‘राष्ट्रीय अभयारण्य सप्ताह’ म्हणून दि. २२ ते ३० एप्रिल असे नऊ दिवस घोषित केल्यामुळे दि. २२-२३ एप्रिल आणि दि. २९-३० एप्रिल असे दोन ‘वीकएण्ड्स’ लोकांनी कोणाला तरी एका किंवा जमल्यास दोन्ही ‘वीकएण्ड्स’ ना रानावनात जावं, असा अमेरिकेच्या वन खात्याचा उद्देश आहे.
अमेरिकेत दरवर्षी साधारणपणे एप्रिल महिन्याचा तिसरा किंवा चौथा आठवडा हा ‘राष्ट्रीय अभयारण्य सप्ताह’ म्हणून घोषित केला जातो. यंदा दि. २२ एप्रिल ते ३० एप्रिल असे नऊ दिवस हा सप्ताह असेल, असे अमेरिकन वन अधिकार्यांनी घोषित केले आहे. अमेरिकेत एकूण ४२४ अभयारण्यं किंवा राष्ट्रीय उद्यानं आहेत. या नऊ दिवसांच्या कालावधीत या सर्व अभयारण्यांमध्ये विनामूल्य प्रवेश असणार आहे. लोकांनी, पर्यटकांनी या काळात मोठ्या संख्येने इथे यावं, पशू, पक्षी, कीटक, वृक्ष, वेली, वनस्पती, तलाव, झरे, नद्या, डोंगर, पर्वत, टेकड्या, मोकळं आकाश अशी निसर्गाची विविध रूपं डोळे भरून न्याहाळावीत, अभ्यास करावा, नुसतंच निरूद्देश फिरण्याचा आनंद लुटावा आणि पर्यावरणरक्षणाचा वसा घेऊन परत जावे, असे आवाहन संबंधित खात्याने केले आहे.
आता तुम्ही कदाचित सलामीलाच ठेचकाळला असाल. अहो, सप्ताह सात दिवसांचा असतो ना? मग हा नऊ दिवसीय सप्ताह कुठून काढला? की अमेरिकेची प्रत्येक गोष्ट ’लार्जर दॅन अॅव्हरेज’ असते, तसे आठवड्याचे दिवस पण त्यांनी वाढवलेत? खटकणारा दुसरा मुद्दा म्हणजे, ही अमेरिका किंवा एकंदरीतच पाश्चिमात्य जीवनशैली आपल्या दैनंदिन राहणीनेच पर्यावरणाचा भयंकर विनाश करीत आहे, ही गोष्ट खुद्द यांच्याच देशातले वैज्ञानिक ठणकावून सांगत आहेत. मग आठवडाभर निसर्गाच्या सान्निध्यात राहून हे काय कप्पाळ पर्यावरण रक्षण करणार?
तर पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकन लोक फार ’प्रॅक्टिकल’ आहेत. अमेरिकेत पाच दिवसांचा आठवडा असतो. म्हणजे सोमवार ते शुक्रवार सपाटून काम करायचं आणि शनिवार-रविवार हे दोन दिवस ’वीकएण्ड’ म्हणून विश्रांती घ्यायची. वैयक्तिक किंवा सामाजिक कामं करायची, ‘राष्ट्रीय अभयारण्य सप्ताह’ म्हणून दि. २२ ते ३० एप्रिल असे नऊ दिवस घोषित केल्यामुळे दि. २२-२३ एप्रिल आणि दि. २९-३० एप्रिल असे दोन ‘वीकएण्ड्स’ पदरात पडत आहेत. लोकांनी कोणाला तरी एका किंवा जमल्यास दोन्ही ‘वीकएण्ड्स’ ना रानावनात जावं, असा वन खात्याचा उद्देश आहे.
दुसरा मुद्दा मात्र मोठा गुंतागुंतीचा आहे. ख्रिस्तोफर कोलंबस या इटालियन दर्यावर्दीने १४९२ साली अमेरिका खंडाचा शोध लावला. कोलंबसाला स्पेनचा राजा फर्डिनंड आणि राणी इझाबेला यांनी आर्थिक मदत म्हणजे आपल्या भाषेत ’स्पॉन्सर’ केलं होतं. यामुळे कोलंबसानंतर अनेक स्पॅनिश-पोर्तुगीज दर्यावर्दी आणि पाद्री गिधाडांप्रमाणे अमेरिका खंडावर किंवा अधिक नेमकेपणाने सांगायचं, तर आजच्या दक्षिण अमेरिका खंडावर तुटून पडले. तिथल्या इंका, माया, अॅझटेक इत्यादी स्थानिक जमातींची त्यांनी निर्घृण आणि बेछूट कत्तल केली. अक्षरश: पिंपं भरभरून सोनं जहाजांवरून युरोपात नेले. कत्तलींमधून बचावलेल्या स्थानिकांना पाद्य्रांनी अत्यंत तत्पर दयाळूपणे (की दयाळू तत्परतेने?) बाप्तिस्मा दिला.
उत्तर अमेरिका खंडात म्हणजे आजच्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये जरा वेगळं घडलं. इथला भूप्रदेश आणि निसर्ग दक्षिण अमेरिका खंडापेक्षा अधिक संपन्न, विस्तीर्ण आणि रौद्र म्हणता येईल असा होता. आजही आहे. इथले स्थानिक ताम्रवर्णी लोक इंका किंवा माया यांच्या इतके धनवान नव्हते. म्हणजे एखाद्याजवळ भरपूर प्रमाणात सोनं असणं, हा जर श्रीमंत असण्याचा निकष ठरवला, तर दक्षिण अमेरिकेइतकं सोनं या उत्तर अमेरिकन स्थानिक टोळीवाल्यांकडे नव्हतं. पण, उत्तर अमेरिकेवर तुटून पडलेल्या मुख्यतः इंग्लिश, स्कॉटिश आणि मग फ्रेंच आणि जर्मन लोकांच्या गरजा पण वेगळ्या होत्या. स्पॅनिश आणि पोर्तुगीजांना दक्षिण अमेरिकेतली संपत्ती लुटून स्वतःच्या देशात न्यायची होती.
उत्तर अमेरिकेत आलेल्या इंग्लिश आणि स्कॉटिश स्थलांतरितांना शक्यतो परत स्वदेशी जायचंच नव्हतं. ते नशीब काढायलाच इथे आले होते. इथेच स्थायिक व्हायचं, आपण आपली राणी एलिझाबेथ हिचं साम्राज्य इथेही पसरवून द्यायचं, हा यांचा उद्देश होता. त्यामुळे त्यांनी स्थानिकांच्या कत्तली उडवून स्वतःच्या नवनवीन वसाहती वसवल्या. शेती आणि मळे फुलवायला सुरुवात केली. अशा पद्धतीने १७व्या शतकात यांनी संपूर्ण उत्तर अमेरिका व्यापली. मग १८व्या शतकात त्यांना स्वातंत्र्याची स्वप्नं पडू लागली. १८व्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात खुद्द मायभूमी इंग्लंडशीच लढून त्यांनी अमेरिका हा आपला स्वतंत्र आणि सार्वभौम देश निर्माण केला. शेजारचा कॅनडा मात्र आजही ब्रिटनची वसाहत म्हणवून घेण्यात भूषण मानतो.
हे सगळे घडत असतानाच अमेरिकेत अशीही माणसं निर्माण झाली की, त्यांना ही भूमी, इथली माती, इथला निसर्ग, इथला समुद्र, इथल्या नद्या यांच्याबद्दल अतिशय जिव्हाळा वाटू लागला. आपल्या पूर्वजांनी म्हणजे गोर्या वसाहतवाल्यांनी इथली माणसं किड्या-मुंग्यांसारखी मारली. इथल्या पशुपक्ष्यांची शिकारीच्या नावाखाली बेछूट कत्तल केली. इथली घनदाट वनं इमारती लाकडासाठी उद्ध्वस्त केली. जे झालं ते झालं. पण, इथून पुढे तरी आपण हे थांबवलं पाहिजे. निसर्गाने मुक्त हस्ताने दिलेलं हे वैभव जपलं पाहिजे आणि पुढची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सार्याची रीतसर नोंद केली पाहिजे. ’डॉक्युमेंटेशन’ केलं पाहिजे.
या जाणिवेतून सर्वप्रथम जो कायदा पारित करण्यात आला, तो अमेरिकेचा ख्यातकीर्त राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकननेच केलेला आहे. दि. १ जुलै, १८६४ या दिवशी लिंकनच्या सहीने पारित झालेल्या या प्रस्तावाने योसेमाईट नदीचं खोरं आणि मारिपोसा ग्रोव्ह ही निसर्गसमृद्ध ठिकाणं कॅलिफोर्निया प्रांतिक सरकारकडे सोपवण्यात आली. इथल्या चल आणि अचल निसर्ग संपत्तीची मालकी यापुढे प्रांताची असून, प्रांतिक सरकारने तिची जपणूक आणि संवर्धन करायचं होतं. म्हणजे हे अभयारण्य अजून प्रांतिक उद्यानच होतं. असून ते राष्ट्रीय उद्यान नव्हतं.
या कालखंडात अमेरिकेत गुलामगिरीच्या प्रश्नावरून यादवीयुद्ध पेटलं होतं. अब्राहम लिंकनने गुलामगिरीची प्रथा कायद्याने रद्द केल्यामुळे संतापलेल्या काही प्रांतांनी, आम्ही अमेरिकन संघराज्यातून फुटून बाहेर पडत आहोत, अशी घोषणा केली होती. अमेरिकेची ही फाळणी टाळण्यासाठी लिंकन ठामपणे उभा राहिला होता. म्हणजेच, त्याच्यावर प्रचंड राजकीय दबाव होता. तरीही त्याच वेळी पर्यावरणरक्षणाचा प्रस्तावही त्याने पारित केला. ही एखादा परिसर अभयारण्य म्हणून घोषित केला जाण्याची आधुनिक मानवी इतिहासातली पहिली वेळ!
पुढे १८७२ साली अमेरिकन संसदेने कायदा पारित करून ‘यलोस्टोन नॅशनल पार्क’ हे जगातलं पहिलं राष्ट्रीय अभयारण्य अस्तित्वात आणलं. तब्बल ८९०३. ०८ चौ.किमी विस्ताराचं हे उद्यान अमेरिकेच्या तीन प्रांतांमध्ये पसरलेलं आहे. त्यानंतर १८९० साली योसेमाईट हे पहिलं अभयारण्य कॅलिफोर्निया प्रांताकडून काढून घेऊन त्यालाही ‘राष्ट्रीय उद्यान’ बनवण्यात आलं. ते सुमारे तीन हजार चौ.किमींवर पसरलेलं आहे. यानंतर क्रमाक्रमाने अनेक भूखंडांना ‘राष्ट्रीय अभयारण्य’ घोषित करण्यात आलं. आज त्यांची संख्या ४२४ आहे. येडेच दिसतात हे अमेरिकन लोक! भूखंडांचं श्रीखंड करायचं सोडून अभयारण्य कसले करत बसतात! अजून तिथे कुणी काका अवतरलेले नसावेत. असो. एकीकडे अमेरिकन जीवनशैलीमुळे पर्यावरणाच्या र्हासाचे नवनवीन प्रश्न उभे राहतायत आणि दुसरीकडे तेच अमेरिकन्स आपली राष्ट्रीय उद्यानं आणि जैविक विविधता प्राणपणाने जपतायत, हा विरोधाभास मोठा गमतीचा आहे.
ज्या मूठभर लोकांच्या संशोधनामुळे अमेरिकेत ही जाणीव निर्माण झाली, त्यातलं एक अग्रगण्य नाव म्हणजे जॉन म्युईर. इतिहासात प्रसिद्घ असणारे दोन जॉन म्युईर होऊन गेले. दोघेही मूळचे स्कॉटिश होते. पहिला जॉन म्युईर हा ‘ईस्ट इंडिया’ कंपनीचा अधिकारी म्हणून १८१९ ते १८४४ या काळात भारतात येउन गेला. मुंबईचा गव्हर्नर जोनाथन डंकन याने बनारसला ’व्हिक्टोरिया संस्कृत कॉलेज’ काढलं. तिथे तो काही काळ संस्कृत शिकवत असे. दुसरा जॉन म्युईर हा वयाच्या ११व्या वर्षी म्हणजे १८४९ साली स्कॉटलंडमधून अमेरिकेत स्थलांतरित झाला. याचा बाप अतिशय धार्मिक वृत्तीचा होता. यामुळे जॉनला अख्ख बायबल तोंडपाठ होतं. पण, अमेरिकेत आल्यावर लाख निसर्ग निरीक्षणाची गोडी लागली. तो कधीच पदवी परीक्षेला बसला नाही, पण रसायनशास्त्रासह कित्येक शास्त्रीय विषयांचा त्याचा अभ्यास अफाट होता.
अमेरिकेतल्या विविध प्रांतांमधली नद्यांची खोरी आणि पर्वतरांगा पायी भटकून न्याहाळणे आणि तिथली माती, दगड, शंख, कीटक, वनस्पती, झाडं, वारे, हवा, पाऊस, हिमवर्षाव, गुरंढोरं, शेती अशा प्रत्येक नैसर्गिक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करून यांची काटेकोर नोंद करणं, हे अतिमहत्त्वाचं काम त्याने केले. ‘सिएरा’ म्हणजे पर्वतरांग. ‘सिएरा निवाडा’ ही अमेरिकेच्या पश्चिमेकडच्या कॅलिफोर्निया राज्यातली एक महत्त्वाची पर्वतरांग आहे. या पर्वतरांगांमध्ये अनिर्बंध भटकंती करून जॉन म्युईरने जे लेख, पत्रं, शोधनिबंध आणि पुस्तकं लिहिली ती निसर्गरम्य वर्णनांनी आणि निसर्गप्रेमाने इतकी ओथंबलेली आहेत की, असंही लक्षावधी वाचक ती पुन्हा पुन्हा वाचत असतात. १८६७ साली तो केंटुकी राज्य ते फ्लोरिडा राज्य असे एक हजार मैल म्हणजे सुमारे १६०० किमी अंतर पायी चालत गेला. म्हणजे सरळ मळलेल्या वाटेने नव्हे, तर जास्तीत जास्त अवघड अशा वाटा शोधून काढत, तिथला निसर्ग पाहत तो पुढे गेला. १८९२ साली त्याने ’सिएरा क्लब’ हा पदभ्रमण समूह स्थापन केला.
आज १३० वर्षांनंतर अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात त्याच्या शाखा आहेत आणि किमान साडेसात लाख सभासद आहेत. शिवाय तो आता नुसताच पदभ्रमण करणार्यांचा क्लब राहिलेला नसून, अमेरिकेच्या निसर्ग संशोधन, संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रातली ती एक अग्रगण्य संस्था आहे. त्याची एकंदर १६ पुस्तकं आणि शेकडो लेख आहेत. अखंड निसर्गात रमलेल्या या इसमाने वयाच्या ४०व्या वर्षी चक्क लग्न केलं. त्याला दोन मुली झाल्या. त्यांच्या सासर्याचा भला प्रचंड मळा होता. जॉन सासर्याचा मळा शिंपायला लागला. पण, मध्येेच त्याला मुक्त निसर्गाची ओढ लागायची. मग याची समजूतदार बायको लाला घरातून चक्क डोंगर आणि नद्या ओढ्यांकडे हाकलून द्यायची. फारच, नशीबवान बुवा! तर असा हा ’जॉन ऑफ द माऊंटन्स्’ किंवा ’फादर ऑफ नॅशनल पार्कस्’ दि. २१ एप्रिल, १८३८ साली जन्मला होता. म्हणून एप्रिलचा तिसरा आठवडा ’नॅशनल पार्क वीक.’