नवी दिल्ली : राहुल गांधी आणि संपूर्ण गांधी कुटुंबाचे परदेशातील ‘अनिष्ट’ उद्योगपतींशी संबंध असल्याचे विधान माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. त्यामुळे आता अशा परदेशी लोकांच्या आदेशावरून राहुल गांधी मोदीविरोधी राजकारण करतात का, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी विचारला आहे.
काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांचा संबंध उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी असल्याचे एक ट्विट केले होते. त्यामध्ये ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचाही उल्लेख करण्यात आला होता. त्यास आझाद यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांचेच ‘अनिष्ट’ उद्योगपतींशी संबंध आहेत. केवळ राहुलच नव्हे तर संपूर्ण गांधी कुटुंबाचेही अशा प्रकारच्या उद्योगपतींशी संबंध आहे. राहुल गांधी हे परदेशात जाऊन अशा उद्योगपतींना भेटतात, याची दहा उदाहरण आपण देऊ शकत असल्याचाही दावा आझाद यांनी केला आहे.
आझाद यांच्या या दाव्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी परदेशात कोणत्या उद्योगपतींना भेटतात हे देशाला जाणून घ्यायचे आहे. राहुल गांधी देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. परकीय हस्तक्षेपाला आमंत्रण देऊन ते देशाच्या विरोधात काम करत आहेत. राहुल गांधी भारतात परतल्यावर त्यांचा भारतावर, पंतप्रधानांवर आणि भारताच्या प्रगतीवरचा हल्ला अधिकच तीव्र होतो. त्यामुळे कोणत्या परदेशी उद्योगपतींच्या इशाऱ्यावर ते वागतात, हे देशाला सांगावे असेही रविशंकर प्रसाद यांनी यावेळी म्हटले आहे.