मुंबई : लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानानं चांगलं जीवन जगता यावं, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची पत्राद्वारे मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ही माहिती अजित पवारांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
या पत्रातून त्यांनी कलाकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागात आजही लोककलावंत आपली कला जोपासत आहेत. मात्र, त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना कसलीही मदत मिळत नाही. परिणामी त्यांना हलाखीचे जिवन जगावे लागते. याची दखल घेत अजित पवारांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.
“महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशा कलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोककलावंतांसाठी निवास, भोजन, औषधोपचारांची सोय, वृध्दाश्रम सुविधा तसंच त्यांना अल्पव्याजानं कर्ज, मुलांच्या शिक्षणाची सोय, शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. राज्यातील मागास, अतिमागास समाजातील कलावंतांच्या पिढ्यांनी त्यांच्या त्याग, समर्पणातून ही कला जिवंत ठेवली, वाढवली, समृद्ध केली. या तमाशा कलावंतांसह राज्यातील समस्त लोककलावंतांच्या मान-सन्मानाकडे, हक्कांकडे, विकासाकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे.” असं अजित पवार म्हणाले.
“तमाशाकलेला समृद्ध, लोकप्रिय करण्याच्या कार्यात तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आणि त्यांच्या कुटुंबियांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. तमाशाकलेची आयुष्यभर सेवा करणाऱ्या स्व. विठाबाईंचे अखेरचे दिवस हलाखीत गेले. लोककलावंतांच्या वाट्याला येणारं हे दुःख टाळण्यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय तातडीनं घ्यावा, महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, महामंडळाचं कामकाज लवकरात लवकर सुरू करून लोककलावंतांना दिलासा द्यावा.” अशी मागणी त्यांनी केली आहे.