भरतपूर : राजस्थानमधील भरतपूर येथे महाराजा सूरजमल यांचा पुतळा बसवण्यावरून गदारोळ झाला आहे. त्या भागात दि. १२ एप्रिल रोजी रात्री उशिरापर्यंत दगडफेक आणि जाळपोळ सुरू होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकावरही दगडफेक करण्यात आली. शेवटी आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करावा लागला.
भरतपूरच्या नादबाईमध्ये पालिकेकडून तीन ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. कुम्हेर चौकात महाराजा सूरजमल, बैलारा चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि नगर चौकात भगवान परशुराम यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र पालिकेच्या या निर्णयावर स्थानिक जाट समाजाचे लोक खूश नाहीत. बैलारा चौकात डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या जागी महाराजा सूरजमल यांचा पुतळा बसवण्याची त्यांची मागणी आहे. त्यामुळेच जाट समुदायाने स्थानिक आमदार जोगेंद्र सिंग अवाना यांच्या विरोधात धरणे आंदोलन केले.
आंदोलकांनी आधी रस्ते अडवले, नंतर रस्त्यावर जाळपोळ सुरू केली. पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. पहाटे २.३० वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. तरी देखील दि.१३ एप्रिल सकाळपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते.