जाणून घ्या- का स्थापन केली समर्थानी हनुमानाची ११ मंदिरे

    06-Apr-2023   
Total Views |
 
11 maruti
 
समर्थ रामदासांनी संसाराचा त्याग केला आणि ब्रह्मचार्याचा पुरस्कार केला. का? ज्या वयात आपण स्वतःची जबाबदारी घेऊ शकत नाहीत त्या वयात अजून एका माणसाची जबाबदारी घेण्याची वेळ येऊ नये या जाणिवेतून त्यांनीहे पाऊल उचलले. तो काळ होता स्वराज्यस्थापनेपूर्वीचा. प्रसंगी चालत नद्या पोहून पार करत त्यांचे मार्गक्रमण चालू होते. या काळात त्यांनी परकीयांनी आपल्यावर केलेली आक्रमणे पहिली. त्या मूठभर परधर्मीयांचा या मोठ्या लोकसंख्येवर असलेला वचक त्यांनी पहिला. आपल्याकडची मातीत कष्टाची कामे करून सशक्त व काटक माणसे मात्र संख्येने जास्त असूनही या अधिकाऱ्यांसमोर घरात लपून राहू लागली. हे पाहून सुराज्य स्थापन व्हावे व ती जबाबदारी एका कुणाची नव्हे हे त्यांना उमगले होते.
 
आपले देव म्हणजे मूर्तिमंत शक्ती, बुद्धी, कला व समृद्धीची प्रतीके आहेत. ती सामर्थ्य प्रदान करतात. स्वावलंबित्व शिकवतात. आत्मनिर्भर कसं व्हावं हे सांगतात. म्हणून त्यांनी गावागावातून लहान मुले, उद्याच्या उज्वल भविष्यातले तरुण गोळा केले आणि त्यांना बलोपासना करावयास सांगितली. संघटनाचे महत्व त्यांना कळले होते. त्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन मारुतीरायाची स्थापना केली. बलोपासनेच्या माध्यमातून शाखा स्थापन केल्या. कोल्हापूर सातारा भागात यांनी एकूण ११ मारुती मंदिरांची स्थापना केली.
 
आज हनुमान जन्मोत्सव. त्यानिमित्त समर्थ संप्रदायाच्या माध्यमातून स्थानिकांचे प्रबोधन कणाऱ्या समर्थ रामदासांनी हनुमान मंदिरांसाठी ज्या जागा निवडल्या, त्यांची थोडक्यात माहिती आणि छोट्या छोट्या गोष्टीवजा आठवणी या व्हिडीओ मधून तुम्हाला सांगतेय. सर्वप्रथम रामदासांनी हा संकल्प सोडला तो साताऱ्याजवळील जरंडेश्वर मंदिरात मारुतीरायाचे दर्शन घेऊन. १६४५ ते १६५५ या दहा वर्षांत त्यांनी मंदिरांची स्थापना केली. सर्व वयोगटातील पुरुष, प्रसंगी लहान मुले व त्यानंतर स्त्रिया सुद्धा मंदिरांसाठी आपल्याला जमेल ते कार्य करू लागल्या. समर्थ स्वतः झाडू हातात घेऊन कमला लागत. यातून गावकर्यांना हुरूप येत असे. इतकंच काय तर समर्थानी गोदेच्या किनारी वसलेल्या टाकळी, सज्जनगड, शिवथरघळ, मिरज, महाबळेश्वर, वाई, टेंभू, शिरगाव, सिंहगड, तंजावर याठिकाणीही मारुतीची स्थापना केली. पुढे हिमालयातील बद्रीनाथ येथेही मारुतीची त्यांनी स्थापना केली.
 
सातारा-कराड रस्त्यावर उंब्रज गावात चिपळूणकडे जाणारा एक रास्ता मोडला आहे. इथून उजव्या बाजूस वळून थोडे पुढे गेले की, एक रस्ता चाफळला जातो. उंब्रजवरून साधारण ११ कि.मी. अंतरावर चाफळ आहे. १६४८ साली या गावात त्यांनी चाफळच्या वीर मारुतीची स्थापना केली. येथील राममंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुती अशा दोन मूर्तींची स्थापना केली. या मारुतीच्या मूर्तीची उंची सहा फूट एवढी आहे. १९६७ साली कोयनेचा भूकंप झाला, त्यात राममंदिराचे नुकसान झाले. परंतु या मारुती मंदिराला काहीही हानी पोचली नाही. अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीच्या मंदिराभोवती हे मारुती आपल्या राजाच्या सेवेसाठी तत्पर आहेत.
चाफळ येथे अजून एक मूर्ती आहे. रौद्र रूपातील या मंदिराला वीर मारुती किंवा भीम मारुती असेही म्हणतात.
चाफळपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका वीरगळला समर्थानी मारुतीचे रूप दिले. गावागावात सापडणाऱ्या वीरगळ या गावरक्षक देवता म्हणून पिढ्या न पिढ्या पुजल्या जातात. तीच शिळा कोरून मारुतीची मूर्ती त्यांनी स्थापन केली. १६५० मध्ये घोड्याच्या आकाराच्या या खडकात कोरून केलेली ५ फुटी मारुतीची ही मूर्ती आहे. भिंतीवर द्रोणागिरी पर्वताचे चित्र असलेला हा माजगावचा मारुती.
 
ज्या शिंगणवाडीत समर्थानी मठाची स्थापना केली होती व ज्ञानेश्वरीची नक्कल करून घेतली होती, त्या गावात खडीचा मारुती किंवा बालमारुती अशी लहानशी मूर्ती स्थापन केली. दक्षिणेत शहाजी राजांची भेट झाल्यानंतर याच गावात शिवाजी महाराज समर्थांना भेटावयास आले होते. म्हणून या मारुतीलाही मोठे महत्व आहे. या देवाला कुबडतीर्थही म्हणतात. महाराजांसाठी कुबडीच्या साहाय्याने पाण्याचा वाहता झरा समर्थानी इथून सुरु केला अशी आख्यायिका इथे सांगितली जाते.
उंब्रज गावात समर्थ रामदासांना काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. याजागीही त्यांनी मारुतीरायाचे मंदिर बांधले, बलोपासनेच्या सवयी लावल्या, संघटन केले व पुढील प्रवासाला निघाले. हा उंब्रजचा मारुती.
पायाखाली जंबुमाली राक्षसाचं कलेवर असलेला एक मारुती उंब्रज पासून १० किलोमीटरवर आहे. मसूर या गावातील ही पाच फुटी मूर्ती चुन्यापासून तयार केलेली आहे. म्हणूनच या मंदिराला मसुरी मारुती असे म्हणतात.
सूर्योदय आणि सूर्यास्ताला मूर्तीच्या मुखावर प्रकाश पडावा अशी रचना असलेली चुन्याची ७ फुटी मूर्ती सांगली जिल्ह्यातल्या शिराळे गावाजवळ आहे.
 
कऱ्हाड मसूर रस्त्यावर मसूर पासून ३ किलोमीटरवर शहापूर फाटा लागतो. इथून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे. रांजणखिंड इथेच आहे. या खिंडीत समर्थानी काही काळ मुक्काम केला होता. इथेच त्यांना वाघरू दिसलं होतं.
यानंतर बहे बोरगावचा मारुती. गो नि दांनी त्यांच्या ‘दास डोंगरी राहतो’ पुस्तकात अशीही आठवण लिहून ठेवलीय की, एका गावातील तलावातून रामदासांनी ही मूर्ती उडी मारून काढून आणली. व तिची स्थापना जवळच बांधकाम सुरु असलेल्या मंदिरात केली. असे झाल्यानंतर मूळ मूर्ती जिथे सापडली ती लोक येऊन मूर्ती मागू लागले. जिथे मूर्ती सापडली त्याच गावात तिची प्रतिष्ठापना व्हायला हवी. रामदासाच्या उपदेशाचा काहीही उपयोग झाला नाही, शेवटी गावकर्यांना ते म्हणाले तुमची मूर्ती तुम्ही घेऊन जा. कित्येक माणसे कामाला लागली तरीही मूर्ती नेऊ शकले नाहीत व समर्थांचे पाय धरून म्हणाले मारुतीची स्थापना कुठेही करा आम्ही त्या गावात येऊन दर्शन घेऊ. सांगलीतील वाळवे जवळ कराड-कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या साधारण १२ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. प्राचीन काळी इथे राममंदिर होते. त्याच्या पुढ्यात शिवलिंग. या राममंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना केलेली आहे.
 
मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड-ज्योतिबाच्या परिसरात आहेत. पाच फूट उंचीची साधी सुबक अशी मारुतीची मूर्ती आणि मंदिर मनपाडळे गावात आहे.
सर्वात शेवटी स्थापन केलेली सर्वात लहान आकाराची मूर्ती पारगाव जवळ आहे. साधारण दीड फूटांचीच मूर्ती असलेल्या या मारुतीला बालमारुती किंवा समर्थांच्या झोळीतील आहे असेही म्हणतात.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.