कुस्तीतील संघर्षकन्या वैष्णवी

02 Apr 2023 21:43:31
Vaishnavi Patil


सांगली येथे झालेल्या पहिल्या महिला ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’त कल्याणच्या वैष्णवी पाटील यांनी उपविजेता होण्याचा मान मिळविला आहे. वैष्णवीच्या या यशाने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. वैष्णवी हरली असली, तरी ती लढली, अशीच भावना आहे. जाणून घेऊया, वैष्णवीची वाटचाल...

वैष्णवी ही कल्याण पूर्वेतील मलंगगडपट्ट्यातील मांगरूळ या गावची. वैष्णवी सध्या कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात एफवाय-बीएच्या वर्गात शिकत आहे. वैष्णवीच्या आजी-आजोबांच्या स्मरणार्थ तिच्या काकांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केलेले. त्यानंतर वैष्णवीलासुद्धा कुस्तीविषयी आकर्षण निर्माण झाले. वैष्णवीचे पायलट होऊन आकाशाला गवासणी घालण्याचे स्वप्न होते. परंतु, तिला चष्मा लागला असल्याने ती मेडिकलमध्ये ‘अनफिट’ ठरली. अपयश आले असले, तरी वैष्णवी ही शांत बसणारी नव्हती. काहीतरी वेगळे करावे, हे ध्येय तिने बाळगले होते. मलंगगड ग्रामीण भागात गावागावात कुस्तीचे आखाडे असून अनेक कुस्तिगीर आहेत. मांगरूळ गावातील १९६०-६५ च्या काळात लहू पहिलवान म्हणजेच लहू गोपाल जाधव हा मुंबई कुलाबा मधून विजेता पहिलवान ठरला होता. कुंडलिक शंकर पाटील, बाळाराम पाटील, केशव पांडू भाईर यांनी गावातील कुस्तीचा वारसा जपला. तसेच वैष्णवीचे आजोबा हेंद्रया रामा पाटील आणि गोपाळ रामा पाटील तिचे काका सदाशिव हेंद्रया पाटील आणि सुरेश पाटील हेदेखील मांगरूळचे नावाजलेले पहिलवान होते.

कुस्तीसारख्या खेळात महिलांना स्थान नाही, अशा परिस्थितीत कुस्तीत महिलांना संधी मिळाली, तर ते संधीचे सोने करतील, अशा दृढ ध्येयाने वैष्णवीला घेरले आणि घरचा कुस्तीगीर वारसा पुढे आपण स्वत: चालवण्याचा तिने मनोमनी निश्चय केला. वैष्णवीला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले आहे. हा वारसा वैष्णवीदेखील जपत आहे. शांत, जिद्दी, संयमी आणि आत्मविश्वास असलेल्या वैष्णवीने आपले लक्ष कुस्ती क्षेत्रात केंद्रित करून भरारी घेण्याचा निर्धार केला. वैष्णवीने कल्याण पूर्वेतील नांदिवली गावातील ‘जय बजरंग’ तालीम संघात प्रवेश घेतला. वैष्णवीची आई पुष्पा आणि वडील दिलीप हे दोघे ही खानावळ चालवितात. घरची परिस्थिती अत्यंत साधारण असली, तरी ते वैष्णवीला कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. या पुढे ही कुस्तीमध्ये वैष्णवीने आपला ठसा उमटवावा, यासाठी तिला सहकार्य करीत राहणार असल्याचे वैष्णवीची आई पुष्पा यांनी सांगितले.वैष्णवीने तालिमीत प्रवेश घेतल्यानंतर दररोज पाच किमी धावणे, एका वेळेस दीड हजार सूर्यनमस्कार घालणे, बैठका मारणे, ५९ बूट उंच दोर चढणे-उतरणे आणि आखाड्यात सराव करणे, असा तिचा दैनंदिन दिनक्रम सुरू झाला. सातत्य, नियमितता, मेहनत आणि दृढ विश्वास या जोरावर वस्ताद पंढरीनाथ पाटील, वसंत साळुंके, प्रज्वल ढोणो, मदन साळुंके, शशिकांत म्हात्रे या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने अनेक महिला कुस्त्या गाजविल्या आहेत.

‘आशिया चॅम्पियन ट्रायलशिप’मध्ये तृतीय तर विशाखापट्टणम् आणि हरियाणा येथील ‘सिनिअर नॅशनल कुस्ती’ स्पर्धेत कांस्यपदक, ’खेलो इंडिया’ स्पर्धेत तीन वेळा सहभाग, ठाणे महापौर आणि कल्याण-डोंबिवली महापौर कुस्ती स्पर्धेत सतत दोन वेळा सुवर्णपदक, तर महाविद्यालयीन स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रजतपदक, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चार सुवर्णपदक तिने मिळविले आहेत. वैष्णवी अत्यंत चिवट, चपळ आणि समयसूचकता या बळावर ती मातीत आणि मॅटवर अशा दोन्ही ठिकाणी कुस्ती खेळत आहे.पहिल्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत कल्याणच्या मातीतील वैष्णवी पाटील आणि सांगलीतील प्रतीक्षा बागडी यांच्यात अंतिम सामना रंगला होता. आपल्या तालुक्यातील पहिलवान केसरीच्या अंतिम फेरीत आहे, हे समजताच कल्याण नांदिवली ‘जय बजरंग’ तालमीतील तिचे सहकारी तिच्या प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. तिच्या लढतीकडे सगळ्याचे लक्ष लागून होते. दोघींना चार-चार पॉईंट मिळाले होते. मात्र, प्रतीक्षाने डाव खेळला आणि वैष्णवीचा पराभव झाला. या सामन्यात वैष्णवी पराभूत झाली असली, तरी पूर्ण क्षमतेने खेळली. वैष्णवी हरली असली, तरी तिने चांगली लढत दिली, अशी प्रतिक्रिया वैष्णवीचे प्रशिक्षक सुभाष ढोणो यांनी दिली.

वैष्णवीने ‘महाराष्ट्र केसरी’ महिला उपविजेतेपद जिंकून कल्याणच्या ऐतिहासिक आणि क्रिडा क्षेत्रत मानाचा तुरा खोवला आहे. अनेक राजकीय पक्ष, संघटना,सामाजिक, शैक्षणिक संस्था, मनसे आमदार राजू पाटील, ‘आगरी युथ फोरम’चे अध्यक्ष गुलाब वङो यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. वैष्णवी राष्ट्रीय पातळीवरील भारतीय कुस्तीगीर परिषदेतून खेळणार आहे. त्यासाठी हरियाणा येथे तिचे प्रशिक्षण सुरू आहे. वैष्णवीची महिला ‘हिंद केसरी’ आणि जगज्जेती महिला कुस्तीगार होण्याचा मानस आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.




Powered By Sangraha 9.0