कराची : पाकिस्तानी नागरिकांकडून चीनी कंपन्या आणि त्यांच्या अधिकार्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तेथील कंपन्यांनी आवराआवर सुरू केली आहे. यामुळे द्विपक्षीय संबंधांत वितुष्ट निर्माण झाले असून त्याचा आर्थिक फटका चीनला बसत आहे.
पाकिस्तानच्या कराची पोलिसांनी चिनी नागरिकांचे काही उद्योग बंद केलेत. यात एक उपहारगृह, एक सुपरमार्केट व मरीन-प्रॉडक्ट कंपनीचा समावेश आहे. चिनी नागरिकांवरील संभाव्य हल्ल्यांच्या भीतीपोटी हे पाऊल उचलण्यात आले आहे. चिनी नागरिकांवरील हल्ल्यांमुळे द्विपक्षीय संबंधांत वितुष्ट येऊ शकते, अशी पाकला भीती आहे.
दरम्यान, पाकिस्तानी नागरिकांत चीन विरोधी भावना बळकट होत आहे. आर्थिक मदत, नवे व्यवसाय व मायनिंग ऑपरेशन्सच्या नावाखाली चीन आपल्या जमिनी बळकावत असल्याचा त्यांना संशय आहे. पाकिस्तानात सक्रिय अतिरेकी संघटनाही चिनी नागरिक व चीन-पाक आर्थिक कॉरिडोरशी संबंधित प्रकल्पांना लक्ष्य करत आहेत. त्याचा संपुर्ण फटका चीनला बसत असून, त्यांनी केलेली गुंतवणूक संकटात सापडली आहे.
कर्जमाफीसाठी पाकचा चीनवर दबाव
दरम्यान, पाकिस्तान कर्जमाफीसाठी चीनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने कर्जमाफी दिली नाही, तर तो डिफॉल्ट घोषित होऊ शकतो, अशी पाकला भीती आहे. चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र लष्करी तुकडीला वित्तपुरवठा करण्यासाठी पाककडे पुरेसा पैसा नाही. त्यामुळे पाकिस्तानसह चीनचीही आर्थिक कोंडी झाली आहे.