मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याविषयी अपमानजनक टिप्पणी केल्यामुळे नॅशनल हेराल्डच्या संपादिका चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य लूटमार करणारे होते आणि ते महिलांचा बलात्कार करायचे अशी टिप्पणी सुजाता आनंदन यांनी ट्विटरवरून केली होती. त्यांच्या या ट्विटची दखल घेत भाजप आमदार नितेश राणे यांनी या विरोधात पोलीस एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. यावरून सांताक्रुज पोलिसांनी राणेंच्या तक्रारीची दखल घेत सुजाता आनंदन आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एनसीईआरटीच्या वतीने शालेय पाठ्यक्रमातून मुघलांच्या इतिहासाची प्रकरणे गळून टाकण्यात आली आहेत असा दावा केला जात आहे. यावरून देशातील काही राज्यांमध्ये लपलेले छुपे मुघलप्रेमी बिळाबाहेर पडत असून त्यात सामील झालेल्या सुजाता आनंदन यांनी मुघलांचे समर्थन करत शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याविषयी वरील टिप्पणी केली आहे. ''छत्रपति शिवाजी महाराज महान होते हे निश्चित आहे. मात्र, मुघलांची माहिती लपवून त्यांचे कार्य मोठे होणार नाही. मुघलांनी शिवाजी महाराजांना कैद केले, पण कडक सुरक्षेत ठेऊनही शिवराय तेथून निसटले. शिवाजी महाराजांनी अनेकदा मुघल सैन्याचा पराभव केला, मुघल कधीही त्यांच्यावर मात करू शकले नाहीत हे मान्य आहे. असे असले तरी शिवाजी महाराजांचे सैन्य हे महिलांची लुट करणारे आणि त्यांच्यावर बलात्कार करणारे होते,'' अशी गरळ सुजाता आनंदन यांनी ओकली होती.
सुजाता आनंदन यांच्या या ट्विटविरोधात भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झाले असून त्यांनी थेट सांताक्रुज पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. ''काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेराल्डच्या संपादिका सुजाता आनंदन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आक्षेपार्ह शब्दांचा उल्लेख असणारे ट्विट केले आहे. त्यांची ही विधाने पूर्णपणे निराधार असून त्याला कुठलाही ऐतिहासीक आधार नाही हे सत्य आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सुजाता आनंदन यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ, २९५ अ, कलम ५०४ आणि इतर आवश्यक ती कलमे लावून त्यांना अटक करावी,' अशी मागणी नितेश राणे यांनी सांताक्रुज पोलिसांना पत्राद्वारे केली आहे.