‘एनआयए’ करणार पूंछ दहशतवादी हल्ल्याची चौकशी

21 Apr 2023 22:08:21
NIA takes over Poonch terror attack investigation

नवी दिल्ली
: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये लष्कराच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षादलांनी बाटा-डोरिया परिसरातील घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.

या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे पाच जवान हुतात्मा झाले असून एक जखमी झाला आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ‘ड्रोन’ आणि ‘स्निफर डॉग’चा वापर केला जात आहे. या घटनेच्या तपासासाठी ‘एनआयए’चे पथकही शुक्रवारी घटनास्थळी पोहोचले आहे. भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांना राजौरी-पूंछ सेक्टरमध्ये एकाच क्षेत्राजवळ दोन गटांतील सहा ते सात सक्रिय दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे.

‘पीपल्स अ‍ॅण्टी फॅसिस्ट फ्रंट’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा पाठिंबा असलेला एक गट आहे. जम्मू-काश्मीरमधून ‘कलम 370’ हटवल्यानंतरच ‘पीएएफएफ’चे नाव समोर आले आहे. दहशतवादी संघटना ‘अल कायदा’चा निष्ठावंत मानला जाणारा अन्सार ‘गजवत-उल-हिंद’चा मारला गेलेला कमांडर झाकीर मुसा याच्याकडून ही संघटना प्रेरित आहे.
 
 
या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या हल्ल्यात हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्याचवेळी जम्मू-काश्मीरच्या राजौरीतील जवाहर नगरमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. भाजप कार्यकर्त्यांनी ‘भारतीय सेना झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, तसेच ‘शहीद जवान अमर रहे’च्या घोषणाही दिल्या. त्याचवेळी दहशतवाद्यांचे पुतळे बनवून त्यांचे दहन केले.




Powered By Sangraha 9.0