पाकच्या आशेवर पाणी...

30 Apr 2023 20:12:31
 
 
 
Bilawal Bhutto
 
 
भारताला 2023च्या शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली असून, वर्षभर भारतात विविध बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. त्यानुसार, मे महिन्यात संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ते भारत दौर्‍यावर येणार असून गेल्या दशकभरात प्रथमच पाकिस्तानचा कुणी नेता भारताचा दौरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या दौर्‍यामुळे पाकिस्तानच्या हाती काय लागेल, भारत-पाकिस्तानमधील संबंध पुन्हा पूर्ववत होतील का, यांसह या दौर्‍याचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे.
 
शांघाय सहकार्य संघटनेत सध्या नऊ सदस्य असून इराण हा संघटनेचा नवा सदस्य आहे. 2017 साली भारत आणि पाकिस्तान हे दोन देश संघटनेचे सदस्य बनले. संघटनेचे अध्यक्षपद आणि संमेलनाच्या आयोजनाची संधी प्रत्येक देशाला मिळत असते. 2023 चे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. त्यामुळे भारतात संघटनेच्या अनेक बैठका आयोजित केल्या जात आहेत. याच अंतर्गत भारताने परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे गुरुवार, दि. 4 मे आणि शुक्रवार, दि. 5 मे रोजी गोवा येथे आयोजन केले आहे.
 
गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. नुकत्याच काश्मीरमधील पूँछ येथील दहशतवादी हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले. तसेच, पाकिस्तानकडून भारताला वारंवार दिल्या जाणार्‍या युद्धाच्या धमक्या यांमुळे बिलावल यांच्या दौर्‍यावर प्रश्चचिन्ह निर्माण झाले होते. परंतु, सध्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानला मदतीची आणि साहाय्याची प्रचंड आवश्यकता आहे. आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान कर्जासाठी भीक मागत असताना त्याला भारताकडूनही मोठ्या अपेक्षा आहे. 2024 साली पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका असल्याने तिथेही या दौर्‍याचे राजकारण सुरू झाले आहे. काही जणांकडून दौर्‍याचे समर्थन केले जात असले तरीही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिलावल यांच्या दौर्‍याला विरोध सुरू झाला आहे. लष्कराचा पाक सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, सध्या तरी पाकिस्तानचा आर्थिक गाडा गाळात रूतलेला असताना हा दौरा पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. भलेही भारताने पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चेत स्वारस्य दाखवले नसले तरीही बैठकीत सहभाग घेतल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव निवळणार का, हे पाहावे लागणार आहे. 2014 साली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीकरिता भारतात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचा मुलगा बिलावल भारतात येत आहे.
 
दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर बिलावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यांनी पंतप्रधान मोदींना ‘गुजरातचा कसाई’ म्हटले होते. सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर बिलावल यांनी अशी गुजरातच्या जनतेची भावना असल्याची सारवासारव केली होती. त्यामुळे बिलावल यांच्यासोबत बैठकीला या आणि परत जा, एवढीच भूमिका भारताने सध्या ठेवली आहे. त्यामुळे पाकला या बैठकीतून फार काही हाती लागेल, असे सध्या दिसत नसले तरी आपली उरलीसुरली इज्जत वाचविण्यासाठी आणि पुढील निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पाकला हा दौरा मदत करू शकतो. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन्ही देशांत तीनवेळा युद्ध झाले. काश्मीर प्रश्नी पाक नेहमी भारतावर हल्ले करण्याची संधी शोधत असतो. 2016 साली पठाणकोट हल्ला झाल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध आणखी बिघडले. कारण, तेव्हा भारताने गप्प न राहता थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी ठिकाणे नष्ट केली होती. 2019 साली ‘कलम 370’हटविण्यात आल्यानंतर पाकचा तीळपापड झाला. पाकने राजदूतांना परत बोलावले. व्यापार आणि संपर्क पूर्णतः बंद केला. त्यामुळे आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण कायम आहे आणि भारताच्या जशास तसे या बाण्यामुळे पुढेही हे संबंध कायम राहतील का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. भारताला पाकपासून काहीही फायदा नसला तरीही पाकला मात्र अडचणीच्या काळात या बैठकीतून छोटीशी आशा नक्कीच असेल. परंतु, द्विपक्षीय चर्चेला साफ नकार देत भारताने पाकच्या या आशेवरही पाणी फेरले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0