गेल्या काही दशकांमध्ये मानवाने तंत्रज्ञानात घेतलेली भरारी म्हणजे मानवाने प्रगतीचा गाठलेला उच्चांक होय. या यशाने हुरळून न जाता, संपूर्ण जगापुढे सध्या आधुनिक जीवनशैली, सामाजिक राहणीमानात झालेले बदल आणि त्यामुळे उद्भवलेल्या समस्या ही आव्हाने आहेत. या सगळ्यात पर्यावरणाची झालेली मोठ्या प्रमाणातील हानी, वसुंधरेचे नैसर्गिक रूप विद्रूप करणार्या आणि संपूर्ण सृष्टीच्या विनाशास कारणीभूत ठरत आहे. पृथ्वीवरील वातावरणात, पर्यावरणात झालेले घातक बदल हे जल, जमीन, वायू या तिन्ही स्तरांवर घडले आहेत. यामुळे भूतलावरील अनेक सजीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने जैवविविधता बाधीत होत आहे.
या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी शासन, वनविभाग, स्वयंसेवी संघटना, अशासकीय संस्था, जागरूक कर्तव्य दक्ष नागरिक, निसर्गप्रेमी, वारंवार स्थानिक नागरिकांचे समुपदेशन करतात. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांच्याकडून नवनवे उपक्रम राबविले जातात. परंतु, त्यांच्या मोहिमेला अपेक्षित असे यश मिळाले असे म्हणता येणार नाही. जगभरात झालेल्या तापमानवाढीमुळे हिमनगाचे वितळणे, ऋतुचक्रातील बदलास कारणीभूत ठरले आहे. याचाच परिणाम म्हणुन कुठे महापूर, कुठे अवर्षण आढळते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच आधुनिकीकरणाच्या नादात ध्वनिप्रदूषणासोबतच नैसर्गिक जलस्रोत ही नष्ट होत आहेत. नद्या प्रदूषित झाल्या, कचरा, घाण, रोगराईने महानगराला गिळंकृत केले. डायनासोरसारखे महाकाय प्राणी फार वर्षांपूर्वीच अस्त पावले तर अनेक प्राणी, पक्षी, कीटक, जलचर तसेच सूक्ष्मजीव यांच्या काही प्रजाती नष्ट झाल्या. अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या वाटेवर ही आहेत. आपल्या देशात चित्ता हा अतिचपळ, वेगवान व देखणा, रूबाबदार प्राणी नामशेष झाला होता. आता चित्त्यांना बाहेरील देशातून आणून पुनवर्सन करण्याचा स्तुत्य उपक्रम शासनाने राबवून नवी आशादायक सुरुवात केली आहे. गवताळ प्रदेश हा अधिवास असणारे चित्त्यासारखे अनेक प्राणी नष्ट होण्याच्या वाटेवर होते. याचेच आणखी एक उदाहरण म्हणजे माळढोकांची घटलेली संख्या हीदेखील चिंतनीय बाब आहे. विकसनशील देशांच्या यादीत अग्रस्थानी नाव असणार्या आपल्या देशात जुन्या रुढी-परंपरा आणि संस्कृतीचा विसर पडल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती...’ या संत तुकोबारायांच्या अभंगातून तत्कालीन वसुंधरेचे मनोहारी चित्र रेखाटले आहे. परंतु, बदलत्या जीवनशैलीमुळे निसर्गाचे मूळ रुप विद्रूप होतानाचे चित्र दुर्दैवाने पुढे येत आहे. धनाचा हव्यास, औद्योगिकीकरण, प्रदूषण यामुळे ही पृथ्वी ढवळून निघाली आहे. उदाहरणच द्यायचे, तर दळणवळणाच्या सुखसोईंसाठी, औद्योगिकरणासाठी, विद्युतीकरण तसेच रस्ते बांधणीचे काम शासकीय स्तरावरून फार मोठ्या प्रमाणात होत असताना वन्यप्राण्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत. संक्रांतीच्या वेळी पतंग उडवताना मांजामुळे अनेक पक्षी तसेच माणसांना जीव गमवावा लागण्याच्या घटना कानावर येतात. साप, कासव, घुबड या प्राण्यांबाबतच्या अंधश्रद्धेतून तसेच त्यांच्या होणार्या तस्करीसाठी या मुक्या जीवांची हत्या होते. साप, उंदीर यांचे शेतीसाठी असणार्या योगदानाबाबत सर्वसामान्यांना शास्त्रीय माहितीच नसल्याने सापांना मारण्याच्या घटना वाढत आहेत. जखमी प्राणी, पक्षी यांच्या उपचारासाठी किंवा बचावासाठी असलेल्या ’रेस्क्यू सेंटर’बद्दल स्थानिकांना माहिती नाही. या सर्व बाबींचा अभ्यास करून शासन, स्वयंसेवी संस्था, निसर्गप्रेमी, जागरूक नागरिक तसेच विविध स्तरांवर कार्यरत शासकीय, अशासकीय विभागाने नजीकच्या काळात एकत्रितपणे कार्य करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू झाले, ही आशादायक बाब होय. वसुंधरा वाचवण्यासाठी संघटितपणे हाती घेण्याचे उपक्रम जसे की, प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर, परदेशी मांजावर बंदी, गावपातळीवर स्थानिकांच्या रोजगार समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना, वन्यजीव व मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी लोकांचे समुपदेशन असे उपक्रम वेळोवेळी राबवायला हवेत. त्याचबरोबर वन्यजीव भ्रमणमार्ग, जिल्हास्तरावर ‘रेस्क्यू टीम’ची उपलब्धता, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा, वनविभाग कर्मचार्यांना प्रशिक्षण, स्थानिक युवकांना प्रशिक्षण, शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात पर्यावरण शिक्षणसक्तीचे करणे अशी महत्त्वपूर्ण पावले उचलायला हवीत. वनतस्करी व वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी वन विभागाने महत्त्वपूर्ण कायदे अंमलात आणले आहेत. प्लास्टिकचा अतिरेकी वापर होऊ नये म्हणून प्लास्टिक पिशव्यांवर बंदीची असतानादेखील मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापर केलेला दिसतो. शासकीय पातळीवर अनेक उपक्रम राबवले जात असले, तरी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात पर्यावरण शिक्षण अनिवार्य करणे गरजेचे आहे.

यंदाच्या वसुंधरा दिनानिमित्त एवढेच सांगावेसे वाटते की, आजची पिढी प्रगत, सुखासिन जीवन जगेलही पण येणार्या काही वर्षांत सृष्टीतील, सजीव, निर्जीव घटकांचे अस्तित्वच राहीले नाही तर मानव समुहसुद्धा नामशेष होईल. जागतीक वातावरण बदलांच्या तज्ञांचा अहवाल हेच दर्शवीतो की संपूर्ण जग विनाशाच्या नियंत्रण रेषेवर उभं ठाकलं आहे. सगळ्यात महत्त्वाचे उदाहरण द्यायचे झाले तर पाणथळ परिसंस्था ही जगातील सर्वात अधिक धोक्यात आलेली परिसंस्था आहे.
पृथ्वीवर असलेल्या 97 टक्के पाण्यापैकी केवळ 3 टक्के वापरायोग्य आहे. पृथ्वीवर असणार्या पिण्यायोग्य 1% पाण्याच्या स्रोतांपैकी 30% पाणी हे पाणथळ जागा जसे की नद्या, तलाव यामध्ये आहे. 17व्या शतकापासुन आता पर्यंत 80% पेक्षा जास्त पाणथळ जागा नाहीशा झाल्या आहेत आणि यात अजून ही भर पडतेच आहे. पृथ्वीचे संवर्धन करायचे असेल तर आपल्या सर्वांना आपली सामजिक जबाबदारी समजून घेणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने एक जागरूक नागरिक होऊन आपल्या आपल्या स्तरावर पृथ्वी वाचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
भूतकाळातील घटनांचा अभ्यास करून, सद्यस्थितीत आपल्याला वसुंधरा जतन करणारी प्रभावी यंत्रणा भविष्यासाठी उभारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, आज नव्हे तर आताच्या क्षणापासून निसर्ग रक्षकांची एक नवी फळी उभारण्याची ही गरज आहे. केवळ कायद्याचेच नव्हे तर सृष्टीचे बारकावे समजणारी, शास्त्रोक्त ज्ञान असणारी आणि फक्त वयाने नाही तर मनाने तरुण असलेली पिढी देशात निर्माण होईल असे प्रयत्न करायला हवेत. पर्यावरणासाठी आणि वसुंधरेच्या संवर्धनासाठी नवसंकल्प करून प्रत्यक्ष कार्य करण्यास सुरुवात करायला हवी, तरच यंदाचा जागतिक वसुंधरा दिन आपण खर्या अर्थाने साजरा केल्याचे समाधान लाभेल.

जैवविविधतेच्या र्हासास कारणीभूत घटक
लोकसंख्येतील प्रचंड वाढ.
औद्योगिकीकरण
प्लास्टिकचा अतिवापर.
शेतीमध्ये घातक रसायनांचा वापर
जैविक शेतीविषयी अनास्था
वन्यजीव आणि वनसंपदेची तस्करी
प्रदूषणातील प्रचंड वाढ
वृक्षतोड, जंगलातील वनवे
वन्यप्राण्यांच्या अधिवासातील मानवी घुसखोरी