अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते, मग ते छोटे असो वा मोठे, स्वतःचे हक्काचे घर सर्वांसाठी जिव्हाळ्याचे असते. यासाठी राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामात गतिमानता व गुणवत्तावाढीसाठी दि. 20 नोव्हेंबर, 2022 पासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 24 नोव्हेंबर, 2022 रोजी संपन्न झाला. ‘सर्वांसाठी घरे-2024’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ च्या माध्यमातून गरीब, गरजू, भूमिहीन व बेघर लाभार्थ्यांसाठी राज्यात पाच लाख घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणार असून ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील कामगिरीबाबत राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी मांडलेले विचार...
ग्रामीण गृहनिर्माण योजना
राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत ‘रमाई आवास योजना’, ‘शबरी आवास योजना’, ‘पारधी आवास योजना’, ’आदिम आवास योजना’, ‘अटल बांधकाम कामगार आवास योजना’, ’यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना’ अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येत असून त्यांना पूरक ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना’, अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना या योजनाही राबविल्या जातात. या योजना राज्यस्तरावरून ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, जिल्हास्तरावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, तालुकास्तरावर पंचायत समिती व ग्रामस्तरावर ग्रामपंचायत कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांना अनुदान केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान आवास योजने’च्या धर्तीवर देण्यात येते.
राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाची भूमिका व जबाबदारी
ग्रामविकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयामार्फत सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभाग, जिल्हा, तालुका तसेच गावपातळीवर आढावा बैठका, कार्यशाळा व क्षेत्रीय भेटी, इ. च्या माध्यमातून संनियंत्रण आणि मूल्यमापन करणे, केंद्र शासन व राज्याच्या इतर विभागांशी उदा. सामाजिक न्याय, आदिवासी विकास, महसूल, इ. विभागांशी समन्वय ठेवणे, क्षमता बांधणीसाठी विविध स्तरावर ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांसाठी कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणे, ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रासंबंधित माहिती, शिक्षण व संवाद यासाठी विविध उपक्रम राबविणे, ग्रामीण गृहनिर्माण योजनांसंदर्भात येणार्या अडचणींचा अभ्यास करून तसेच योजना अधिक कार्यक्षमपणे राबविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विविध प्रस्ताव सादर करून धोरणात्मक निर्णय केंद्र व राज्य शासनाकडून घेणे.
ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील फलश्रुती
ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रात विविध उपक्रम राबवून राज्यात 63 हजार, 221 भूमिहीन लाभार्थ्यांना जागेची उपलब्धता, 19 लाख, 46 हजार, 716 घरकुलांना मंजुरी, 17 लाख, 72 हजार, 892 घरकुलांना पहिल्या हप्त्याचे वितरण, 13 लाख, 16 हजार, 104 घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण, 6 लाख, 30 हजार, 612 घरकुलांचे बांधकाम प्रगतीत, 15 हजार, 500 प्रलंबित घरकुले पूर्ण, 11 लाख, 38 हजार, 944 घरकुले आर्थिकदृष्ट्या पूर्ण, 20 हजार, 374 ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण झाले असून दहा हजार प्रगतीत आहे, 344 डेमो हाऊसेस पूर्ण, यासह विविध शासकीय योजनांशी कृती संगम करून लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांचा लाभ देऊन जीवनमान उंचावण्यास मदत झाली. यामध्ये ‘मनरेगा’मधून 6 कोटी, 52 लाख, 77 हजार, 436 रोजगार, स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) मधून 8,45,008 शौचालय, जलजीवन मिशनमधून 6 लाख, 82 हजार, 928 नळजोडणी, ‘प्रधानमंत्री उज्वला योजने’मधून 7,42,068 गॅस जोडणी, ‘सौभाग्य योजने’मधून 7 लाख, 87 हजार, 422 विद्युत जोडणी, चडठङच् मधून 1,32,555 उपजीविकेचे साधन व महाराष्ट्र उर्जा अभिकरण (महाउर्जा) मधून 1,11,115 ऊर्जेच्या बचतीसाठी, इ. योजनांचा घरकुलासह लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. तसेच, राज्यात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून घरकुल बांधकामासाठी पुरेशी जागा नाही, अशा ठिकाणी 2 हजार, 377 बहुमजली इमारतीची उभारणी, ज्या ठिकाणी पुरेशी जागा आहे, अशा ठिकाणी 1,057 गृह संकुलांची उभारणी, घरकुल बांधकामासाठी 18 हजार, 941 लाभार्थ्यांना गृहकर्जाची उपलब्धता, घरकुल बांधकाम साहित्य बाजार भावाप्रमाणे व जवळच्या ठिकाणी उपलब्धतेसाठी महिला बचत गटांच्या सहाय्याने 1 हजार, 497 घरकुल मार्टची उभारणी, 1 हजार, 530 सॅण्ड बँक निर्मिती, 6 हजार, 420 लॅण्ड बँक निर्मिती व रस्ते, पथदिवे, भूमिगत गटार, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, इ. 7 लाख, 37 हजार, 900 मूलभूत नागरी सुविधा देऊन आदर्श घरांची निर्मिती करण्यात आली.
नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे
या अभियानामध्ये ग्रामीण गृहनिर्माण लाभार्थ्यांच्या बहुमजली इमारती, गृहसंकुले व हाऊसिंग अपार्टमेंट यांच्या सहकारी संस्था स्थापन करणे, वाळूला पर्याय म्हणून क्रश सॅण्ड, सिमेंट ब्लॉक, फ्लाय ब्रिक्स, इंटर लॉकींग ब्रिक्स, हॉलो ब्रिक्स इत्यादींचा वापर करणे, किमान दहा टक्के घरकुल बांधकामासाठी स्थानिक बांधकाम साहित्य, नवनवीन बांधकाम तंत्रज्ञान, किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञान, नैसर्गिक आपत्ती रोधक तंत्रज्ञान, इ. चा वापर करणे, किमान दहा टक्के घरकुल बांधकामामध्ये फरशी/लादी, रंगरंगोटी, किचन गार्डन/परसबाग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा साधने व नेट बिलिंग, इ.चा वापर करणे. रंगरंगोटी करताना घरकुलांना रंगसंगती करणे व घरावर ग्रामीण गृहनिर्माण योजनेचा लोगो, पती पत्नीचे नाव व ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीमध्ये घरकुलाची नोंद इ. बाबींची पूर्तता करणे. इ. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.
इतर ठळक योजना व उपक्रम
‘अमृत महाआवास अभियान 2022-23’चा प्रचार व प्रसिद्धीसाठी
माहिती शिक्षण व संवाद (खएउ) कार्यक्रम
ग्रामीण गवंडी प्रशिक्षण
डेमो हाऊस व कॉप-शॉप
घरकुल मार्ट
बाह्य राज्यातील अभ्यास दौरे
‘अमृत महाआवास अभियान’ पुरस्कार तसेच ‘महाआवास’ अभियानात उत्कृष्ट काम करणारे व्यक्ती व संस्था यांना मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री तसेच अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘राज्यस्तरी महाआवास’ अभियान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याप्रमाणे ‘अमृत महाआवास अभियान’ कालावधी संपल्यावर अभियानात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन सबंधित स्तरावरील अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समितीमार्फत करून राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, ग्रामस्तरावर उत्कृष्ट कामासाठीच्या पुरस्कारांची नामांकने काढण्यात येतील. याकरीता पुरस्कार निवडीचे निकष व गुणदान तक्ता तयार करण्यात आला असून अभियानात उत्कृष्ट काम करणारे विभाग, जिल्हे, तालुके, क्लस्टर्स, ग्रामपंचायती, लाभार्थी यांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. याकरिता राज्यातील सर्व पदाधिकारी, शासकीय/निमशासकीय अधिकारी/कर्मचारी, सहाय्यकारी संस्था, कॉर्पोरेट संस्था, लाभार्थी व लोक यांनी अमृत महाआवास अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन मी या निमित्ताने करतो.
- गिरीश महाजन
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री