अलीकडे अशा बर्याच गोष्टी खोट्या स्वरूपात मांडण्याची सुरुवात झाली आहे. मग, या खोट्या गोष्टींना उचलून धरून त्यांना प्रसारित करण्याचे पद्धतशीर काम सुरू केले जाते. अशावेळी ज्यांचे योग्य वाचन नाही वा अभ्यास नाही असे नव-वाचक संभ्रमित होतात. या सगळ्याला छेद द्यावा, यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त हा विशेष लेख!
छत्रपती शिवराय हे आज नुसत्या महाराष्ट्राचे नव्हे, नुसत्या भारताचे नव्हे तर अवघ्या विश्वाचे आदर्श. यात काय संशय? पण, जेव्हा याच शिवरायांचे चरित्र नेमके कसे वाचावे? त्याकडे बघताना कसे बघावे, हे आज सांगून टाकणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हा अभ्यास करताना व त्याकडे तटस्थपणे बघताना चार प्रकारच्या कालखंडात त्याची विभागणी करावी लागेल.
१. शिवरायांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र व भारत
हा काळ म्हणजे प्रचंड धामधुमीचा व हिंदूंसाठी (जे इथले मूळ रहिवासी) पारतंत्र्यात राहण्याचा होता. १५६५ला आजूबाजूच्या पाच बहामनी मुस्लीम राज्यांनी एकत्र येऊन या विजयनगरच्या हिंदू राज्यावर निकराचा हल्ला केला. सर्वधर्मसमभाव पाळणार्या व अखंड सावध नसणार्या या रामदेवरायाला ठार मारले गेले व त्याचे मस्तक अहमदनगरच्या निजामशहाने त्याच्या महालाचे सांडपाणी जेथे पडते तेथे ठेवले व त्या मस्तकावरून त्यांनी अंघोळ वा इतर विधी केलेले पाणी वाहू लागले. विजयनगरचे साम्राज्य नुसते उद्ध्वस्त झाले नाही, तर तेथील अनेक मंदिरे भ्रष्ट झाली. अनेक मंदिरे जमीनदोस्त झाली. त्यांना वाचवायला कोणताही समभाव आला नाही की या परक्या आक्रमकांनी रामदेवरायासारखा विचार केला नाही. विजयनगरच्या उदाहरणाने परत एकदा सिद्ध झाले की, हे नुसते राजकीय आक्रमण नव्हते, तर हे धार्मिक आक्रमण ही होतेच होते.
त्याचवेळी शिवरायांचे आजोबा, वडील (अनुक्रमे मालोजी राजे, शहाजी राजे) हे महाराष्ट्रातील वेरूळमधून वेगवेगळ्या शाहांची चाकरी करत होते. त्यांनी विजयनगरचे विध्वंसक चित्र बघितलेच होते व त्यांच्याही मनात याचे खूप दुःख झालेच असेल, हे नक्की. हिंदूंना कुणीही वाली उरला असा नव्हता. हिंदूंचे देव, मंदिरे जागोजाग पाडली जात होती. त्यावेळी शहाजी राजे-जिजाऊ जागे झाले. त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटून उठली. त्यांनी ठरवले की, या सगळ्यात आपले स्वतःचे- हिंदूंचे असे स्वराज्य असले पाहिजे. विजयनगरचे बुडालेले राज्य हा त्यांच्यासाठी एक धडा होता की, अखंड सावधान कसे राहावे व धर्म हे वेगळेच असतात व हिंदूंवर जो अन्याय, अत्याचार होत होता, तो धर्म भिन्न असल्यानेच होत होता.
२. शिवरायांचा काळ
मग शिवनेरीवर १६३० साली एका नव्या सूर्याचा उदय झाला, शिवरायांचा जन्म झाला. तशी महत्त्वाची घटना, पण शहाजी-जिजाऊंच्या मनातील आगामी योजनांना मूर्त स्वरूप द्यायचे अजून बाकीच होते. अंधार अजून पूर्ण मिटला नव्हता, पण योजना आकारास येऊ लागली होती. ही योजना होती स्वराज्याची. हिंदवी म्हणजेच हिंदूंच्या स्वतःच्या राज्याची. कारण, ही मूळ भूमी हिंदूंची असूनही ते मात्र उपेक्षित झाले होते, गुलाम झाले होते. पण त्याचवेळी त्यांचा स्वाभिमान मेला होता. त्यांच्या देखत मूर्ती, मंदिरे, पूजास्थाने भ्रष्ट, नष्ट होत होती व ते फक्त बघत होते. अशावेळी जिजाऊ व शहाजी यांचा स्वाभिमान जागा झाला व हेच स्वतत्व त्यांनी शिवाजी व संभाजी यांच्यात बीजारोपण करण्यास सुरुवात केली.
जिजाऊ व शिवराय यांनी हे बघितले व कुठलाही उच्च-नीच, जातपात असा भेदभाव न करता या अठरापगड मावळ्यांना त्यांनी जवळ केले व त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. येथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, पारतंत्र्यातून बाहेर येणे हा मुख्य उद्देश कदाचित नंतर पुढे आला किंवा समजला असेल, पण प्राथमिक प्रेरणा धार्मिकच होती. प्राथमिक प्रेरणा हीच होती की, हिंदू देवांचा, देवतांचा, मंदिरांचा होत असलेल्या अपमानाची चीड आणि ही चीड उच्चपदस्थ लोकांपेक्षा, साध्या-भोळ्या जनतेत जास्त होती. याच अपमानाचा सूड घेण्याची गरज शिवरायांनी मावळ्यांमध्ये रुजवली व त्यातून आकार घेऊ लागले हिंदूंचे स्वतःचे राज्य, स्वराज्य!
हे स्वतःचे राज्य सर्वधर्मीयांचे असे नव्हते, पण हिंदूंमधील सर्व अठरापगड लोकांचे मात्र होते. कारण, तेव्हा सर्वधर्मसमभाव वगैरेची संकल्पना नव्हती. किंबहुना, जिजाऊ-शिवराय यांना ’स्वराज्य’निर्मितीची गरज, त्यावेळच्या असलेल्या राज्यांत हिंदूंना समानतेने वागवले जात नव्हते, म्हणूनच वाटली होती. हे का सांगावे लागत आहे, तर आजकाल काही लोक औरंगजेबही कसा चांगला होता व त्याची महत्त्वाकांक्षा धार्मिक नसून, राजकीय होती, अशी चुकीची मांडणी करून आत्ताच्या हिंदूंची दिशाभूल केली जात आहे. औरंगजेबाची महत्त्वाकांक्षा निःसंशय धार्मिक होती, त्याला या देशाला पूर्णपणे इस्लामिक देश बनवायचे होते, पण त्याच्या या आसुरी वेडाच्या समोर शिवाजी राजे, संभाजी राजे व समस्त मराठे सह्याद्री बनून आडवे आले. म्हणूनच औरंगजेबाची जशी महत्त्वाकांक्षा ही धार्मिक होती, तशीच शिवराय व जिजाऊंच्या स्वराज्याची प्रेरणा ही धार्मिकच होती.शिवाजी महाराज कसे धार्मिक होते व हिंदू धर्माचे अभिमानी होते, हे आम्ही खाली जी उदाहरणे देतोय त्यावरून वाचकांना सहज लक्षात येईल.
१. शिवरायांनी परधर्मात गेलेल्या नेताजी पालकर व बजाजी निंबाळकर यांना शुद्ध करून परत हिंदू धर्मात घेतले व त्यांच्याबरोबर भोजन घेतले. त्यांच्या कुटुंबाला ही परत सन्मान दिला. शिवरायांनी प्रथमच दाखवून दिले की, परधर्मात गेलेल्या हिंदूंना परत स्वधर्मात आणताही येते. जर शिवरायांना सगळे धर्म सारखेच आहे असेच वाटत असते व त्यामुळे काही फरक पडत नाही, असे वाटत असते, तर त्यांनी आपल्या या सहकार्यांना त्याच धर्मात राहू दिले असते की नाही?
२. कर्नाटक मोहिमेवर असताना शिवरायांच्या चरित्रातील हा प्रसंग वाचा.वाचकांसाठी मुद्दामच हा प्रसंग पूर्ण देत आहे.राजांची छावणी तिरुवन्नमलईलापडली होती. राजांचे अश्वपथक गावाकडे वळले. समोर समोत्तीपेरूमलच्या एकेकाळच्या भव्य मंदिराचे भग्न अवशेष विखुरले होते. निष्णात हातांनी शिल्पिलेल्या त्या अत्यंत सुबक मूर्तींची अवस्था पाहून राजांचे मन उद्विग्न झाले. राजांनी निश्चयपूर्वक आज्ञा दिली. “पंत, या मशिदी पाडून टाका. इथं आमच्या दैवतांची स्थापना करा. समोत्तीपेरूमलच्या मंदिराच्या पडलेल्या या विटांतून नायक राजांनी बांधलेल्या या हजारखांबी मांडवासमोर सुरेख गोपूर बांधा. या दैवतांची पुन्हा प्रतिष्ठापना झाल्याखेरीज आमच्या मनाला शांती लाभणार नाही.”त्या आज्ञेने जनार्दनपंत, हंबीरराव चकित झाले. जनार्दनपंत म्हणाले, “पण, महाराज, या मशिदी पाडल्या तर मुसलमानांची मनं दुखावतील.”‘’जेव्हा आमची मंदिरं पाडली आणि मशिदी उभ्या केल्या, तेव्हा आमच्या भावना दुखावतील, याचा कुणी विचार केला होता? किंबहुना, आमचा धर्म नष्ट करण्यासाठीच ही कृत्ये केली ना?”
‘’पंत, परधर्मसहिष्णुता म्हणजे स्वधर्माबद्दल अनास्था नव्हे. याच विचारामुळे परकीय आक्रमण सहन करायची सवय आम्हांला लागली आहे; मनं कोडगी बनलीत. देवळं फोडली, तरी आम्ही स्वस्थ! विजयनगरच साम्राज्य कोलमडले, तरी खंत नाही. हीच सवय नडली आम्हांला. नाही तर आम्हां लाखों हिंदूंना अत्यंत पवित्र वाटणारं काशिविश्वेश्वराचं मंदिर औरंगजेब पाडू धजला नसता. पंत, धर्म हा एका पिढीचा खेळ नाही. तो पिढ्यान्पिढ्यांचा वारसा आहे, तो टिकविणे हे आमचं कर्तव्य आहे.आम्हाला परधर्माचा द्वेष नाही. आमच्याही फौजेत मुसलमान आहेत.त्यांच्या मशिदी उभारण्याला विशाल भूमी मोकळी आहे. त्या आमच्याच पवित्र जागेवर बांधल्या गेल्या पाहिजेत, असं कोणी म्हणेल, तर ते आमच्या राज्यात होणार नाही. आमच्या हुकुमाची अंमलबजावणी ताबडतोब सुरू करा !” (संदर्भ : श्रीमान योगी)
३. गोव्यावरच्या मोहिमेमध्ये सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार शिवराय गोव्याच्या मोहिमेवर असताना त्यांना भग्न अवस्थेत असलेले मूळ कदंब राजांनी बांधलेले व मधल्या बहामनी राज्यांत पाडले गेलेले मंदिर दिसले. शिवरायांनी मग या मंदिराचा ही जीर्णोद्धार केला व त्याचा शिलालेख आजही येथे बघायला मिळतो.
४ .शिवाजी महाराज नियमितपणे पूजाअर्चा करत व असताना ही त्यांचे पूजेचे शिवलिंग स्फटिक त्यांच्या बरोबर असायचे.
५. जिथे जिथे त्यांनी नवीन किल्ले बांधले तिथे त्यांनी अनेक नवीन मंदिरे ही बांधली, कुठेही त्यांनी मशीद वा चर्च असे काही उभारली नाहीत.
६. शिवरायांचा मृत्यूसमय जवळ आला तेव्हा त्यांचे शेवटचे वाक्य वा अंतिम इच्छा हीच होती की, मथुरा, काशिविश्वेश्वर मुक्त करा. त्यांची ही अपूर्ण इच्छा पुढे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी १७७० साली पूर्ण केली.
३. संभाजी महाराजांचे बलिदान व दिल्लीवर फडकला भगवा!
छत्रपती संभाजी यांच्या मातोश्री सईबाईसाहेब ते खूप लहान असतानाच गेल्या. त्यामुळे त्यांचे मुख्य पालनपोषण जिजाऊंनीच केले. म्हणजेच या माऊलीने एकाचवेळी आपल्या देशाचे दोन राष्ट्रपुरुष घडवले. संभाजीराजेही जिजाऊंच्या तालमीत तयार झालेले दुसरे छत्रपती होते, त्यामुळे त्यांच्यातही हिंदू धर्माचा अभिमान तितकाच होता जितका तो पहिल्या छत्रपतीमध्ये होता. त्यामुळे त्यांनी व त्यांचे मित्र कवी कलश यांनी अतिशय धैर्याने मृत्यूचा स्वीकार केला, पण मुस्लीम धर्म स्वीकारला नाही. या दोघांचाही प्रचंड छळ झाला, पण, त्यांनी या कमी वयातही अद्भुत धैर्य दाखवले. संभाजी महाराजांचे हे बलिदान म्हणजे अभूतपूर्व ठरले व मराठे सूडाने पेटून उठले व त्यांनी औरंगजेबाची कबर येथे महाराष्ट्रातच नुसती खोदली नाही, तर पुढच्या ५०-६० वर्षांत मुघलांचे साम्राज्य पूर्णपणे उध्वस्त केलं. शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले. पुढे थोर मराठा सरदार महादजी शिंदे यांनी दिल्लीवर भगवा फडकवला, जो तब्बल ४० वर्षे तरी तसाच अभिमानाने फडकत होता.
४. सध्याचा काळ
सध्याचा काळ म्हणजे एक संक्रमण काळ सुरू आहे. हिंदू समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे. आपले सर्वोत्तम आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव मानणारे होते, त्यांच्या सैन्यात खूप सारे मुस्लीम होते, त्यांना हिंदू धर्माचा काही विशेष अभिमान नव्हता, तर त्यांना सगळे धर्म सारखेच वाटत असायचे, असे अगदी रंगवून, व खोटे-खोटे सांगितले जात आहे व अर्धवट अभ्यास असणारे व ज्यांचे फार असे वाचन नाही, असे लोक गोंधळून जाणे वा संभ्रमित होणे सहज शक्य आहे किंवा जे अशा प्रकारच्या पुरावा नसलेल्या लिखाणावर विश्वास ठेवू शकतात व त्यांची दिशाभूल सहज शक्य आहे. या सगळ्यालाच छेद देणे व पुराव्यासाहित हे सगळे मांडणे गरजेचे होते व वाटले.
शिवाजी राजे परधर्माचा द्वेष कधीही करत नव्हते. पण, त्याचवेळी ते सहिष्णुता बाळगणारे ही नव्हते. स्वतः जिजाऊ व शिवराय त्यावेळच्या मुस्लीम राज्यकर्त्यांचा कावाही ओळखून होते, म्हणूनच त्यांनी साध्या मावळ्यांमध्येही स्वधर्म (म्हणजेच हिंदू धर्म) व स्वराज्य (हिंदूंना न्याय देणारे स्वतःचे राज्य) याचा स्वाभिमान जागा केला. त्यामुळेच हे मावळे प्रत्येक युद्धात धैर्याने लढले व प्रसंगी मृत्यूला ही त्यांनी या मोठ्या कारणास्तव व या यशासाठी कवटाळले.सध्या हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून आपापसातील जातिभेद, मतभेद विसरून पूर्वी जितके एक झालो नाही, त्यापेक्षाही जास्त एकत्र येऊया, हीच गोष्ट आपण शिवाजी महाराज यांचे चरित्र योग्य अर्थाने समजून घेतल्याची मुख्य पावती असेल.सध्या हिंदूंनीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून आपापसातील जातिभेद, मतभेद विसरून पूर्वी जितके एक झालो नाही, त्यापेक्षाही जास्त एकत्र येऊया. हीच गोष्ट आपण शिवाजी महाराज यांचे चरित्र योग्य अर्थाने समजून घेतल्याची मुख्य पावती असेल.म्हणूनच शिवाजी महाराजांचे चरित्र वाचताना हेच लक्षात घ्यावे की, त्यांनी जे स्वराज्य निर्माण केले, ते हिंदवी स्वराज्य होते, हिंदूंचे आपले स्वतःचे राज्य होते. त्यांचे चरित्र बहुविध आहे, त्यांच्या चरित्रातून शिकण्यासारख्या व घेण्यासारख्या असंख्य घटना वा गोष्टी आहेत. त्यामुळेच त्याचा अभ्यास जगातल्या अनेक देशांत केला जात आहे व तो आपल्या देशासाठी अभिमानास्पद नक्कीच आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
-हेमंत सांबरे