‘ट्रुथ सोशल’चे फेल्युअर!

18 Apr 2023 21:37:21
Failure of Truth Social

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली वैयक्तिक मालमत्ता आणि उत्पन्नाची माहिती तेथील फेडरल इलेक्शन कमिशनला दिल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या याची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसते. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले ’ट्रुथ सोशल’ हे इंटरनेट अ‍ॅप या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे. कारण, यावर्षी चक्क २०१ डॉलर्सपेक्षाही नाममात्र कमाई या माध्यमातून झाल्याचे ट्रम्प यांनी अहवाल सादर करताना सांगितले. इतर अ‍ॅॅप्सच्या तुलनेत प्रतिवर्षी साधारण ७.५ लाख डॉलर्स उत्पन्न असलेल्या या अ‍ॅॅपवर ही वेळ आल्याने ट्रम्पना चांगलाच आर्थिक फटका बसला असून हे या अ‍ॅपचे ‘फेल्युअर’ असल्याचे म्हटले जाते.

‘ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुप’द्वारे आणि डेव्हिन नुनेस यांच्या नेतृत्वाखाली चालवला जाणारा ’ट्रुथ सोशल’ हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू केल्यानंतर तो फेब्रुवारी २०२२ पासून पुढे लोकांच्या सेवेत आला. सध्या या कंपनीचे मूल्य पाच दशलक्ष ते २५ दशलक्ष डॉलर्सपर्यंत असल्याचा अंदाज ट्रम्प यांनी आपले वैयक्तिक उत्पन्न मांडताना व्यक्त केला.

साधारण २०२२च्या मध्यापासूनच ’ट्रुथ सोशल’ या माध्यमास आर्थिक आणि नियामक समस्यांचा सामना करावा लागला. मध्ये काही काळ धमक्या आणि हिंसेला चिथावणी देणार्‍या गोष्टींना प्रतिबंधित करणार्‍या गुगलच्या धोरणांचे उल्लंघन केल्यामुळेही ‘ट्रुथ सोशल’ हे अ‍ॅॅप ’गुगल-प्ले’वर उपलब्ध नव्हते. परंतु,पुढे गुगलने आपल्या काही धोरणांमध्ये बदल केल्याने हे अ‍ॅप पुन्हा एकदा गुगल-प्लेसाठी मंजूर करण्यात आले. तेव्हा ‘अ‍ॅपल’च्या ’अ‍ॅप स्टोअर’च्या क्रमवारीत ते १०१व्या क्रमांकावर होते. अमेरिकेत जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या निषेधानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे मीडिया अकाऊंट ट्विटर, फेसबुक आणि युट्यूबने निलंबित केले.

त्यानंतर त्यांनी पुढे ’ट्रुथ सोशल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे अ‍ॅप सुरुवातीला फक्त अमेरिकेमध्ये उपलब्ध होते. नंतर ते गुगल प्ले-स्टोअरवरही लाँच करण्यात आले. पण, गुगलने गोपनीयता धोरणाचा हवाला देत ते अ‍ॅप ‘ब्लॉक’ केले. ‘ट्रुथ सोशल’ अ‍ॅपची एपीके फाईल उपलब्ध असली तरी सुरक्षेमुळे बहुतांश लोक फोनमध्ये एपीके फाईल इन्स्टॉल करत नाहीत. ‘ट्रुथ सोशल’ अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर सर्वाधिक डाऊनलोड केलेले अ‍ॅप बनलेे. अ‍ॅप स्टोअरवरील सोशल मीडिया श्रेणीतील शीर्ष विनामूल्य अ‍ॅप्सच्या यादीत सत्य तिसर्‍या क्रमांकावर होते. मात्र, इतकी उंची गाठलेल्या या अ‍ॅपमध्ये वापरकर्त्यांना बरेच ‘बग्ज’ आढळून आले.

‘ट्रुथ सोशल’ अ‍ॅॅप हे ट्विटरसारखे एक सोशल मीडिया अ‍ॅप असून ते हे ट्विटरचे क्लोन अ‍ॅॅप असल्यासारखेच दिसते, हे विशेष!
ट्रम्प यांनी सादर केलेल्या एका मर्यादित १०१ पानांच्या दस्तऐवजातून असे दिसून आले आहे की, ’ट्रुथ सोशल’ ज्याचे कथित मूल्य पाच दशलक्ष डॉलर्स आणि २५ दशलक्ष डॉलर्स दरम्यान आहे, यंदा मात्र ते २०१ डॉलर्सपेक्षा कमी झाले. एका बाजूला ’ट्रुथ सोशल’मुळे ‘फेल्युअर’ आले असले तरी ’द न्यूयॉर्क टाईम्स’च्या एका अहवालात असे आढळून आले की, ट्रम्प यांच्या संस्थेने चार अब्ज डॉलरच्या प्रकल्पाचा भाग म्हणून ओमानमध्ये हॉटेल, व्हिला आणि गोल्फ कोर्स बांधण्यासाठी सौदी ‘रिअल इस्टेट’ कंपनीशी करार केला आहे.

‘असोसिएटेड प्रेस’ आणि ‘पॉलिटिको’च्या म्हणण्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोहिमेने या वर्षी आतापर्यंत ३४ दशलक्ष डॉलर्स जमा केले आहेत. त्याचबरोबर ‘फेडरल इलेक्शन कमिशन’च्या अहवालात असेही दिसून येते की, ट्रम्प यांच्या संलग्न निधी उभारणीच्या माध्यमांनी वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत साधारण १८.८ दशलक्ष डॉलर्स जमा केले. २०२० च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आणि ‘मार-ए-लागो’येथे ‘एफबीआय’ने त्याच्या मालमत्तेचा शोध घेतल्यानंतर त्याच्या समर्थकांकडून पैसे गोळा करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर ’राजकीय छळ’ झाल्याचा आरोप करणार्‍या तत्सम डावपेचांवर त्यांची मोहीम अवलंबून आहे.

‘ट्रुथ सोशल’मधून ट्रम्प यांनी २०१ डॉलर्सपेक्षा कमी कमावले असले तरी ’एनएफटी’च्या माध्यमातून एक दशलक्षपर्यंत कमाई केल्याचे दिसत आहे.


Powered By Sangraha 9.0