राजपुत्र आलेमायू आणि इंग्रजी लूट

07 Apr 2023 19:00:21
 
Prince Alemayu
 
 
कॅप्टन स्पीडी 1872 साली भारतात लखनौ जवळच्या सीतापूर गावी पोलीस सुपरिटेंडेंट म्हणून आला. त्याच्याबरोबर राजपुत्र आलेमायू देखील काही काळ भारतात राहिला होता. पुढे तो इंग्लंडला परतला आणि वयाच्या 19व्या वर्षी ‘प्लूरसी’ने मरण पावला. त्याचा देह दहन करून अस्थि विंडसर कॅसलमध्ये दफन करण्यात आल्या.
 
राजकीय इच्छाशक्ती समर्थ नसेल, तर कामं होत नाहीत. पण, जर ती समर्थ असेल, तर अशक्य भासणारी कामं शक्य होऊ लागतात. काँग्रेसी सरकारांच्या कार्यकाळात आपण फक्त बातम्या ऐकायचो किंवा चित्र पाहायचो की, अमक्या-तमक्या युरोपीय वस्तुसंग्रहालयातली अमकी-तमकी मूर्ती, चित्र, कलावस्तू ही मूळची भारतातली असून ती अमुक लॉर्ड, तमुक व्हाईसरॉय याने इंग्लंडला नेली. आता त्याच्या वारसदारांकडून ती भेट म्हणून या म्युझियमला मिळालेली आहे. त्या मूर्ती किंवा वस्तू नुसत्या ’नेलेल्या’ नसून चक्क ’चोरलेल्या’ म्हणजे लुटलेल्या असत. एक फ्रेंच प्रवासी ट्रॅव्हर्निये याने उत्तर भारतातल्या एका मंदिरातून एक हिरा चोरला. त्या मंदिरातल्या राम-सीतेच्या मूर्तींपैकी सीतेच्या मुकुटात हा हिरा बसवलेलाहोता. ट्रॅव्हर्नियेकडून तो अनेक प्रसिद्ध व्यक्तीकडे फिरला.
 
नेपोलियन बोनापार्टकडेही तो काही काळ होता. सध्या हा हिरा ’होप डायमंड’ या नावाने ओळखला जातो आणि तो शापित आहे, अशीही समजूत आहे. पंजाबचा महाराजा रणजितसिंह याच्या मृत्यूनंतर म्हणजे 1848 साली इंग्रजांनी पंजाबचं शीख राज्य संपवलं आणि रणजितसिंहांच्या खजिन्यातला ‘कोहिनूर’ हा अनमोल हिरा चोरला. पण, तो ‘चोरला’ असं कोणाला म्हणता येऊ नये, म्हणून रणजितसिंहांचा मुलगा दुलिपसिंह याने तो महाराणी व्हिक्टोरिया हिला नजर केला, असा बनाव उभा करण्यात आला. अशा सोन्या-मोत्या-हिर्‍याच्या किती वस्तू इंग्रज अधिकार्‍यांनी चोरल्या याला गणती नाही. ’ईस्ट इंडिया’ कंपनीचा नोकर म्हणून भारतात पाऊल ठेवणारा प्रत्येक इंग्रज माणूस सर्वात प्रथम कोणता हिंदी शब्द शिकत असेत्व, तर तो म्हणजे लूट! एल-ओ-ओ-टी-लूट म्हणजे लुटणे, जबरदस्तीने हिसकावून घेणे हा अर्थ इंग्रजांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवून मग ऑक्सफर्ड डिक्शनरीत दाखल केला.
 
 

Prince Alemayu
 
 
हे इंग्रजांनी फक्त भारतात आणि भारतीयांच्या संदर्भातच केलं असे नव्हे. जिथे जातील तिथे त्यांनी हेच केलं. ग्रीस हा देश आणि तिथली अथेन्स आणि स्पार्टा ही प्राचीन गणराज्यं यांबद्दल आपण नक्कीच ऐकलं असेल. या अथेन्स शहरात प्राचीन ग्रीक लोकांनी आपली उपास्य देवता अथेना हिचं एक भव्य संगमरवरी मंदिर उभारलेलं होतं. आजही ते भग्न स्थितीत आहे. त्याला म्हणतात ‘पार्थेनॉन.’ एक इंग्रज मुत्सद्दी लॉर्ड एल्गिन याने ग्रीसच्या राजकीय दुर्बलतेचा फायदा घेऊन, या पार्थेनॉनमधली जितकी शिल्पं, जितक्या मूर्ती उचलत्या आल्या तेवढ्या उचलल्या आणि इंग्लंडमध्ये आणल्या. आज त्या लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहेत. त्यांना ’एल्गिन्स मार्बल्स किंवा ’पार्थेनॉन स्कल्पचर्स’ या नावाने ओळखतात.
 
आपल्याला आफ्रिकेतला नायजेरिया हा देश आणि त्याची राजधानी लेगॉस शहर साधारणपणे माहीत असतं. कारण, तिथे तेल कंपन्यांचा मोठा व्यवसाय असल्यामुळे आपल्याकडची खूप तरुण पोरं नोकर्‍यांसाठी जात असतात. या नायजेरियाला पूर्वी ‘बेनिन’ म्हणत असत. बेनिनची संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे. आपल्याकडे जसे देवांच्या प्रतिमा कोरलेले तांब्याचे टाक देवपूजेत असतात, तसे बेनिनमध्ये मोठे ब्राँझचे पत्रे घेऊन त्यावर देवांच्या, वीर पुरुषांच्या प्रतिमा कोरण्याची कला अस्तित्वात होती. इंग्रजांनी असे अनेक पत्रे बेनिनमधून पळवले आणि इंग्लंडला गेले. यातले काही आज ब्रिटिश म्युझियममध्ये आहेत. त्यांना म्हणतात ’बेनिन ब्राँझ.’ किमान तेराव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंतचे असे ते पत्रे आहेत.
 
इजिप्तच्या पिरॅमिडस आणि अन्य ठिकाणांवरून इंग्रजांनी किती मौल्यवान वस्तू पळवल्या, याला गणतीच नाही, अगदी अशीच लूट इंग्रजांनी इथिओपियातही केली. इथिओपियन ऑर्थोडॉक्स चर्च हे इसवी सनाच्या चौथ्या शतकात निर्माण झालं, असा अंदाज आहे. इंग्लंडने साधारण नवव्या किंवा दहाव्या शतकात ख्रिश्चानिटी स्वीकारली. म्हणजेच इंग्लंडच्या आधी किमान 500 वर्षं इथिओपिया ख्रिश्चन झाला होता. पण, 1868 साली इंग्लंडने इथिओपियावर स्वारी करून तिथल्या प्राचीन ऑर्थोडॉक्स चर्चमधल्या किमान 11 ’ताबोत’ सह असंख्य मौल्यवान वस्तू पळवल्या. त्यांचा सात वर्षांचा राजपुत्र आलेमायू यालाही पळवलं. ‘ताबोत’ म्हणजे पवित्र धर्माज्ञा ज्यांच्यावर लिहिल्या आहेत, अशा मातीच्या विटा किंवा लाकडी फळ्या. बायबलच्या जुन्या करारानुसार, देवाने प्रेषित मोझेस याला ’टेन कमांडमेंट्स-दहा आज्ञा’ दिल्या. भाजलेल्या मातीच्या विट0ांवर अग्निशलाकेने या दहा आज्ञा कोरल्या जाऊन मग त्या विटा किंवा ‘टॅबलेट्स’ मोझेसला देण्यात आल्या. माणसाने या आज्ञांचं पालन करावं म्हणजे देव त्याच भलं करेल, असा हा करार होता. मग या मूळ विटांप्रमाणे विटा बनवून त्या एका पेटीत घालून ठेवून त्यांची पूजा करण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली. इथिओपियातल्या या टॅबलेट्स किंवा ताबोत किमान 11व्या शतकातल्या असाव्यात. इंग्रजांनी त्या बेधडक पळवल्या. कारण, इंग्रज हे प्रोटेस्टंट पंथीय होते.
 
या सर्व घडामोडींचा भारताशीही जवळचा संबंध आहे. जगाचा नकाशा पाहा. भारताच्या पश्चिमेला असलेल्या सिंधुसागर किंवा अरबी समुद्राच्या पलीकडे अरेबियन द्वीपकल्पातले ओमान (उमान) आणि येमेन (यमन) हे देश दिसतात. त्यांच्या दक्षिणेकडून अरबी समुद्राचा एक फाटा घोड्याच्या नालासारखा आत घुसला आहे. या विशिष्ट आकारामुळेच या भूप्रदेशाला ’हॉर्न ऑफ आफ्रिका’ असं नाव मिळाले आहे. त्या समुद्री फाट्याला म्हणतात-तांबडा समुद्र. या तांबड्या समुद्रावर सलामीलाच लागणारे देश म्हणजे सोमालिया, इरीट्रिया आणि इथिओपिया. आज हे सगळे वेगवेगळे देश असले तरी 14-15व्या शतकात अरब त्यांना म्हणायचे ‘अल हबझ.’ तुर्क त्यांना म्हणायचे ‘हबसस्तान.’ यावरून पोर्तुगीज आणि स्पॅनिश त्यांना म्हणायचे ‘अबिसीनिया.’ आपण म्हणायचो ‘हबसाण.’
 
येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर त्याचे शिष्य इजिप्तप्रमाणेच इथिओपियातही गेले. त्यामुळे तिथले ख्रिश्चन स्वतःला सर्वांत जुने ख्रिश्चन म्हणवतात, तसाच इस्लाम धर्मसुद्धा प्रेषित महंमदांच्या हयातीतच अरबस्तानातून इथिओपियात पोहोचला. इथिओपिया निसर्गदृष्ट्या अतिशय अवघड देश आहे. त्याच्या काही भागांत चार महिने, तर काही भागांत सात महिने पाऊस पडतो. आजच्याप्रमाणे तो एकच देश नसून त्याच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी राज्यं होती. अनेक ठिकाणी शक्तिमान टोळीप्रमुखांच्या इच्छेप्रमाणे राज्य चालायचं. काही राजे-टोळीप्रमुख ख्रिश्चन होते, तर काही मुसलमान होते. पण, अरबस्तानच्या अगदी शेजारी असल्यामुळे मुसलमान टोळीवाले धार्मिक आणि राजकीय वर्चस्व स्थापन करायला फारच उत्सुक असत.
 
इ. स. 1862 साली थिओडोरस दुसरा हा कॅथलिक ख्रिश्चन राजा एका मोठ्या भूभागाचा अधिपती होता. या काळात ब्रिटन ही जगातली ‘सर्वोच्चमहासत्ता’ म्हणून प्रस्थापित झालेली होती आणि रशिया ब्रिटनला शह देण्यासाठी धडपडत होता. झालं असं की, इथिओपियन राजा थिओडोरसने ब्रिटिश महाराणी व्हिक्टोरिया हिला एक पत्र लिहीलं की, ‘माझं राज्य अस्थिर करण्यासाठी अन्य मुसलमान राजे आणि टोळीवाले धडपडत आहेत. त्यांना तुर्कस्तानचा पाठिंबा आहे. कारण, तो ही मुसलमान आहे. तेव्हा ख्रिश्चानिटीच्या रक्षणासाठी आपल्यात मैत्री व्हावी आणि ब्रिटनने तुर्कस्तानला जरा तंबी द्यावी.’
 
ब्रिटिश मुत्सद्यांनी या पत्रावर विचार केला. त्यांचं असं मत पडलं की, इथिओपियातल्या अनेक राजांपैकी एकाशी आपली मैत्री झाली वा न झाली, तरी आपल्याला फार फरक पडत नाही. उलट तुर्कस्तानला तंबी पोहोचवण्यात आपला तोटा आहे. कारण, रशियन साम्राज्य आणि ब्रिटिश साम्राज्य यांच्या दरम्यान तुर्कस्तानच्या साम्राज्याची पाचर असणं आपल्याला लष्करीदृष्ट्या आवश्यक आहे. तेव्हा तुर्कस्तान रशियाच्या बाजूला झुकता कामा नये, असा विचार करून लंडनने थिओडोरसच्या पत्राला उत्तर न देता ते फाईल करून टाकलं. थिओडोरस संतापला आणि त्याने इथिओपियात प्रचार कार्य करणार्‍या बर्‍याच इंग्रज प्रोटेस्टंट पाद्य्रांना पकडून तुरुंगात टाकलं. त्या प्रकरणी रदबदली करायला गेलेल्या दोघा इंग्रज मुत्सद्यांनाही अटक केली.
 
झालं. लंडनमध्ये वातावरण तापलं. थिओडोरसला शिक्षा करण्यासाठी भारतातून सैन्य पाठवायचं ठरलं. इंग्रजी लष्करी इतिहासात प्रथमच सैन्याचं नेतृत्व नुकत्याच युद्धकुशल सेनापतीकडे न देता एका इंजिनिअर सेनापतीकडे देण्यात आलं. त्याचं नाव होतं लेफ्टनंट जनरल रॉबर्ट नेपियर. 1857च्या भारतीय क्रांतियुद्धात नेपियरने फारच पराक्रम गाजवला होता. सेनापती तात्या टोपे यांचा पराभव करून क्रांतियुद्ध संपवणारा तो हाच नेपियर.
 
ऑक्टोबर 1867 मध्ये मुंबई बंदरातून ’बाँम्बे आर्मी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या इंग्रजी सैन्य तुकड्या निघाल्या. यात ‘बलुच रेजिमेंट’, ‘मराठा लाईट इन्फन्ट्री’, ‘राजस्थानी सैनिक’ असे एकंदर 13 हजार लढाऊ सैनिक आणि 26 हजार साहाय्यक होते. 40 हजार जनावरं होती. यांत घोडे आणि सामान वाहणार्‍या खेचरांशिवाय 44 प्रशिक्षित हत्ती होते. ’कोअर ऑफ रॉयल इंजिनिअर्स’ हे सुप्रसिद्ध पथक होतं. या लोकांनी तांबड्या समुद्रावरच्या झूला या बंदरात उतरून तिथपासून थिओडोरसच्या राजधानीच्या मग्दाला या किल्ल्यापर्यंत रस्ता बांधून काढला. इंग्रजांनी अतिशय धोरणीपणाने वाटेत लागणार्‍या स्थानिक लोकांकडून अन्नपाणी, जनावरांना चारा या गोष्टी रोख पैसा मोजून विकत घेतल्या. यामुळे वाटेत कोणताही संघर्ष न होता तब्बल 640 किमीचा रस्ता बांधून काढत तीन महिन्यांनंतर इंग्रज सैन्य मग्दाला किल्ल्याखाली पोहोचलं. एप्रिल 1868 मध्ये भीषण रणकंदन झालं. इंग्रजी तोफांनी थिओडोरसने सैन्य भाजून काढलं. थिओडोरसने आत्महत्या केली. गंमत म्हणजे त्याने एकेकाळी राणी व्हिक्टोरियाने त्याला भेट दिलेल्या पिस्तुलानेच आत्महत्या केली.
 
विजयी इंग्रज सैन्याने मनसोक्त लूट करताना संपत्तीसह चर्चमधल्या धार्मिक महत्त्वाच्या ताबोत विटादेखील लुटल्या. थिओडोरसचा सात वर्षांचा राजपुत्र आलेमायू यालाही पकडून इंग्लंडला नेण्यात आलं. राणी व्हिक्टोरियाला या पोराबद्दल माया वाटली. तिने कॅप्टन टिस्ट्रॅम स्पीडी या इथिओपिया तज्ज्ञाकडे त्याची देखभाल सोपवली. कॅप्टन स्पीडी 1872 साली भारतात लखनौ जवळच्या सीतापूर गावी पोलीस सुपरिटेंडेंट म्हणून आला. त्याच्याबरोबर राजपुत्र आलेमायू देखील काही काळ भारतात राहिला होता. पुढे तो इंग्लंडला परतला आणि वयाच्या 19व्या वर्षी ‘प्लूरसी’ने मरण पावला. त्याचा देह दहन करून अस्थि विंडसर कॅसलमध्ये दफन करण्यात आल्या.
 
आता प्रबल राजकीय इच्छाशक्ती असणारं भारत सरकार ज्याप्रमाणे ब्रिटनकडे आपल्या मौल्यवान वस्तू परत मागतं आहे; तसंच इथिओपिअन सरकारही राजपुत्र आलेमायूच्या अस्थि आणि पवित्र ताबोत परत मागत आहे.
 
अब देखते रहेंगे, क्या होता है आगे आगे...!
 
 
Powered By Sangraha 9.0