तुम्ही मोदींच्या तुफानात उडून जाल हे नक्की

25 Apr 2023 11:04:01

Chandrashekhar Bawankule
तुम्ही मोदींच्या तुफानात उडून जाल हे नक्की
चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
मुंबई : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची किती आणि तुमची उंची किती ? याचा विचार करा आणि मग त्यांच्यावर टीका करा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती तुफानाला उद्धव ठाकरे घाबरले असून, मोदीजींचे हे तुफान जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील." असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर केला आहे.
ठाकरेंनी मोदीजींचा वारंवार एकेरी उल्लेख टाळायला हवा होता. ते पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक चुका करत असून हे प्रकार जर थांबले नाहीत तर कधी ना कधी स्फोट होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
काहीही करा पण मशाल विझणारच !
बावनकुळे म्हणाले, 'सार्वजनिक ठिकाणी व्यक्तीगत टीका करुन नेतृत्वाचा अपमान करू नये.ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. दुसऱ्यांना संस्कार शिकवता. पंतप्रधान मोदीजींचे नेतृत्त्व 150 देशांनी मान्य केले आहे. ठाकरे यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. 2014 व 2019 मध्ये ज्यांच्या भरवशावर तुम्ही तुमचे आमदार-खासदार निवडून आणले आणि आज त्यांच्यावर एकेरी टीका करुन बेईमानी करत आहात. कितीही मशाल लावा मोदीजींच्या वादळात त्या विझणारच," असा दावाही त्यांनी केला.

या अवस्थेला उद्धव ठाकरेच जबाबदार
बावनकुळे म्हणाले, देवेंद्रजींनी तुमच्यावर भावासारखे प्रेम केले. एकवेळ भाजपचे काम केले नाही मात्र उद्धवजींचे काम केले. एकवेळ असा होता की मोदीजी देशातले सर्वोत्तम नेते कसे आहेत याबाबत मंचावरून उद्धव ठाकरे सांगत होते. आजच्या तुमच्या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात." असे त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानकडून प्रमाणपत्र हा तर बाळासाहेबांचा अपमान !

"उद्धव ठाकरे यांना शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानी जनतेकडे प्रमाणपत्र मागावे लागत आहे. यापेक्षा अधिक दुर्दैव कोणते? ठाकरेंचा भारतीय लोकांवर त्यांचा विश्वास नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कसं सोडलं? याचं प्रमाणपत्र देश आणि महाराष्ट्राने दिलेय. त्यांना रोज लोकं सोडून जात आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात पाकिस्तानी लोकांना माहीत आहे शिवसेना कुणाची? त्यामुळे पाकिस्तानी जनतेकडून प्रमाणपत्र मागणे हा तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे." अशी टिप्पणी बावनकुळे यांनी केली आहे.

Powered By Sangraha 9.0