गुजरात : तुम्ही आजपर्यत असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात भजन गाणाऱ्या गायकासमोर पैशांचा ढीग असतो. पण असा व्हिडिओ क्वचितच पाहिला असेल ज्यात भजन गाणाऱ्या गायकाभोवती पोळ्यांचा ढीग आहे. असाच एक व्हिडिओ गुजरातमधून समोर आला आहे. पाटण येथील रोतालिया हनुमान मंदिरात प्रसिद्ध लोकगायक कीर्तिदान गढवी यांचा भजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात येण्यासाठी जो पोळी आणेल त्यालाच प्रवेश दिला जाणार होता. त्यामुळे भजनाचा आंनद लुटण्यासाठी आलेल्या भक्तांनी मनाप्रमाणे पोळ्या घेऊन कार्यक्रमात दाखल झाले. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या भजन कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये गायकाच्या भोवती पोळ्यांचा ढीग दिसतो.
रोटालिया येथे हनुमान मंदिराच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोक दायरो (भजन आणि कथा) आयोजित करण्यात आला होता. १६ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमापूर्वी गायक कीर्तिदान गढवी यांनी लोकांना पोळ्या आणण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनावरून लोक पोळ्या घेऊन आले होते. या पोळ्यांचा उपयोग गाय , कुत्रे आणि इतर मुक्या प्राण्यांची भूक भागवण्यासाठी केला जाणार आहे.
कीर्तिदान गढवी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या कार्यक्रमाचा व्हिडिओही शेअर केला आहे. कार्यक्रमादरम्यान ५० हजारांहून अधिक पोळ्या जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. रोतालिया हनुमान मंदिर हे जगातील पहिले असे मंदिर आहे, जेथे प्रसाद म्हणून फक्त रोटले ( जाड पोळ्या )प्रसाद म्हणून दिले जातात. तसेच मंदिरातील बजरंगबलीला फक्त रोटला म्हणजेच जाड पोळ्या अर्पण केल्या जातात.
भाविकांनी आणलेल्या पोळ्यांचा नैवेद्य देवाला दाखवल्यानंतर सर्व प्राणिमात्रांना प्रसाद म्हणून या पोळ्यांचा प्रसाद वाटण्यात येतो. तसेच मंदिरात मनोकामना पूर्ण झाल्यानंतरही भाविक स्वेच्छेने ५ ते १०१ पोळ्या अर्पण करतात. त्यामुळे इतर कोणत्याही प्रकारचा प्रसाद येथे स्वीकारला जात नाही.