अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेच्या अत्यंत खालच्या थरावर काम करणार्या एका २१ वर्षीय तरुणाच्या हातात एवढी संवेदनशील माहिती कशी काय लागली? त्याने ही माहिती एका गेमिंग सर्व्हरवरील चॅट रुममधील आपल्या मित्रांना पाठवली. यात अमेरिकेबाहेरच्या सदस्यांचाही समावेश होता. जॅक डग्लस टक्सिराने ही माहिती पैशासाठी विकली नाही किंवा अमेरिकेच्या शत्रूंना पुरवली नाही, असा त्याचा बचाव केला जात असला तरी फुटलेल्या माहितीमुळे अनेक देशांमध्ये धक्के बसले आहेत.
'विकिलिक्स’ किंवा ‘एडवर्ड स्नोडन’ प्रकरणाची आठवण व्हावी, असे प्रकरण नुकतेच अमेरिकेत घडले. २१ वर्षांच्या जॅक डग्लस टक्सिरा या तरुण सैनिकाला अमेरिकेच्या ‘एफबीआय’ने युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेच्या गुप्तहेर खात्यांनी एकत्रित केलेले अत्यंत संवेदनशील दस्तावेज समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याबद्दल ताब्यात घेतले आहे. एवढी संवेदनशील माहिती एका तरुण हॅकरच्या हाती लागू कशी शकते आणि ती समोर आल्यामुळे रशियात तैनात अमेरिकेचे हेर आणि खबरींचा जीव धोक्यात आला आहे का, या विषयांवर संपूर्ण जगभर चर्चा सुरू आहे. या भांडेफोडीमुळे युक्रेन युद्धाचे उभे राहणारे चित्र आणि अमेरिकेच्या राजकीय नेत्यांकडून तसेच माध्यमांकडून त्याची उभी करण्यात आलेली प्रतिमा, यातील विसंगती समोर आली आहे.
युरोपमध्ये वसंत ऋतुची चाहूल लागत असताना पाश्चिमात्त्य देशांकडून घातक शस्त्रास्त्रं मिळाल्याने युक्रेन आता रशियावर प्रतिहल्ला करणार असून, लवकरच तो आपला भूभाग परत मिळवेल, असे पाश्चिमात्त्य माध्यमांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, अमेरिकेच्याच गुप्तहेरखात्याला यावर विश्वास नाही. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना असे वाटत आहे की, हे युद्ध आता अनिर्णितावस्थेकडे झुकले आहे. दररोज युक्रेनच्या तोफखान्यांचा दारुगोळा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून तो परत कसा मिळवायचा, याची त्यांना चिंता आहे. या युद्धामध्ये रशियाकडून मोठ्या प्रमाणावर ड्रोन्सचा वापर करण्यात येत आहे. इराणकडून रशियाला ड्रोन्सचा पुरवठा केला जात आहे. युक्रेनकडून यातील अनेक ड्रोन्स हवेतल्या हवेत नष्ट करण्यात येत असले तरी एक ड्रोन बनवण्याचा खर्च सुमारे दोन लाख डॉलर इतका आहे. याउलट हे ड्रोन्स नष्ट करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा अत्यंत खर्चिक आहे.
ती रशियाच्या ड्रोनविरोधात न वापरता केवळ हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांविरोधात वापरण्याबद्दल युक्रेनवर दबाव आहे. या दस्तावेजांमधील सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिकेच्या सर्वात जवळच्या देशांपैकी एक असलेला इजिप्त गुप्तपणे रशियाला ४० हजार १२२ मिमी साक्र ४५ रॉकेट्स पुरवण्याच्या तयारीत होता. १९७०च्या दशकापर्यंत इजिप्त सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होता. १९७० साली अध्यक्ष झालेल्या अन्वर सदात यांनी इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबदल्यात अमेरिकेकडून इजिप्तला वार्षिक एक अब्ज डॉलरची लष्करी मदत करण्यात येते. २०१० साली अरब राज्यक्रांतीपर्यंत अमेरिकेने इजिप्तमधील लष्करशाहीला पाठिंबा दिला होता. इजिप्तमध्ये निवडणुकांमध्ये इस्लामिक मूलतत्त्ववादी ‘मुस्लीम ब्रदरहूड’चा विजय झाला. ही संधी साधून तेथे लष्कराने पुन्हा सत्ता ताब्यात घेतली. २०१४ सालापासून फील्ड मार्शल अब्देल फताह सिसी इजिप्तचे अध्यक्ष असून त्यांना अमेरिकेचा भक्कम पाठिंबा आहे. असे असूनही इजिप्त गुप्तपणे रशियाला रॉकेट पुरवण्याच्या होता.
अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याला ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी दबाव टाकून इजिप्तला १५२ मिमी आणि १५५ मिमी तोफगोळ्यांच्या फैरी अमेरिकेला विकायला भाग पाडले. अशाच प्रकारची शस्त्रास्त्रं अमेरिका युक्रेनला पुरवणार असून त्याची भरपाई इजिप्तकडून केली जाणार आहे. पश्चिम आशियात अमेरिकेच्या अत्यंत जवळचा समजला जाणारा इजिप्त जर रशियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याचा विचार करत असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की, अमेरिकेचे अनेक मित्रदेशही युक्रेन युद्धाकडे अमेरिकेच्या दृष्टिकोनातून बघत नाहीत. नाईल नदीच्या तीरावर वसलेल्या इजिप्तची लोकसंख्या मोठी असून अन्नसुरक्षेसाठी इजिप्त, रशिया आणि युक्रेनहून आयात करण्यात येणार्या गव्हावर अवलंबून आहे. युक्रेनमध्ये लोकशाही नांदण्यासाठी इजिप्त स्वतःच्या घरात अराजकता पसरवू देणार नाही. अमेरिकेचे अनेक मित्रदेश भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व देतात, हे यातून स्पष्ट होते.
या दस्तावेजांतून स्पष्ट होते की, अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणांनी रशियाचे गुप्तहेर खाते, लष्कर आणि या युद्धात भाडोत्री सैनिक उतरवणारा आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संबंधित असलेल्या वॅगनर ग्रुपमध्ये खोलवर शिरकाव केला होता. रशियाच्या गोटातील बातम्या अमेरिका वेळोवेळी युक्रेनला पुरवत होता. हे दस्तावेज उघड झाल्यानंतर रशिया अमेरिकेला माहिती पुरवणार्या आपल्या अधिकार्यांना तसेच अमेरिकेच्या हेरांना पकडून संपवण्याची किंवा तुरुंगात टाकण्याची भीती आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर झालेल्या चार युद्धांमध्ये जेवढे सैनिक गमावले नाहीत, त्याहून जास्त सैनिक रशिया आणि युक्रेन यांनी गेल्या वर्षभरामध्ये या युद्धात गमावले आहेत.
युक्रेनच्या सैन्याने वेळोवेळी धाडस आणि कल्पकतेच्या जोरावर आश्चर्याचा धक्का दिला असला तरी यावर्षी युक्रेनला निर्णायक विजय मिळवता येईल, याची शक्यता अत्यंत कमी आहे. या दस्तावेजांमध्ये असे स्पष्ट होते की, अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांच्या अंदाजानुसार, या युद्धामध्ये रशियाचे दोन लाखांहून अधिक सैनिक मृत किंवा घायाळ झाले असून मृतांची संख्या सुमारे ४३ हजार आहे. युक्रेनच्या मृत किंवा जखमी झालेल्या सैनिकांची संख्या सुमारे सव्वा लाख असून मृत सैनिकांची संख्या सुमारे १७ हजार ५०० आहे. रशियाच्या बाबतीत हा आकडा अफगाणिस्तानमध्ये १९७०च्या दशकात चाललेल्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या तिप्पट आहे. या दस्तावेजांमध्ये असे दिसून येते की, युक्रेन युद्धात तटस्थ भूमिका बजावणार्या चीनची रशियाला संहारक शस्त्रं पुरवण्याची तयारी आहे. चीनने नेमकी कोणती शस्त्रास्त्रं पुरवली आहेत, याचे तपशील उपलब्ध नसले तरी चीनच्या मदतीने रशिया दीर्घकाळ हे युद्ध लढू शकतो.
या दस्तावेजांमध्ये समोर येते की, चीनला खात्री आहे की, युक्रेनकडून पाश्चिमात्त्य देशांकडून मिळालेल्या शस्त्रांद्वारे रशियाच्या सीमेच्या आत खोलवर हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धाचे तिसर्या महायुद्धात रुपांतर होऊ नये, अशी अमेरिकेची इच्छा आहे. त्यासाठी अमेरिका आणि पाश्चिमात्त्य देशांनी युक्रेनला पुरवलेल्या शस्त्रांचा वापर केवळ बचावात्मक कार्यांसाठी केला जावा, अशी अमेरिकेची इच्छा असली तरी युक्रेनकडून त्याचे उल्लंघन करण्यात येत आहे. या दस्तावेजांमधून असेही स्पष्ट होते की, पाश्चिमात्त्टय देशांच्या सुमारे ९० सैनिकांची एक तुकडी युक्रेनमध्ये कार्यरत आहे.
त्यात सर्वात जास्त म्हणजे ५० सैनिक ब्रिटनचे असून त्याच्या खालोखाल १५ सैनिक फ्रान्सचे आहेत. यात अमेरिकेचे १४ सैनिक आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या युद्धात युरोपने अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर होता कामा नये, अशी भूमिका घेतली आहे. फ्रान्सचे बोलणे आणि वागणे यातील अंतर या दस्तावेजांतून दिसून येते. अशीच गोष्ट सर्बियाच्या बाबतीतही दिसून येते. दक्षिण कोरियाने या युद्धात युक्रेनला शस्त्रास्त्रं पुरवायला नकार दिला आहे, असे असले तरी त्यांनी अमेरिकेला शस्त्रास्त्रं पुरवली आहेत. कोरियाच्या नेत्यांनी भीती वाटते की, हीच शस्त्रास्त्रं अमेरिकेकडून युक्रेनला दिली जाऊ शकतात. यातून अमेरिकेकडून आपल्या मित्रराष्ट्रांवर पाळत ठेवली जात असल्याचेही उघड होते.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेच्या अत्यंत खालच्या थरावर काम करणार्या एका २१ वर्षीय तरुणाच्या हातात एवढी संवेदनशील माहिती कशी काय लागली? त्याने ही माहिती एका गेमिंग सर्व्हरवरील चॅट रुममधील आपल्या मित्रांना पाठवली. यात अमेरिकेबाहेरच्या सदस्यांचाही समावेश होता. जॅक डग्लस टक्सिराने ही माहिती पैशासाठी विकली नाही किंवा अमेरिकेच्या शत्रूंना पुरवली नाही, असा त्याचा बचाव केला जात असला तरी फुटलेल्या माहितीमुळे अनेक देशांमध्ये धक्के बसले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात मैत्रीपेक्षा व्यवहारवादाला महत्त्व असल्याचे या दस्तावेजांमधून स्पष्ट होते.