नंदुरबार : नंदुरबार येथील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात दि. ४ एप्रिल रोजी रात्री दोन गटामध्ये झालेल्या वादात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केले. मात्र या समाजकंटकांनी दगडांसह काचेच्या बाटल्या फेकल्या त्यात तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी २५ हून अधिक जणांना अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अश्रुधुराच्या कांड्या फोडत पोलिसांनी अर्ध्यातासात परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या दंगलीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.