मुंबई (प्रतिनिधी): बृहन्मंबई महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या देवनार पशुवधगृहामध्ये ३०० सिसीटिव्ही बसवण्यात येणार आहेत. देवनार आशिया खंडातील सर्वांत मोठे पशुवधगृह आहे. काही दिवसांत येणाऱ्या बकरी ईद या सणासाठी पशुवधगृहात देशाच्या विविध भागातुन विक्रेते येत असतात. दरवर्षी साधारण १० ते १५ लाख बकरे तसेच १२ ते १५ हजार म्हैसवर्गीय जनावरे येत असतात. लाखोंची उलाढाल होणाऱ्या या स्थळावर सुरक्षेची ही तेवढीच गरज असते.
हे लक्षात घेऊन जुन महिन्यात येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभुमीवर देवनार पशुवधगृहात विविध स्तरिय कामे सुरु करण्यात आली आहेत. बृहन्मंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उपायुक्त (अभियांत्रिकी) अशोक मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे. देवनार पशुवधगृह परिसरात साधारणपणे ३०० 'क्लोज सर्किट टेलीव्हिजन कॅमेरे' (सीसीटीव्ही) कॅमेरे लावण्यात येणार असुन त्यात २ व्हिडिओ वॉल, ५ एलईडी स्क्रीन आणि १२ पीटीझेड कॅमेरे ही लावण्यात येणार आहेत. पशुवधगृहात लावण्यात येणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाद्वारे कार्यान्वित केली जाणार आहे. त्याचबरोबर देवनार पशुधगृह परिसरात सीसीटीव्ही कॅमे-यांसह पॅन - टिल्ट - झूम (पीटीझेड) ची सुविधा असणारे १२ टेहाळणी कॅमेरे, २ व्हिडिओ वॉल, ५ एलईडी स्क्रीनही लावण्यात येणार आहेत.
देवनार पशुवधगृहाची सुरक्षा व्यवस्था अधिक चोख ठेवण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे व संबंधित अत्याधुनिक यंत्रणा ही साधारणपणे १५ दिवसांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर बसविण्यात येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर यांनी दिली आहे. तसेच, दरवर्षी इथे येणाऱ्या लाखो लोकांसाठी स्थायी स्वरुपाचे तात्पुरते निवासस्थान उभारण्यात येते. यंदाच्या जुनमध्ये आलेल्या या सणासाठी ७७ हजार चौरस मीटर जागेवर तात्पुरते निवारा केंद्र , मंडप उभारण्यात येणार आहे.