ठाणे : ठाणे मनोरुग्णालयाच्या जागा हस्तांतरणावरील स्थगिती आदेश मुंबई उच्च न्यायालयाने उठवुन महिना उलटला तरी, जागा हस्तातरणाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे नविन स्थानकाच्या कामाला पावसाळ्यानंतरच सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोरुग्णालयाची १४.८३ एकर जागा राज्य सरकारकडून ठाणे महापालिकेला हस्तांतरीत केल्यानंतर त्यातील ३.७७ एकर जागा रेल्वेला हस्तांतरीत केली जाणार आहे. उर्वरीत ११.०६ एकर जागेत महापालिकेमार्फत अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.अशी माहिती सुत्रांनी दिली.
दररोज सात लाख प्रवाशांची ये-जा असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी मुलुंड आणि ठाणे स्थानकादरम्यान नविन ठाणे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव आहे. अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या स्थानकाचा आराखडा मंजूर केला आहे. ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या कामासाठी २८९ कोटी रुपये खर्चालाही मंजुरी मिळाली आहे. मनोरुग्णालयाची जागा आरोग्य विभागाने हस्तांतरीत केल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार होते.
परंतु, एका जनहित याचिकेवर सुनावणी देताना मनोरुग्णालयाची जागा कुणालाही हस्तांतरीत करून ‘थर्ड पार्टी इंटरेस्ट’ निर्माण करू नका, असे आदेश १२ ऑगस्ट, २०१५ रोजी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे या रेल्वे स्टेशनच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा हस्तांतरीत होत नव्हती. परिणामी, तांत्रिक आणि वित्तीय मंजूरी असतानाही रेल्वे स्थानकाच्या उभारणीचे काम सुरू होत नव्हते.
त्यानंतर फडणवीस-शिंदे सरकारच्यावतीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे स्थगिती उठवुन ३ मार्च रोजी न्यायालयाने हा तिढा संपुष्टात आणला. मात्र, आता महिना उलटला तरी सरकारला जागा हस्तातरणाला मुहुर्तच मिळालेला नाही. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या व्यस्त कामकाजामुळे नविन स्थानकाचा विषय रेंगाळल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.
त्यानंतरच स्थानकाचे काम सुरु...
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या ७२ एकर जागेपैकी १४.८३ एकर जागा रेल्वे स्थानकासाठी आवश्यक आहे. १४.८३ जागा आरोग्य विभागाकडुन ठाणे महापालिकेला हस्तांतरीत केल्यानंतर ३.७७ एकर जागा रेल्वेला हस्तांतरीत केली जाणार आहे. त्यानंतरच रेल्वे सर्व प्रशासकिय परवानग्या घेऊन रेल्वे स्थानकाचे काम सुरु करणार आहे.
प्रवाश्यांच्या नशिबी प्रतिक्षाच...
नवे ठाणे स्थानक उभारल्याने ठाणे स्थानकावरील सुमारे ३१ टक्के आणि मुलुंड स्थानकावरील प्रवाशांचा २१ टक्के भार कमी होणार आहे. नविन स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि मुलुंडच्या लाखो प्रवाशांचे त्रास कमी होतील. तसेच, या दोन्ही स्टेशनच्या सभोवतालच्या परिसरातील कोंडीही दूर होईल.मात्र यासाठी प्रवाश्यांना दिर्घ प्रतिक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहे.