भाजपा मुस्लिम विरोधी असल्याचा प्रचार जाणीवपूर्वक! : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
10 Apr 2023 21:17:12
मालेगाव : " हिंदुत्वाच्या विषयी भाजपाची भूमिका बदलेली नाही. भारतात राहणारा व भारतीय संस्कृतीवर विश्वास प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्माचा असेल तो भाजपा कुटुंबाचा सदस्य आहे. आमचे अनेक नगरसेवक मुस्लिम आहेत. काही खासदार होते. भाजपा मुस्लिम विरोधी असल्याची शंका निर्माण केली जाते, विरोधक जाणीवपूर्वक प्रचार करतात. एनआरसीविषयी देखील असेच झाले होते. " भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे मालेगाव (नाशिक ) येथे पत्रकारांशी बोलत होते.
बावनकुळे म्हणाले," मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा पूर्वनियोजित होता. त्यांच्यासोबतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. विरोधकांनी त्यावर टीका करण्याचे कोणतेही कारण नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, सरकारवर टीका करण्याचा विरोधकांचा अधिकार आहे, मात्र, त्यांनी योग्य विषयावर टीका करावी. वैयक्तिक कारणावरून टीका करण्याची गरजच नाही. सुप्रिया सुळे शिवलिंगाच्या दर्शनाला गेल्या त्यावर आम्ही काहीच बोललो नाही असेही ते म्हणाले.
भाजपाच्या मालेगाव जिल्हा संघटनात्मक दौऱ्यावर पोहचलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्थानिक पदाधिकारी यांनी भव्य रॅली काढून स्वागत केले. यानंतर त्यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद व समाजिक बैठकीत सहभागी झाले. सायंकाळी सटाणा येथे मालेगाव जिल्हा संघटनात्मक बैठकीतून त्यांनी मार्गदर्शन केले.
अजित पवारांची लीड ईव्हीएमच्या मतदानातूनच
निवडणुकीत विजय झाला तर ईव्हीएम विषयी काहीच बोलले जात नाही. पराजय झाला तर ईव्हीएमला दोष देणे गरजेचे नाही. अजित पवार यांची लीड ईव्हीएमच्या माध्यमातून झालेल्या मतदानातूनच आली आहे,असे ते म्हणाले.