गुन्हेगारांना धडकी भरविणारे नेतृत्व
नवी दिल्ली, पार्थ कपोले : उत्तर प्रदेशला गुन्हेगार आणि गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे २०१६ साली सांगणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात आतापर्यंत १८३ गुन्हेगारांना चकमकीद्वारे यमसदनी धाडण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशचे धडाकेबाज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश विधानसभेत ते उमेश पाल हत्याकांडाविषयी ते बोलत होते की “प्रदेश के हर एक माफिया को मिट्टी में मिला देंगे” आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच राज्यातील बाहुबली माफिया अतिक अहमदची गुजरातमधील साबरमती साबरमती तुरुंग ते प्रयागराज न्यायालय अशी पंधरा दिवसातून दोनवेळा शब्दश: ‘वरात’ काढली आणि त्याच्यावरील १०० पैकी पहिल्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचवेळी अतिक अहमदचा अनेक गुन्ह्यांचा आरोपी आणि फरार असलेला मुलगा असद अहमद याचा चकमकीत यमसदनी धाडल्यानंतर तर अतिक अहमद चांगलाचा खचला असल्याचे दिसून आले आहे.
उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा बहुमताने मुख्यमंत्री झालेल्या योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा ‘गुन्हेगारांवर कडक कारवाई करणारे कठोर प्रशासक’ अशी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा या दोघांनीही अनेक प्रसंगी 'कायदा आणि सुव्यवस्थेच्या' बाबतीत उत्तर प्रदेश मॉडेलचे कौतुक केले आहेमाफिया आणि गुन्हेगारांविरुद्ध कारवाईविषयी 'बुलडोझर' आणि 'चकमक' ही उत्तर प्रदेशची नवी ओळख बनली आहे. त्यामुळे राज्यात वर्षानुवर्षे आपले ‘दरबार’ भरविणारे बाहुबली ‘दाती तृण धरून’ शरणागती पत्करताना दिसत आहेत.
आकडेवारीनुसार, १८३ गुन्हेगारांना चकमकीत यमसदनी धाडण्यासोबतच विविध पोलिस कारवाईदरम्यान जखमी झाल्यानंतर यूपीमध्ये 5,046 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 6 वर्षांत अशा कारवायांमध्ये 13 पोलिस 'हुतात्मा' झाले आहेत, तर 1,443 पोलिस जखमी झाले आहेत.
गुन्हे सोडा अथवा उत्तर प्रदेश सोडा
19 मार्च 2017 रोजी जेव्हा योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून राज्यातील संघटित गुन्हेगारी आणि गुन्हेगारांबाबत त्यांची दृष्टी अगदी स्पष्ट झाली होती. “एकतर माफिया आणि गुन्हेगारांना सुधरावे, नाहीतर उत्तर प्रदेश सोडावा. मात्र, येथे कोणालाही कायद्याशी खेळू दिला जाणार नाही”. असे त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले होते. राज्यातील संघटित गुन्हेगारी माफियांविरुद्ध कारवाई करण्यासाठी त्यांनी यूपी पोलिसांना मोकळा हात दिला आणि गुन्हेगारी आणि गुन्हेगारांविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सर्व वॉन्टेड गुन्हेगारांची जिल्हानिहाय यादी तयार करून त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. गुन्हेगारांमध्ये कायदा आणि पोलिसांचा धाक हे गुन्ह्याला आळा घालण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे आणि त्यांच्या शासनाचा मुख्य आधार आहे, असे योगी आदित्यनाथ अतिशय स्पष्ट शब्दात वेळोवेळी सांगत असतात.