काय आहेत कावळा ‘पांढरा’ असण्याची कारणे?

11 Apr 2023 19:16:20


white crow


मुंबई (प्रतिनिधी): नुकतंच पुण्यात पांढरा कावळा आढळुन आल्याचे वृत्त सगळीकडे पहायला मिळाले. पिढ्यानपिढ्या काळा कावळाच सर्वसाधारणपणे बघण्यात आलेला असल्यामुळे हे वृत्त अनेकांच्या औत्सुक्याचा आणि आकर्षणाचा मुद्दा ठरले. काळ्या कावळ्याव्यतिरिक्त खरंच कावळा असतो का? कावळा पांढरा असल्याची कारणे काय असु शकतात? यामागची शास्त्रीय कारणे नेमकी काय?, याचा हा आढावा.

कावळा हा कोर्विडे या कुळातील पक्षी आहे. कावळा कुटुंबात भारतात एकुण २४ प्रजाती पहायला मिळतात. त्यामध्ये नटक्रॅकर्स, चफ, जॅकडॉ, रुक, रेवन्स, मॅगपाय आणि ट्रीपाय या प्रजातींचा समावेश आहे. पांढरा कावळा हा साधारण कावळ्यासारखाच आहे मात्र त्यात मेलानीनचे प्रमाण कमी असते. मेलानीन हे बहुतांशी सजीवांमध्ये असलेले रंगद्रव्य आहे. ते सजीवांच्या त्वचा, नखे आणि केस यामध्ये प्रामुख्याने असते. या रंगद्रव्याचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास प्राण्यांचा रंग बदलतो. हे प्रमाण योग्य राहिल्यास प्राण्यांचा मुळ रंग तसाच राहतो.कावळ्यामध्ये या मेलानीन रंगद्रव्याचे प्रमाण कमी झाले तर कावळा पांढरा दिसु लागतो. हे प्रमाण अंशतः कमी असेल तर अंशतः पांढरा दिसतो, यालाच वैज्ञानिक भाषेत ल्युसिस्टीक म्हटले जाते. दुसरीकडे मेलानीन या रंगद्रव्याचे प्रमाण अतिशय कमी असेल तर पुर्ण पांढरा दिसतो, यालाच वैज्ञानिक भाषेत अल्बिनीजम म्हटले जाते.

पांढरा कावळा दिसण्याची घटना अतिशय दुर्मीळ आहे. यापुर्वी २०२० मध्ये ओरिसा आणि मध्य प्रदेशमध्ये पांढरा कावळा निदर्शनास आला होता. तर, २०२१ मध्ये छत्तीसगढ मध्ये ही पांढऱ्या कावळ्याचे दर्शन झाले होते.

कावळाच काय इतर अनेक प्राणी आणि पक्ष्यांमध्ये हा प्रकार बघायला मिळतो. प्रामुख्याने जंगली प्राण्यांमध्ये ल्युसिसीजम आणि अल्बिनीजम बघायला मिळतो. मार्जार कुळातील वाघ, बिबट्या यांच्यात हे दिसुन आहे.  स्नो टायगर म्हणजेच पांढरा वाघ हे ल्युसिस्टीक प्रकारचे उदाहरण आहे. ब्लॅक पॅंथर हे ही मेलानिस्टीक लेपर्डचे एक उदाहरण आहे. याचप्रकारे, आत्ता आढळुन आलेला ल्युसिस्टीक कावळा, पांढरा उंदीर ही त्याचीच उदाहरणे आहेत. 



Powered By Sangraha 9.0