ईशान्य भारतातील पहिले ‘एम्स’ आसाममध्ये, पंतप्रधानांनी केले उद्घाटन

श्रेयासाठी भुकेलेल्यांमुळे देशाचे नुकसान – काँग्रेसला टोला

    14-Apr-2023
Total Views |
first-aiims-in-northeast-india-assam

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आसामची राजधानी गुवाहाटी येथे ईशान्य भारतातील पहिल्या ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ अर्थात ‘एम्स’चे उद्घाटन केले. त्याचप्रमाणे आसाममध्ये ३४०० कोटी रूपयांच्या विविध विकास योजनांचीही पायाभरणी त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आसाम दौऱ्यावर होते. येथे त्यांनी ईशान्य भारतातील पहिल्या ‘एम्स’चे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले, आजकाल नवनवीन आजार दिसून येत आहेत. मी देशात कुठेही जातो आणि गेल्या ९ वर्षात झालेल्या विकासाबद्दल बोलतो तेव्हा काही लोक नाराज होतात. त्यांनीही अनेक दशके देशावर राज्य केले, याचे श्रेय त्यांना का मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. श्रेयासाठी भुकेलेल्या लोकांनी आणि जनतेवर राज्य करण्याच्या भावनेने देशाचे खूप नुकसान केले आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले.

भाजप सरकारमधील धोरण, हेतू आणि निष्ठा कोणत्याही स्वार्थाने ठरत नाहीत, तर 'प्रथम राष्ट्र, देशवासी आधी' या भावनेने ठरत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, व्होट बँकेऐवजी आम्ही देशातील जनतेच्या अडचणी कमी करण्यावर भर दिला. आमच्या बहिणींना उपचारासाठी दूरवर जावे लागू नये, हे आमचे ध्येय होते. पैशांअभावी कोणत्याही गरीबाला उपचार पुढे ढकलावे लागू नयेत, असा निर्णय आम्ही घेतला आहे.

first-aiims-in-northeast-india-assam

यावेळी पंतप्रधानांनी गेल्या ८-९ वर्षांत ईशान्येकडील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आणि रस्ते, रेल्वे आणि विमानतळाच्या पायाभूत सुविधांमध्ये दृश्यमान सुधारणांचा उल्लेख केला. भौतिक पायाभूत सुविधांसोबतच सामाजिक पायाभूत सुविधांनाही या प्रदेशात मोठी चालना मिळाली आहे कारण शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा अभूतपूर्व पद्धतीने विस्तार करण्यात आला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पीएम मोदींनी मे २०१७ मध्ये गुवाहाटीमध्ये ईशान्येतील पहिल्या एम्सची पायाभरणी केली होती. ११२० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधलेले हे १०० एमबीबीएस आसन असलेले हॉस्पिटल ईशान्येतील लोकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवेल.

याशिवाय पंतप्रधानांनी यावेळी नलबारी मेडिकल कॉलेज, नागाव मेडिकल कॉलेज आणि कोकराझार मेडिकल कॉलेज ही तीन वैद्यकीय महाविद्यालये देशाला समर्पित केली. या ५०० खाटांच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आपत्कालीन सेवा, आयसीयु, ऑपरेशन थिएटर, ओपीडी, आयपीडी आणि निदान सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे या प्रत्येक महाविद्यालयामध्ये १०० एमबीबीएस आसन क्षमता आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.