मुंबई (प्रतिनिधी): कोट्टीगेहर हा बेडकांच्या प्रजातींमधील नाचणारा बेडुक म्हणुन ओळखला जाणारा बेडुक आहे. या नृत्य करणाऱ्या बेडकाच्या प्रजातीमध्ये अलिकडेच एक डोळा हरवलेला किंवा विकलांग शरीर या विकृती आढळुन आल्या आहेत. या विकृती मानववंशजन्य कारणांमुळे असल्याचे सांगितले जात आहे. कोट्टीगेहर हा Micrixalidae या कुळातील बेडुक असुन त्याला नाचणारा बेडुक म्हणुन ओळखले जाते.
हे बेडुक पश्चिम घाटात अधिवासास असलेल्या बेडकांपैकी एक जुनी प्रजात असुन ती जागतिक स्तरावर धोक्यात आलेल्या गटात आहे. बारमाही, प्रामुख्याने प्रवाही खडकांमध्ये आढळणारी ही बेडकाची प्रजात त्याच्या एका पायाने ठेका धरते तर दुसरा पाय हवेत लाथ मारताना दिसते. प्रजननाच्या काळात हा बेडुक मादी बेडकाला आकर्षित करण्यासाठी ही क्रिया करत असतो. Micrixalidae हे पश्चिम घाटातील सर्वात जुने कुटुंब म्हणुन प्रचलित असलेले आणि ६० दशलक्ष वर्षांपुर्वी विकसीत झालेले आहे. ते सध्या दुर्मीळ व जागतिक स्तरावर धोक्यात आलेल्या प्रजातीच्या गटात मोडतात.
अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्हायर्नमेंट (ATREE) या बंगळुरुतील संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या कोट्टीगेहर या बेडकांच्या प्रजातीवर अभ्यास करणाऱ्या संशोधक मधुश्री मुडके यांनी कोट्टीगेहर बेडकांच्या नामशेष होण्यावर चिंता व्यक्त करताना या प्रजातीच्या जवळपास जाणारी एक ही प्रजात आपल्याकडे नाही. म्हणुन आपल्यासोबत ते लाखो वर्षांचा उत्क्रांतीवाद घेऊन जातील, असे विधान केले आहे.