सागरी जैवविविधता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील आणि त्याविषयी प्रगाढ अभ्यास असलेले विशाल भावे यांचा जन्म मूळचा रत्नागिरीचा. रत्नागिरीच्याच दामले विद्यालयात प्राथमिक शिक्षण तर, आर. बी. शिर्के विद्यालयात त्यांनी माध्यामिक शिक्षण पूर्ण केले. सागरी जैवविविधतेत आणि सागरीविश्वाविषयी सुरुवातीपासूनच त्यांना फार आकर्षण होते असे नाही. मात्र, जसजसे शिक्षण, ज्ञान वाढ गेले, तसतसे त्यांना या सागरी प्राण्यांविषयी, इतर जैवविविधतेविषयी कुतूहल निर्माण होत गेले. सागरीविश्वाची विशेष आवड नसली तरी त्यांना संशोधनाच्या कामात मात्र खूप रस होता. पुढे रत्नागिरीच्याच गोगटे महाविद्यालयात त्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतला. अकरावी, बारावी ते ‘फिश प्रोसेसिंग टेक्नोलॉजी’ हा विषय घेऊन शिक्षण घेत होते. याच गोगटे महाविद्यालयात पुढे ‘प्राणीशास्त्र’ हा विषय घेऊन त्यांनी ‘बीएससी’ पूर्ण केले. त्याचबरोबर 2004 मध्ये भाट्ये खाडीवर एक प्रकल्प चालू होता. त्यात त्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या भाट्ये खाडी प्रकल्पावर काम करताना त्यांना संशोधनाच्या कामात अधिक गती प्राप्त झाली. सागरी जैवविविधतेमध्ये आवड कशी निर्माण झाली, असा प्रश्न विचारला असता ते म्हणतात, “मला सुरुवातीपासून आवड होती अशातला भाग नाही. परंतु, इतका समृद्ध सागरी किनारा लाभलेला असतानाही आपल्याला त्याबद्दल काहीच माहीत नसते, ही गोष्ट कुठेतरी पटली नाही. शिवाय, मी जेव्हा काम सुरू केलं, त्यावेळी या क्षेत्रात काम किंवा संशोधन करणारेही फारसे कुणी नव्हते. त्यामुळे या सागरी जैवविविधतेवर अभ्यास करून संशोधन करण्याचे मी ठरवले.” याच भाट्ये खाडीवर काम करताना डॉ. ए. एस. कुलकर्णी आणि डॉ. समीर तेळदारकर या प्राध्यापकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
‘एमएससी’ करण्यासाठी मात्र ते मुंबईतल्या किर्ती महाविद्यालयामध्ये दाखल झाले. किर्ती महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना प्राध्यापिका डॉ. नंदिनी देशमुख यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. या दरम्यान, डॉ. विनय देशमुख म्हणजेच नंदिनी यांचे पती ‘सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई’चे ‘सायंटिस्ट इन्चार्ज’ होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या देशमुख दाम्पत्याच्या घरीच विशाल जवळजवळ दोन वर्षे वास्तव्यास होते. सागरी जैवविविधता आणि त्याबद्दलची माहिती यात खूप अंतर आहे, असे विशाल यांचे ठाम मत आहे. ‘ओशनोग्राफी’ आणि ‘मरीन बायोलॉजी’ हे विषय घेऊन त्यांनी पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण चालू ठेवतच त्यांनी डॉ. ए. एस. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डॉक्टरेट’ पूर्ण केली. ‘पीएच.डी’चा अभ्यास करत असतानाच त्यांनी रत्नागिरीच्या आसपासच्या समुद्रकिनार्यांवरील ‘सी-स्लग्स’चे ‘आयडेंटीफिकेशन’ आणि ‘डॉक्युमेंटेशन’ करण्याचे ही काम केले. ‘सँच्युरी आरबीएस वाईल्डलाईफ अॅवार्ड्स’मार्फत 2009 मध्ये त्यांना ‘यंग नॅचरलिस्ट अवॉर्ड’या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 80 नव्या समुद्री जीवांची नोंद करण्यात आल्यामुळे त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे विशाल आणि त्यांचे काम अनेक लोकांपर्यंत पोहोचले. 2009 मध्येच ‘बीएनएचएस’मध्ये ‘प्रोजेक्ट ऑफिसर’म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत त्यांना ‘बीएनएचएस’चे तत्कालीन संचालक डॉ. दीपक आपटे यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली.
रत्नागिरीत ‘बीएनएचएस’चे ‘रिसर्च स्टेशन’ उभारणे, किनारी भागातील जैवविविधतेची नोंद करणे, अशा कामांचा समावेश त्याच समावेश होता. 2021 पासून ‘सृष्टी कॉन्झरवेशन फाऊंडेशन’ मध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली. महाराष्ट्रीय सागरी किनार्यांबद्दल माहिती देणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र, मराठीत अशी पुस्तके उपलब्ध नाहीत. या विचारातूनच महाराष्ट्राच्या सागरी किनार्यांची ‘फिल्ड गाईड’ म्हणून उपयोगात येईल, असे ‘महाराष्ट्राची सागर संपदा’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. सागरी विश्वात एवढं काम करणार्या विशाल यांच्या नावावर चार प्रजातींची नोंद झालेली आहे. यातील तीन प्रजाती विदेशी असून एक प्रजाती गुजरातमध्ये सापडली आहे. कोकणात थैमान घातलेल्या ‘निसर्ग’ आणि ‘तौक्ते’ या चक्रीवादळांचे महाराष्ट्राच्या किनारी भागातील परिणाम, याविषयी देखील त्यांनी संशोधन केले. महाराष्ट्र कांदळवन कक्ष आणि महाराष्ट्र वन विभागाच्या माध्यमातून हे संशोधन करण्यात आले होते. वादळे किनारपट्टीवर धडकतात तेव्हा कांदळवनांमुळे किनारपट्टीचे संरक्षण होते, असे सांगितले जाते. त्यावर संशोधन आणि अभ्यास विशाल यांनी केला गेला. सध्या लक्षद्वीप बेटांवर त्यांचे काम सुरू आहे. इथे त्यांनी डायव्हिंगचा अनुभवदेखील घेतला. आपल्या किनार्यांनजीक पाणी प्रदूषित असल्यामुळे भारतीय किनार्यांवर डायव्हिंग करणे आणि लक्षद्वीपच्या समुद्रात डायव्हिंग करणे, यात फरक असल्याचेही विशाल बोलताना अधोरेखित करतात. लक्षद्वीपमध्ये सध्या त्यांचे ‘कोरल रिफ कॉन्झरवेशन’चे काम सुरू आहे.
सागरी जैवविविधता टिकवण्यासाठी सामान्य माणसाने काय करावे, असे विचारले असता, याविषयीच्या माहिती आणि जनजागृतीवर ते भर देतात. त्याचबरोबर सागरी जैवविविधतेविषयी आत्मियता निर्माण करण्याची नितांत गरज आहे, असेही विशाल आवर्जून सांगतात. तेव्हा, सागरी विश्वातील त्यांच्याच्या भरीव योगदानासाठी आणि पुढील वाटचालीसाठी विशाल भावे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनस्वी शुभेच्छा!