स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कुटुंबियांकडून तक्रार

13 Apr 2023 07:29:25
rahul-gandhis-defamation-claim

पुणे
: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी सातत्याने आक्षेपार्ह विधाने करणार्‍या राहुल गांधी यांना आता सावरकर कुटुंबीयांनी थेट न्यायालयातच आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड येथील एका कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी खोटी माहिती सांगत त्यांचा अपमान केल्याप्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्त्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे.

या संदर्भात ’मुंबई तरुण भारत’ने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातून सात्त्यकी सावरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की राहुल गांधी हे इंग्लंडमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्या ठिकाणी भारतीयांना संबोधित करताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेऊन खोटी माहिती दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या चार ते पाच सहकार्‍यांनी एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली आणि त्यामुळे मला प्रचंड आनंद झाला असा उल्लेख सावरकरांनी लिखित स्वरूपात केला असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांनी लिहिलेला हा प्रसंग वाचताना मला वेदना झाल्याचे देखील नमूद केले होते. लढायचेच असेल तर एका व्यक्तीसोबत एकट्याने लढा. पाच जण मिळून एखाद्याला मारहाण करणे म्हणजे ही क्रूरता असल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले होते.
 
परंतु, प्रत्यक्षात असा कुठलाही प्रकार घडलेला नव्हता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाङ्मयामध्ये कुठेही अशा कोणत्याही घटनेचा अगर प्रसंगाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.पुणे न्यायालयामध्ये बुधवारी अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर आणि अ‍ॅड. अनिरुद्ध गानू यांच्यामार्फत दावा दाखल करण्यात आला. परंतु, काही तांत्रिक कारणास्तव त्याला अद्याप केस नंबर मिळालेला नाही. या संदर्भात येत्या शनिवारी (दि. १५ एप्रिल) न्यायालयामध्ये बोलावण्यात आल्याचे सात्यकी यांनी सांगितले.
 
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची मते कलुषित करण्याच्या दृष्टीने तसेच त्यांची बदनामी करण्यासाठी अपमानजनक वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांच्या या वक्तव्याची शिक्षा मिळावी याकरता न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही कुटुंबीयांनी घेतला आहे.

(सात्त्यकी सावरकर)
Powered By Sangraha 9.0