‘डीडब्ल्यू’चा हा माहितीपट किंवा त्या आधीचा ‘हिंदुत्व पॉप’ गाण्याबद्दलचा वृत्तांत पाहता, हिंदू समाजास बदनाम करण्यासाठीच हे केले जात असल्याचे दिसून येत आहे. पण, मुस्लीम समाजाकडून केले जाणारे हल्ले, दंगली याची माहिती मात्र या जर्मन वृत्तवाहिनीकडून दिली जात नाही.
‘डीडब्ल्यू’ या नावाने ओळखली जाणारी जर्मन सरकारची ‘न्यूज’ कंपनी हिंदुत्वास विरोध करीत असल्याचे आणि गोहत्या करणार्यांचे उघड उघड समर्थन करीत असल्याचे दिसून आले. या कंपनीने पुन्हा भारतविरोधी प्रचार करण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या जानेवारी महिन्यात या कंपनीने एक माहितीपट प्रकाशित केला. त्यामध्ये कथित द्वेष पसरवित असलेल्या ‘हिंदुत्व पॉप’ गाण्याची माहिती देण्यात आली होती. आपल्या युट्यूबवरून हा लघुपट दाखविण्यात आला होता. तेवढ्यावरच न थांबता गेल्या ८ एप्रिल रोजी गायींची तस्करी करणारे आणि गायींची हत्या करणारे खाटीक यांना चक्क पाठिंबा देणाराच एक व्हिडिओ या कंपनीने प्रदर्शित केला. ‘भारताचा शाकाहारी राष्ट्रवाद’ असे त्यास संबोधून मांस खाणारे, विशेषतः खाटीकखाने चालविणारे मुस्लीम यांना या राष्ट्रवादाने लक्ष्य केले असल्याचे म्हटले आहे.
गायींची बेकायदा तस्करी करणे किंवा हत्या करणे हा गुन्हा आहे. भारतात त्यासाठी कडक कायदे आहेत. पण, त्याकडे दुर्लक्ष करून जर्मनीच्या या वृत्तवाहिनीने खाटीक आणि तस्कर यांची बाजू घेऊन गोरक्षकांवर टीका केली. या आधीही ‘हिंदुत्व पॉप’ गाणी म्हणजे मुस्लीमविरोधी द्वेष संगीत असल्याचा उल्लेख या वृत्तसंस्थेने केला होता.या कंपनीचा भारतातील प्रतिनिधी अदिल भट याने हरियाणा, दिल्ली आणि आसपासच्या भागास भेट दिल्यानंतर मोदी यांच्या राजवटीमध्ये भारतातील मुस्लीम भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे भाष्य केले आहे. त्याने मोहम्मद नावाच्या खाटकाची भेट घेतली असता, नवरात्रीच्या काळात आपले दुकान बंद ठेवण्याची सक्ती प्रशासनाने आपणावर केली होती, असे त्याने आदिल भट यास सांगितले. या वृत्तवाहिनीच्या वृत्तात, गेल्या काही वर्षांमध्ये हरियाणामध्ये माझ्यासारख्या मुस्लीम खाटकांना हिंदू सणांच्यावेळी आणि दर मंगळवारी दुकान बंद करण्याची सक्ती केली जाते, अशी माहितीही त्या खाटकाने त्या पत्रकारास दिली. या वार्तापत्रात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशांसारख्या संघटना ‘शाकाहारी राष्ट्रवादा’चा पुरस्कार करण्यात आघाडीवर आहेत, असेही म्हणण्यात आले होते.
एक मिनिट ५७ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये ‘डीडब्ल्यू’च्या पत्रकाराने एक गोरक्षकाचीही भेट घेतली. मुस्लीम समाजाकडून गायींची हत्या करून त्यांचे मांस खाल्ले जाते, त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखविल्या जातात. गोहत्या थांबविण्यासाठी आम्ही प्राणांचे बलिदान देण्यासही तयार आहोत, असे या गोरक्षकाने सांगितल्याची माहिती त्या माहितीपटात देण्यात आली आहे.‘डीडब्ल्यू’चा हा माहितीपट किंवा त्या आधीचा ‘हिंदुत्व पॉप’ गाण्याबद्दलचा वृत्तांत पाहता, हिंदू समाजास बदनाम करण्यासाठीच हे केले जात असल्याचे दिसून येत आहे. पण, मुस्लीम समाजाकडून केले जाणारे हल्ले, दंगली याची माहिती मात्र या जर्मन वृत्तवाहिनीकडून दिली जात नाही. मुस्लीम समाजाच्या विविध कार्यक्रमांत, मिरवणुकीत ‘टोपी को जो ललकारेगा, उसे काट के रख देंगे’ अशा आशयाची द्वेषपूर्ण गाणी खुलेआम म्हटली जातात. ही गाणी ‘डीडब्ल्यू’च्या कशी काय लक्षात आली नाहीत? जर्मन सरकारच्या या अधिकृत वृत्तवाहिनीकडून केलेला हा हिंदूविरोधी प्रचार लक्षात घेता विदेशातून हिंदूविरोधी अपप्रचार किती मोठ्या प्रमाणात केला जातो याची कल्पना यावी.
दुसरीतील मुलगा पालकांना म्हणू लागला ‘अब्बू’ आणि ‘अम्मी’; दंडाधिकार्याने दिले चौकशीचे आदेश!
उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधील ही घटना. त्यातील एका शाळेत दुसरीत शिकणारा मुलगा आपल्या वडिलांना चक्क ‘अब्बू’ आणि आईला ‘अम्मी’ असे संबोधू लागल्याने अस्वस्थ झालेल्या त्या मुलाच्या वडिलांनी जिल्हा दंडाधिकार्यांकडे तक्रार केली. दंडाधिकार्यानेही या तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्यांना दिले. पाठ्यपुस्तकातील एक धडा वाचल्यानंतर सदर मुलाने आम्हा आई-वडिलांना ‘अम्मी’ आणि ‘अब्बू’ म्हणण्यास सुरुवात केली, असे पालकांचे म्हणणे होते. मनीष मित्तल या पालकाने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आज अचानकपणे माझ्या मुलाने मला ‘अब्बू’ आणि त्याच्या आईला ‘अम्मी’ असे म्हणण्यास सुरुवात केली. मुलाने आम्हास अशाप्रकारे पुकारल्याचे ऐकून आम्हा दोघांनाही धक्का बसला. तू आम्हास असे का म्हणतोस, अशी विचारणा त्या मुलाकडे केली असता, त्या मुलाने हैदराबादच्या ‘ओरिएंट ब्लॅक स्वान’ या प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील धड्याकडे बोट दाखविले. पहिल्याच धड्यामध्ये वडील आणि आई यांना ‘अब्बू’ आणि ‘अम्मी’ म्हणतात, असे स्पष्टीकरण देण्यात आले होते.
इंग्रजी हा शालेय अभ्यासक्रमाचा भाग आहे, ते लक्षात घेऊन मुलांना चुकीच्या गोष्टींचे अनुकरण करण्याची पद्धत त्वरित थांबायला हवी, अशी मागणी त्या दुसरीतील मुलाच्या पालकांनी केली आहे. मित्तल यांनी म्हटले आहे की, “हिंदी पुस्तकांमध्ये माता आणि पिता असा उल्लेख हवा, तर ‘अब्बू’ आणि ‘अम्मी’ हे शब्द उर्दू पुस्तकांमध्ये वापरायला हवेत. इंग्रजीच्या पुस्तकात असे शब्द कशाला, असा प्रश्न त्या पालकांनी केला आहे. अशा धर्मविरोधी कृत्यांवर त्वरित कारवाई केली पाहिजे,” अशी मागणीही मनीष मित्तल यांनी केली आहे. उत्तराखंडला ‘देवभूमी’ म्हणून ओळखले जाते. त्या उत्तराखंडमध्ये संस्कृतप्रचुर शब्दांऐवजी उर्दू शब्द कोणी आणि कसे काय घुसडले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पाकिस्तानमध्ये हिंदू तरुणाची हत्या
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होण्याच्या घटना सुरूच आहेत. अल्पसंख्य हिंदू समाजातील व्यक्तींच्या हत्या त्या देशात नित्याच्याच घटना झाल्या आहेत. गेल्या ८ एप्रिल रोजी सिंध प्रांतात हत्या झालेल्या एका हिंदू युवकाचे प्रेत सापडले. या प्रकरणी इम्रान शाह नावाच्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या तरुणाची हत्या करण्यात आली त्याचे नाव नरसिंग कोहली असून तो २८ वर्षांचा आहे. नरसिंग याच्या शवापाशी पोलिसांना जो मोबाईल सापडला तो इम्रान शाह असल्याचे तपासात निष्पन्न झाले. नरसिंग कोहली याच्या हत्येचे तीव्र पडसाद पाकिस्तानमधील हिंदू समाजात उमटले. आरोपीस अटक करण्यात यावी, या मागणीसाठी हिंदू समाजाने निदर्शने केली. ‘रास्ता रोको’ही केला. हे निदर्शक ‘गुंडागर्दी बंद करो’ अशा घोषणा देत होते. पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समाजाची अवस्था खूपच कठीण झाली आहे, असे निदर्शक हिंदूंचे म्हणणे होते. अशा घटना लक्षात घेऊन, ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटने’कडे मदत मागण्याचे तेथील अल्पसंख्य समाजाने ठरविले आहे.
उदयपूरमध्ये भगव्या ध्वजांवर बंदी!
आपण हिंदुस्थानात राहत आहोत की एखाद्या अन्य देशात अशी शंका यावी, असे वर्तन राजस्थानमधील काँग्रेस सरकारकडून घडले आहे. महाराणा प्रताप यांची भूमी असलेल्या उदयपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मंदिरांवर आणि धार्मिक उत्सवांच्या प्रसंगी भगवे झेंडे लावण्यावर गेहलोत सरकारने बंदी घातली आहे. जातीय सलोखा राखण्याच्या नावाखाली काँग्रेस सरकारने जी कृती केली आहे, त्याचा राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांनी तीव्र निषेध केला आहे. उदयपूर जिल्ह्यामध्ये पुढील दोन महिने सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक इमारतींवर, विजेच्या खांबांवर पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय धार्मिक ध्वज लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या जिल्ह्यातील कायदा-व्यवस्था स्थिती चांगली राहावी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. राजस्थानच्या काँग्रेस सरकारने एका विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करणारी भूमिका न बदलल्यास हिंदू समाजही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी भगवे ध्वज लावण्यास प्रतिबंध करणार्या राजस्थान सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे!