेच जर भारताच्या विरुद्ध वापरण्यात आले, तर त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे याचे नियोजन पहिलेच करून ठेवायला पाहिजे.





 
Powered By Sangraha 9.0