संगीतकार आणि प्रेक्षकांमधील दुवा

05 Apr 2023 21:55:21
Deepak Raja

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक विश्वसनीय आणि अभ्यासपूर्ण नाव म्हणजे दीपक राजा. दीपक राजांचा संगीताच्या नोट्स लिहिण्यापासून सुरू झालेला प्रवास थोडक्यात जाणून घेऊया...

गीतकार आणि प्रेक्षक यांच्या मधील दुवा म्हणजे दीपक राजा. गेली अनेक दशकं भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेच्या वाढीसाठी अव्याहत प्रयत्नशील असलेली व्यक्ती म्हणजे दीपक राजा. दीपक राजा हे संगीत शास्त्रज्ञ असून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर उत्कृष्ट भाष्य करणारे लेखक म्हणूनही ते तितकेच सुपरिचित आहेत. दीपक राजा यांचा जन्म १९४८ साली झाला. ते ‘इटावा’ घराण्याचे सितार आणि सूरबहार वादक आहेत. दीपक राजा यांनी पुलिन देब बर्मन आणि पंडित अरविंद पारीख यांच्याकडून ४० वर्षांहून अधिक काळ संगीतशास्त्राचे प्रशिक्षण घेतले. जयपूर-अत्रौली घराण्याच्या विदुषी धोंडूताई कुलकर्णी यांच्या हाताखाली त्यांनी ख्याल गायकीचा अभ्यास केला. भारताबाहेर हिंदुस्थानी संगीतातील सर्वात प्रभावशाली निर्माते अशी दीपक राजा यांची ओळख निर्माण झाली. त्यांनी ‘इंडिया अर्काइव्ह म्युझिक लि.’, ‘न्यूयॉर्क’चे ‘रिपर्टोअर विश्लेषक’ म्हणून बरीच वर्षे काम पाहिले. ते ‘श्रुती’ या मासिकात ‘परफॉर्मिंग आर्ट्स’चे स्तंभलेखकदेखील होते.

दीपक राजा यांचा भारतीय शास्त्रीय संगीताकडे एक कलाकार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन निराळा आहे. यासोबतच त्यांचा सूरबाहर तथा सितार या दोन्ही वाद्यांवर वकूब आहे. ‘आयटीसी-संगीत रिसर्च अकादमी’, ‘संगीत नाटक अकादमी’ आणि ‘इंडियन म्युझिकोलॉजिकल सोसायटी’च्या विविध परिषदा आणि नियतकालिकांमध्ये शोधनिबंधांद्वारे त्यांनी योगदान दिले आहे. दीपक राजा यांनी दिल्ली विद्यापीठातून ‘बीए ऑनर्स’ पदवी, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद’ येथून ‘एमबीए’ आणि युकेमधील ‘वॅटफोर्ड कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये जाहिरातींचा अभ्यास केला. ‘आयआयएम, अहमदाबाद’मधून पदवी घेतल्यानंतर, ३० वर्षांहून अधिक काळ राजा यांनी सतार वाजवण्याबरोबरच जाहिरात क्षेत्रातदेखील काम केले. कामाचा समतोल साधत हिंदुस्थानी संगीताचा इतिहास आणि सिद्धांत याबद्दल ज्ञान मिळवले. त्यानंतर १९९५ मध्ये ते पूर्ण-वेळ संगीत समीक्षक झाले. दीपक राजा हे ‘बिझनेस इंडिया’चे संपादक होते. ३० वर्षांहून अधिक काळ ते मीडिया, मार्केटिंग, फायनान्स, तसेच संगीत या विषयांवर लिहिणारे ते कदाचित एकमेवाद्वितीय लेखक ठरावे.

माध्यमजगतातील अनेक वरिष्ठ पदांवर त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’चे सरचिटणीस यासह माध्यम उद्योगात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे आणि ‘इंडियन म्युझिकोलॉजिकल सोसायटी’ (बडोदा/मुंबई) यांच्या शैक्षणिक आणि प्रकाशन कार्यांशी सुद्धा ते संबंधित आहेत. त्यांनी ‘इंडियन म्युझिकोलॉजिकल सोसायटी’च्या ‘ध्रुपद’ या प्रकाशनाचे १९९९ मध्ये सह-संपादन केले होते. इथे संगीत समालोचन करणे हाच एकमेव अर्थाजनाचा मार्ग न ठेवता त्यांनी इतरही कामे हाती घेतली. दीपक राजा यांनी माध्यम संशोधन, व्यावसायिक पत्रकारिता आणि आर्थिक सल्लामसलत या क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांपैकी एका पुस्तकात हिंदुस्थानी संगीताला ‘शास्त्रीय संगीत’ नव्हे, तर ‘कलासंगीत’ म्हटले पाहिजे, असे म्हटले आहे. ‘हिंदुस्थानी म्युझिक टुडे’ या पुस्तकात त्यांनी कला संगीताच्या वैशिष्ट्यांवर चर्चा करून, आजच्या परिस्थितीचे अगदी सखोल विश्लेषण केले आहे.

एकेकाळी दीपक राजा यांच्या घरातील अभ्यासिकेच्या भिंतीवर तीन सितार दिसून यायच्या. मात्र, संगीताचा वारसा पुढे प्रवाहित झाला पाहिजे, या उदात्त विचाराने त्यांनी त्यातील दोन सितारी आपल्या शिष्यांना प्रदान केल्या. अशा या विविध क्षेत्रातील कार्यासाठी राजा यांना २०१३ मध्ये ‘पं. वसंतराव देशपांडे पुरस्कार’, २०१४ मध्ये ’गुजरात गौरव पुरस्कार’ आणि जानेवारी २०१५ मध्ये ‘डॉ. अशोक रानडे स्मृती पुरस्कार’ मिळाला. दोन दशकांपासून राजा यांनी ही भारतीय शास्त्रीय संगीताची परिसंस्था समृद्ध केली आहे. त्यांनी असंख्य अभ्यासपूर्ण लेख आणि चार पुस्तके लिहिली आहेत. ‘हिंदुस्थानी म्युझिक: ए ट्रॅडिशन इन ट्रान्झिशन’, (२००५), ‘खयाल व्होकलिझम : कॉन्टिन्युटी विदिन चेंज’ (२००९), ‘हिंदुस्थानी म्युझिक टुडे’ (२०१२) आणि त्यांचे चौथे पुस्तक, ‘राग-नेस ऑफ रागास : रागांच्या पलीकडे’ हे १६ सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले. २०१९ मध्ये त्यांचे पाचवे पुस्तक ‘दि म्युझिशियन अ‍ॅण्ड हिज् आर्ट’ प्रकाशित झाले. त्यांचे पुढील पुस्तक ‘ग्लिम्प्सेस ऑफ ट्वेंटीथ् सेंच्युरी हिंदुस्थानी म्युझिक’ हे मे २०२३मध्ये प्रकाशित होईल.ते २००७ पासून, swaratala.blogspot.com ब्लॉगदेखील लिहितात. त्यांनी न्यूयॉर्कमधील ‘इंडिया अर्काइव्ह म्युझिक’ने तयार केलेल्या सीडीसाठी ‘स्लीव्ह नोट्स’ लिहिण्यापासून जी सुरुवात केली, त्या संगीत सेवेच्या कामात ते आजही मग्न असतात.अशा हिंदुस्थानी संगीताला सर्वस्व वाहिलेल्या दीपक राजा यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!


Powered By Sangraha 9.0